न्यूयॉर्क
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने जागतिक क्रीडा विश्वात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या २०२६ सालच्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली क्रीडापटूंच्या यादीत मानधनाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारी स्मृती मानधना ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.
टाइम मॅगझिनच्या या यादीत जगभरातील दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा समावेश आहे, जे सध्याच्या काळातील क्रीडा संस्कृतीला आकार देत आहेत. लिब्रॉन जेम्स या यादीचे नेतृत्व करत असून, लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कार्लोस अल्काराझ आणि रॅरी मॅक्लॉय यांसारख्या जागतिक सुपरस्टार्ससोबत स्मृती मानधनाने आपले स्थान पक्के केले आहे.
टाइम मॅगझिनने स्मृती मानधनाच्या कामगिरीचे कौतुक करताना तिच्या विक्रमांची नोंद घेतली आहे. देशांतर्गत वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला, तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारी पहिली भारतीय आणि १७ आंतरराष्ट्रीय शतकांसह सर्वाधिक शतकांचा विक्रम तिच्या नावावर आहे. याशिवाय, एका कॅलेंडर वर्षात १,००० हून अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
स्मृती मानधना केवळ वैयक्तिक विक्रमांसाठीच नव्हे, तर सांघिक यशासाठीही ओळखली जाते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना तिने २०२४ आणि २०२६ मध्ये महिला प्रीमियर लीग जिंकली आहे. तसेच, भारताच्या गेल्या वर्षीच्या विश्वचषक विजयातही तिने उपकर्णधार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' (२०२५) हा किताबही तिला मिळाला असून, तिची ही कामगिरी भारतीय क्रीडा विश्वासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.