काही अपघात फक्त माणसांना हिरावून घेत नाहीत, तर त्यांच्यामागे असणाऱ्या संपूर्ण कुटुंबाची स्वप्नं आणि जगण्याचा आधार एका झटक्यात संपवून टाकतात. गेल्या वर्षी १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एअर इंडियाचं एआय-१७१ हे विमान कोसळलं. या दुर्घटनेत २४१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.
त्या मृत पावलेल्या प्रवाशांमध्ये गुजरातच्या एका छोट्याशा गावातला कमलेश चौधरी आणि त्याची नवविवाहित पत्नी धापूबेन यांचाही समावेश होता. त्यांच्या निधनाने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या भीषण दुर्घटनेत कमलेश आणि धापूबेन कायमचे सोडून गेले, मागे राहिले ते त्यांचे म्हातारे आई-वडील आणि काही अपुरी स्वप्ने.
क्षणार्धात उध्वस्त झालेली स्वप्ने
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील थावर गावचे ४८ वर्षीय शेतकरी सावधानभाई चौधरी यांचा मोठा मुलगा कमलेश लंडनमध्ये नोकरी करत होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्नासाठी तो भारतात आला होता. लग्न आटोपून तो पत्नी धापूबेनला आपल्यासोबत लंडनला घेऊन जाण्यासाठी निघाला होता. सावधानभाई आणि त्यांची पत्नी रत्नीबेन पहिल्यांदाच आपल्या मुलांना सोडण्यासाठी अहमदाबाद विमानतळावर गेले होते. मुलांचा आनंद पाहून परतत असतानाच त्यांना या भीषण अपघाताची बातमी मिळाली. गाडी फिरवून ते तातडीने अहमदाबादला पोहोचले, पण तोपर्यंत सर्व काही संपलं होतं.
कमलेशच्या कुटुंबाला ओमरचा आधार
कमलेश लंडनच्या ज्या दुकानात काम करायचा, तिथे त्याचा एक पाकिस्तानी वंशाचा सहकारी होता. त्याचं नाव ओमर अली. अपघात झाल्याचं समजताच ओमरला मोठा धक्का बसला. कमलेशच्या दुकानाच्या मालकांनी म्हणजेच तन्नीभाई यांनी ओमरला कमलेशच्या वडिलांशी संपर्क साधायला सांगितला. ओमरने कमलेशच्या खोलीत राहणाऱ्या मित्राकडून सावधानभाईंचा नंबर मिळवला आणि फोन केला. तिथून सुरू झालेल्या एका प्रवासाने दोन अनोळखी कुटुंबांना एकमेकांच्या जवळ आणलं.
त्यांनतर गेल्या वर्षभरात एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा ओमरने लंडनहून सावधानभाईंना फोन किंवा मेसेज केला नसेल. ओमर रोज कामावर जाताना सावधभाईंना फोन करतो. त्यांच्यात हवामान, शेती, दुपारचं जेवण आणि तब्येतीविषयी अगदी मनमोकळ्या गप्पा रंगतात.
द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सावधानभाई सांगतात की, "आता तर आमच्या नखाला जरी लागलं, तरी ओमर फोन करून काळजीने विचारपूस करतो. त्याच्या घरी कोणी आजारी असेल तर आम्हालाही त्याची लगेच माहिती मिळते." सावधानभाईंना हिंदी बोलताना अडचण यायची, ते अनेकदा मध्येच गुजराती बोलायचे. पण ओमर अगदी शांतपणे त्यांची प्रत्येक भावना समजून घ्यायचा.
राखेतून उभे राहिलेले आयुष्य
अपघातानंतर विमान कंपनीकडून मिळालेल्या भरपाईच्या रकमेतून सावधानभाईंनी आधी कमलेशला लंडनला पाठवण्यासाठी घेतलेलं ५५ लाखांचं कर्ज फेडलं. कमलेशच्या इच्छेनुसार गेल्या दिवाळीत त्यांनी एक पांढरी गाडीही खरेदी केली. कमलेश नेहमी नवीन पद्धतीने शेती करायला सांगायचा. त्यामुळेच सावधानभाईंनी आता आपल्या ३ एकर जमिनीवर कलिंगड, खरबूज आणि लाल मिरचीची शेती करायला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, शेतात कोणतंही नवीन पीक घेण्यापूर्वी सावधानभाई लंडनला ओमरला फोन करून चर्चा करतात. ओमरला शेतीतलं काही कळत नसलं, तरी तो 'तुम्ही करा, ईश्वर नक्कीच यश देईल,'" असा विश्वास देतो.
कृतज्ञतेची शिदोरी
गेल्या महिन्यात सावधानभाईंनी कमलेशसारखंच ओमरसाठी घरचे शुद्ध तूप, पाचक चूर्ण आणि ओमरच्या पत्नीसाठी दोन पाकीट ड्राय कचोरी लंडनला कुरिअरने पाठवली. ओमरने जेव्हा खर्चाचे पैसे विचारले, तेव्हा सावधानभाईंनी "आपल्या नात्याची काय किंमत लावणार?" असं विचारलं.
दुसरीकडे, कमलेशचे मालक तन्नीभाई देखील या कुटुंबाची काळजी घेत आहेत. ते दरमहा सावधानभाईंच्या खात्यात ५० हजार रुपये पाठवतात आणि त्यांनी कमलेशच्या भावासाठी एक फंड देखील जमा केला आहे. तन्नीभाई आणि ओमरच्या रूपाने मिळालेला हा माणुसकीचा आधार या चौधरी कुटुंबाला जगण्याची नवी ताकद देत आहे.