ASSAM FLOODS: आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ४७ जणांचा मृत्यू, ७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 12 h ago
आसाममधील भीषण पूरस्थितीमुळे ४७ जणांचा मृत्यू; ७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित आणि बचावकार्य सुरू.
आसाममधील भीषण पूरस्थितीमुळे ४७ जणांचा मृत्यू; ७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित आणि बचावकार्य सुरू.

 

गुवाहाटी 

आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, पुराच्या विळक्यात सापडून मृतांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांतील ७.२१ लाखांहून अधिक नागरिक या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाले असून अजूनही सुमारे ४० जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

पूरस्थिती आणि बचावकार्य

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पूरग्रस्त जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. पुरामुळे अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, शिवसागरमधील दिखो नदी पात्राबाहेर वाहत आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांद्वारे आतापर्यंत सुमारे ५ हजार लोकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे.

केंद्रीय पथक करणार पाहणी

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) अहवालानुसार, सध्या ८८३ गावे पाण्याखाली गेली आहेत आणि २५ हजारांहून अधिक हेक्टर शेतजमीन खराब झाली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ३५८ मदत छावण्या सुरू करण्यात आल्या असून २४ हजारांहून अधिक विस्थापित नागरिक तिथे आश्रय घेत आहेत. दरम्यान, पुराच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी एक केंद्रीय पथक २५ जुलै रोजी राज्याचा दौरा करणार आहे.