अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवावेत आणि युद्ध थांबवावे, या बदल्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपला ताबा सोडण्याची ऑफर इराणने दिली आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा मोठा प्रश्न नंतरच्या टप्प्यात चर्चेसाठी घेता येईल, असेही यात सुचवण्यात आले आहे. दोन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला मिळालेला हा प्रस्ताव अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वीकारण्याची शक्यता कमी वाटते. या प्रस्तावामुळे २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वादांवर कोणताही ठोस तोडगा निघणार नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये तात्पुरती युद्धबंदी असली तरी सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे.
शांततेच्या काळात जगातील एकूण तेल आणि वायू व्यापारापैकी एक पंचमांश व्यापार याच मार्गावरून चालतो. अमेरिकेने इराणची तेल विक्री रोखण्यासाठी नाकेबंदी केली आहे. यामुळे इराणचा महत्त्वाचा महसूल बुडत आहे. तसेच तेल साठवण्यासाठी जागा नसल्यामुळे तेहरानला आपले उत्पादन बंद करण्याची वेळ येऊ शकते.
दुसरीकडे, सामुद्रधुनी बंद असल्यामुळे ट्रम्प यांच्यावरही दबाव वाढत आहे. आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल आणि पेट्रोलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. या मार्गाचा वापर करून तेल निर्यात करणाऱ्या अमेरिकेच्या मित्र देशांचीही यामुळे कोंडी झाली आहे. या बंदचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला असून खते, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले आहेत.
इराणच्या नव्या प्रस्तावानुसार अणुकार्यक्रमावरील चर्चा भविष्यात ढकलली जाईल. इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणे, हेच युद्ध पुकारण्याचे मुख्य कारण असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. इराण आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये या शनिवार-रविवारी झालेल्या बंद दाराआड चर्चेची माहिती असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा खुलासा केला. एक्सिओस या वृत्तसंस्थेने इराणच्या या प्रस्तावाचे वृत्त सर्वप्रथम दिले. इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून मॉस्कोकडून त्यांना नेमकी काय मदत मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.