राष्ट्रउभारणीत भारतीय मुस्लिम महिलांचे योगदान खूप मोठे आहे. पण इतिहासाच्या पानांवर याकडे अनेकदा दुर्लक्ष झाले. देशाच्या प्रगतीला आकार देणाऱ्या अनेक क्रांतिकारी नेत्यांचा वारसा या महिलांना लाभला आहे. राजकारणातील महिलांवर आधारित 'परवाझ' (Parwaaz) मालिकेच्या पहिल्या भागाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 'आवाज-द व्हॉईस' या मालिकेचा पुढचा भाग अभिमानाने सादर करत आहे. गणवेश घालून जुन्या रुढी-परंपरांना फाटा देणाऱ्या रणरागिणींना ही एक मानवंदना आहे. आजच्या आधुनिक भारतीय मुस्लिम महिलांनी शौर्य आणि जिद्दीचा हा वारसा अत्यंत खंबीरपणे पुढे नेला आहे. प्रचंड मेहनत, शिस्त आणि त्यागाची मागणी करणाऱ्या अत्यंत कठीण क्षेत्रांत त्यांनी दमदार पाऊल ठेवले आहे.
या महिला अंगावर गणवेश चढवतात. मग तो लष्कराचा 'ऑलिव्ह ग्रीन' असो, पोलिसांचा खाकी असो, नौदल आणि विमान वाहतुकीतील पांढराशुभ्र असो किंवा न्यायव्यवस्थेतील काळा कोट असो. त्या केवळ नोकरी करत नसतात. त्या नेतृत्व, सहानुभूती आणि जनसेवेची नवी व्याख्याच तयार करतात. या विशेष भागात अशाच दहा रणरागिणींच्या असामान्य प्रवासाचा वेध घेतला आहे. प्रचंड आव्हानांचा सामना करत केवळ स्वतःच्या गुणवत्तेवर आणि विश्वासावर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. ऑर्डनन्स युनिटचे नेतृत्व करण्यापासून ते पोलिसांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या तपासापर्यंत त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. महाकाय जहाजे चालवणे आणि नागरी हक्कांसाठी लढा देणे, अशा विविध आघाड्यांवर त्या लढत आहेत. देशसेवा हेच सक्षमीकरणाचे आणि प्रेरणेचे सर्वोच्च लक्षण आहे, हे त्यांच्या प्रवासातून दिसून येते.
प्रेरणादायी भरारी भारतीय मुस्लिम महिलांची
१. अजिता बेगम सुलतान : पोलिसांमधील जिद्द, शिस्त आणि संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण! कोईम्बतूरसारख्या साध्या पार्श्वभूमीतून त्या आल्या. आज त्या केरळमध्ये गुन्हे शाखेच्या महानिरीक्षक (IG) आहेत. मानवी तस्करी, अमली पदार्थांचे जाळे आणि महिला व मुलांवरील गुन्हे त्यांनी धडाडीने हाताळले आहेत. साधेपणा आणि कर्तव्याप्रती निष्ठा यासाठी त्या ओळखल्या जातात. "पोलीस अधिकाऱ्याला चूक करून चालत नाही," हे त्यांचे ठाम मत आहे. याच तत्त्वावर त्यांनी अनेक कठीण बदल्या आणि मोठ्या तपासांना अत्यंत खंबीरपणे सामोरे गेले आहे. 'स्टेट पोलीस कॅडेट' सारख्या उपक्रमांतून त्या नव्या पिढीला मार्गदर्शन करतात. त्यांचा हा प्रवास निव्वळ व्यावसायिक यश नाही. तर ती सामाजिक जबाबदारीची एक मोठी जाणीव आहे.

२. अनिसा नबी : जम्मू-काश्मीरमधील प्रशासन आणि खेळाची आवड यांचा सुरेख संगम! त्या २०१२ च्या बॅचच्या जेकेएएस (JKAS) अधिकारी आहेत. सध्या त्या जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदेच्या मुख्य क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नेहमीच खेळ, फिटनेस आणि तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले आहे. स्वतः एक उत्तम धावपटू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी 'वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉन' आणि 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. 'वंडरस वुमेन' (Wondrous Women) या उपक्रमातून त्या महिलांना फिटनेस आणि मानसिक आरोग्याकडे वळण्यास प्रेरणा देतात. जीएसटी (GST) जनजागृतीपासून ते तळागाळातील रोजगार योजनांपर्यंत त्यांनी प्रशासनात उत्तम काम केले आहे. समाजात खेळाचे महत्त्व रुजवून त्या अनेक तरुणांना निरोगी आणि ध्येयवादी जीवन जगण्याची प्रेरणा देत आहेत.

