भारतीय बॅडमिंटनपटूंची ऑस्ट्रेलियावर मात; थॉमस कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय पुरुष संघाने सोमवारी थॉमस कप फायनल्समध्ये ऑस्ट्रेलियाचा ५-० असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयामुळे भारताने गट 'अ' मधून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

सध्या भारत आणि चीन या गटात अव्वल स्थानी आहेत. २०२२ मधील चॅम्पियन भारताने पहिल्या सामन्यात कॅनडावर ४-१ ने विजय मिळवला होता. दुसरीकडे, चीनने ऑस्ट्रेलियाला ५-० ने नमवले असून सोमवारीच कॅनडाचाही ४-१ ने पराभव केला. आता गटविजेता ठरवण्यासाठी बुधवारी हे दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर येतील.

पॅरिस ऑलिम्पियन आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन याने भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने इफ्राइम स्टीफन सॅमवर २१-१४, २१-१६ अशी मात करून भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर यूएस ओपन चॅम्पियन आयुष शेट्टीने आपल्या फॉर्मचे प्रदर्शन केले. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या आयुषने श्रेय धांडचा २१-८, २१-६ असा सहज पराभव करून ही आघाडी दुप्पट केली.

भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गटविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या सुवर्णपदक विजेत्या जोडीने रिझकी हिदायत आणि जॅक यू यांचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. यामुळे भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता एच.एस. प्रणॉय याने ऋषी होंडा भूपतीवर २१-११, २१-१७ ने विजय मिळवला. त्याने ३० मिनिटांच्या आतच हा सामना खिशात घातला. दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात हरिहरन अमसाकरुणन आणि एम.आर. अर्जुन जोडीने अंदिका रामादियांश आणि इफ्राइम स्टीफन सॅम यांचा २१-१२, २१-१० असा पराभव केला. भारताने एकही सामना न गमावता ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे निष्प्रभ केले.