राष्ट्रमंडळ खेळात पॅरा ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकताना भारताची शर्मीला ढाणकर
भारताची स्टार पॅरा ॲथलीट शर्मीला ढाणकर हिने राष्ट्रमंडळ खेळात (Commonwealth Games) ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. महिलांच्या गोळाफेक (शॉटपुट) F57 प्रकारात अव्वल स्थान पटकावत तिने भारतासाठी पॅरा ॲथलेटिक्समधील पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले.
२० वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला
४० वर्षीय शर्मीला ढाणकर हिने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम ९.८१ मीटर फेक करत भारताची राष्ट्रमंडळ खेळांमधील पॅरा ॲथलेटिक्स पदकाची तब्बल २० वर्षांची प्रदीर्घ वाट पाहावी लागलेली प्रतीक्षा संपवली. या क्रीडा प्रकारात भारताच्या शिल्पा सायला हिनेही ७.२६ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. यामुळे भारताला या स्पर्धेत दुहेरी पदक मिळवता आले आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर शिल्पाला कांस्यपदक
सुरवातीला नायजेरियाची युकेरिया इयाझी तिसऱ्या स्थानावर होती. मात्र, भारतीय संघाकडून नोंदवण्यात आलेला आक्षेप आणि अधिकृत पुनरावलोकनानंतर नायजेरियन खेळाडूची एकमेव वैध फेक ही फॉऊल (foul) ठरवण्यात आली. त्यामुळे चौथ्या स्थानावर असलेल्या शिल्पा सायला हिची कांस्यपदकावर पदोन्नती झाली. या निर्णयामुळे भारताच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिओवर मात करत रचला इतिहास
वयाच्या दुसऱ्या वर्षी डाव्या पायात पोलिओचे इन्फेक्शन झालेल्या शर्मीला ढाणकर हिने या वर्षी फज्जा आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रमंडळ खेळात ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती, मात्र यावेळी तिने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.