३. इशरत अहमद : राजस्थानच्या नुआन गावच्या सुपुत्री. सेवा, शिस्त आणि देशप्रेमाचा एक उत्तम वारसा त्यांच्याकडे आहे. २००१ मध्ये त्या भारतीय लष्करात रुजू झाल्या. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी थेट मेरठमधील ऑर्डनन्स युनिटचे नेतृत्व मिळवले. कायमखानी समाजातून या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. त्यांच्या कुटुंबात लष्करी आणि नागरी सेवेची मोठी परंपरा आहे. कर्नल इशरत यांचा प्रवास कौटुंबिक मूल्ये आणि स्वतःच्या जिद्दीचे उत्तम दर्शन घडवतो. त्या ग्रामीण भागातील मुलींना लष्करात आणि प्रशासकीय सेवेत येण्यासाठी सतत प्रेरित करतात. त्यांची ही कहाणी साहस, नेतृत्व आणि चिरंतन प्रेरणेचे एक जिवंत उदाहरण आहे.

४. बुशरा बानो : कन्नौजच्या एका छोट्याशा गावातून थेट भारतीय पोलीस सेवेपर्यंतचा (IPS) त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी (PhD) पूर्ण केली. मातृत्व, नोकरी आणि नागरी सेवा परीक्षेची कठीण तयारी या सर्व आघाड्यांवर त्यांनी यशस्वी लढा दिला. विशेष म्हणजे, आठ महिन्यांच्या गरोदर असताना त्यांनी यूपीएससीची (UPSC) मुलाखत दिली. त्या पश्चिम बंगाल कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्या. प्राध्यापक, कॉर्पोरेट कर्मचारी, एसडीएम (SDM) आणि आता पोलीस अधिकारी असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. जिद्द, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षण असेल तर कठीण परिस्थितीचे रुपांतर यशाच्या शिखरात करता येते, हे त्यांनी तरुण महिलांना दाखवून दिले.

५. हनी कुरेशी : कोलकात्यातील 'क्रेडल फर्टिलिटी सेंटर'मध्ये वंध्यत्व निवारण उपचारांमध्ये त्यांनी मोठे नाव कमावले आहे. त्या गरिया शाखेच्या प्रमुख आहेत. आयव्हीएफ (IVF) प्रक्रिया आणि प्रगत प्रजनन निदानामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्या वैद्यकीय ज्ञान आणि रुग्णांप्रती सहानुभूती यांचा सुरेख मेळ साधतात. यामुळे अनेक जोडप्यांचे आई-वडील बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे. २०२४ मध्ये त्यांना 'इसार युथ आयकॉन अवॉर्ड'ने (ISAR Youth Icon Award) सन्मानित करण्यात आले. शिस्त, चिकाटी आणि सतत शिकण्याची वृत्ती हीच यशाची गुरुकिल्ली आहे, यावर डॉ. कुरेशी यांचा दृढ विश्वास आहे. वंध्यत्वासारख्या कठीण समस्येचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी त्या आता आशेचा एक मोठा किरण बनल्या आहेत.

६. रेश्मा निलोफर नाह : कोलकात्यातील 'पोर्ट ट्रस्ट'मध्ये जगातील पहिल्या महिला 'रिव्हर पायलट' (River Pilot) बनून त्यांनी सागरी क्षेत्रात इतिहास रचला. 'अकॅडमी ऑफ मेरीटाइम एज्युकेशन अँड ट्रेनिंग'मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. २०१८ मध्ये हे अत्यंत मानाचे पद मिळवण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे जगभर समुद्रसफरी केल्या. अरुंद आणि कठीण नदीपात्रातून महाकाय जहाजे मार्गस्थ करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. यासाठी प्रचंड शारीरिक ताकद आणि चपळ निर्णयक्षमता लागते. रेश्मा यांनी हे सातत्याने सिद्ध केले आहे. त्यांना 'नारी शक्ती पुरस्कार' मिळाला आहे. त्यांचा हा प्रवास महिला सक्षमीकरणाचे एक अतिशय सामर्थ्यवान प्रतीक आहे. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या अत्यंत कठीण क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा त्या आजच्या तरुण मुलींना देत आहेत.

