नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात लोकांनी 'विक्रमी संख्येने' मतदान करावे, असे मोठे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
विशेषतः महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असा विशेष आग्रह मोदींनी धरला.
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. एकूण १४२ मतदारसंघांमध्ये आज मतदानाला सुरुवात झाली आहे.
"आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चा दुसरा टप्पा आहे. आज मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांनी विक्रमी संख्येने मतदान करावे. आपली लोकशाही अधिक चैतन्यमय आणि सर्वांच्या सहभागाची बनवावी. पश्चिम बंगालमधील महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावणे खूप महत्त्वाचे आहे," असा मोठा संदेश मोदींनी दिला.
लोकशाहीला अधिक सक्षम करण्यासाठी विक्रमी मतदान होणे गरजेचे आहे. देशाचे जागरूक नागरिक म्हणून ही आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
"अशा प्रकारे आपण भारताच्या नवनिर्माणात सक्रिय सहभाग नोंदवू शकतो. सोबतच एका मजबूत आणि समृद्ध राष्ट्राचा पायाही भक्कम करू शकतो," असे ते म्हणाले.
पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. यापैकी १५२ जागांसाठी २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते.