पुणे
नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण आणि दिल्ली पोलिसांच्या लाठीहर्च्याविरोधात पुण्यात मुसळधार पावसात विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वात शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान सहभागी झालेल्या शास्ता खान यांनी सांगितले की, माझ्या मैत्रिणीचा नीटचा पेपर लीक झाला होता आणि त्यानंतर तिला पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याने तिने ज्या वेदना सहन केल्या, त्या मी समजू शकते. तसेच २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा त्यांनी तीव्र निषेध केला. न्याय मागणाऱ्या तरुणांवर असा अत्याचार व्हायला नको होता, असे त्यांनी म्हटले.
अन्य एका आंदोलकाने सांगितले की, वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे सरकारची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. वकील सादिया खान यांनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी या मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेली गुंडगिरी अयोग्य असून गरज पडल्यास आपण त्यांचे खटले लढू, असे त्यांनी स्पष्ट केले. अश्विनी के. या आंदोलकाने आरोप केला की, सरकारचे अपयश विद्यार्थ्यांच्या निराशेला कारणीभूत ठरत असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.
सीजेपीच्या नेतृत्वात जूनच्या अखेरीस सुरू झालेल्या या आंदोलनात परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता दूर करणे, शिक्षण प्रणालीत सुधारणा करणे आणि नीट पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची प्रमुख मागणी केली जात आहे.