७. सारा रिझवी : २००८ च्या बॅचच्या गुजरात कॅडरच्या आयपीएस अधिकारी. जनसेवेप्रती असलेली निष्ठा आणि जिद्द हेच त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे. सध्या त्या जम्मू-काश्मीरमधील उधमपूर-रियासी रेंजच्या उपमहानिरीक्षक (DIG) आहेत. आंतर-कॅडर प्रतिनियुक्तीवर त्या तिथे गेल्या आहेत. या भागात डीआयजी किंवा आयजी पदावर असलेल्या त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. सुरुवातीच्या काळातील आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक दुःखावर त्यांनी जिद्दीने मात केली. निवडणुका, गुप्तचर कारवाया आणि सुरक्षेची आव्हाने त्यांनी अत्यंत खंबीरपणे हाताळली आहेत. मुंबईतील एक जिद्दी विद्यार्थिनी ते अतिसंवेदनशील भागात सेवा देणारी वरिष्ठ पोलीस अधिकारी, हा त्यांचा प्रवास चिकाटी आणि सामाजिक जबाबदारीची एक मोठी साक्ष देतो.

८. सोफिया कुरेशी : भारतीय लष्करातील जिद्द आणि गुणवत्तेचे एक भक्कम प्रतीक. त्यांनी लष्करात लिंग आणि ओळखीबाबतचे जुने समज पूर्णपणे मोडून काढले आहेत. शिस्त आणि व्यावसायिकतेच्या जोरावर त्यांनी लष्करात मोठी मजल मारली. त्यांनी अनेक आव्हानात्मक आणि नेतृत्वदायी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सैनिकाची किंमत त्याच्या पार्श्वभूमी किंवा लिंगावरून ठरत नाही. तर ती त्याच्या क्षमतेवरून ठरते, हे त्यांनी स्वतःच्या कामातून सिद्ध केले. आपल्या शांत आणि सातत्यपूर्ण कामगिरीतून सोफिया यांनी अनेक तरुण महिलांना लष्करात येण्याचे स्वप्न दाखवले आहे.

९. तुबा सनोबर : मूळच्या सिवनीच्या आणि आता बंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या युवा वकील. नागरी हक्क, महिला सक्षमीकरण आणि डेटा प्रायव्हसी या विषयांवर त्या प्रखरपणे आवाज उठवतात. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी गुन्हेगारीशास्त्र (Criminology) विषयात एलएलएम (LLM) केले आहे. त्या कायद्याचे ज्ञान आणि तळागाळातील चळवळ यांचा सुरेख मेळ साधतात. 'असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स'सोबत मिळून त्या घरगुती हिंसाचार आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत जनजागृती करतात. 'सोज' (SOZ) सारख्या उपक्रमांतून त्या डिजिटल प्रायव्हसी आणि लोकसहभागावर काम करतात. कायद्याला केवळ एक व्यवसाय न मानता समाज बदलाचे आणि सन्मानाचे हत्यार मानणाऱ्या नव्या पिढीचे त्या प्रतिनिधित्व करतात.

१०. हाना मोहसीन खान : विमान वाहतूक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा एक वेगळा आणि अत्यंत प्रेरणादायी मार्ग तयार केला. उशिरा सुरुवात करूनही जिद्दीच्या जोरावर समाजाने लावलेले टॅग पुसून काढता येतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचा जन्म मेरठचा आणि शिक्षण काही काळ सौदी अरेबियात झाले. त्यांचा कॉकपिटपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पत्रकारिता आणि उद्योजकतेकडून त्या उशिरा या क्षेत्राकडे वळल्या. अमेरिका आणि ग्रीसमध्ये त्यांनी कठीण प्रशिक्षण घेतले. २०२० मध्ये त्यांनी पहिले व्यावसायिक उड्डाण केले. भारतातील मोजक्या मुस्लिम महिला वैमानिकांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांची ही कहाणी केवळ चिकाटी आणि कुतूहलाची नाही. तर जुन्या साचेबद्ध चौकटीत अडकून न राहण्याच्या त्यांच्या वृत्तीची आहे. आत्मविश्वास आणि धैर्याने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची त्या सर्वांना प्रेरणा देतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -