सोशल मीडियाचा वापर कोणाचीही बदनामी करण्यासाठी करता येणार नाही, मग ती व्यक्ती सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणीदरम्यान नोंदवले. अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्महाऊसच्या शेजाऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या बदनामीकारक पोस्ट्स डिलीट करण्याबाबत विचार करावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.
केतन कक्कड यांच्या मालकीची जमीन सलमान खानच्या पनवेल (नवी मुंबई) येथील फार्महाऊसशेजारी आहे. सलमानने फार्महाऊसच्या बांधकामात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले आहे आणि आपल्या जागेत जाण्याचा रस्ता अडवला आहे, असा आरोप कक्कड यांनी केला होता. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी सोशल मीडियावर सलमानच्या विरोधात व्हिडिओ आणि इतर मजकूर पोस्ट केला होता.
कक्कड यांच्या या पोस्ट्स केवळ बदनामीकारकच नाहीत, तर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आहेत, असा दावा करत सलमान खानने त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. हे व्हिडिओ हटवण्याचे आणि भविष्यात अशा टिप्पण्या करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्याने केली होती. मात्र, दिवाणी न्यायालयाने असा आदेश देण्यास नकार दिल्यानंतर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. संबंधित अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार मांडण्याऐवजी कोणी असे व्हिडिओ सोशल मीडियावर का अपलोड करावेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. "केवळ कोणाला सोशल मीडियाचा ॲक्सेस आहे याचा अर्थ असा होत नाही की ते केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने कोणत्याही व्यक्तीबद्दल, मग तो सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी, व्हिडिओ अपलोड करू शकतात," असे न्यायमूर्ती देशमुख यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने कक्कड यांना हा मजकूर काढून टाकण्याबाबत विचार करण्याची सूचना केली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी ठेवली आहे.