इमान सकिना
सर्वसामान्यांच्या मनात 'जिहाद' या शब्दाबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्याचा अर्थ बऱ्याचदा अत्यंत संकुचित अर्थाने घेतला जातो. पण इस्लामिक परंपरेत डोकावून पाहिल्यास जिहाद ही संकल्पना खूप व्यापक आणि सखोल असल्याचे जाणवते.
जिहादचा मूळ अर्थ 'प्रयत्न किंवा संघर्ष' असा आहे. थोडक्यात सांगायचे तर, सत्य, न्याय आणि प्रामाणिकपणाची कास धरून जीवन जगण्यासाठी चाललेली ही एक अखंड धडपड आहे.
याच धडपडीचा एक अविभाज्य भाग म्हणजे 'वैचारिक जिहाद'. आजच्या घडीला या वैचारिक लढ्याची नितांत गरज आहे. ज्ञान संपादन करणे, सत्याची बाजू भक्कमपणे मांडणे, खोटेपणाला सडेतोड उत्तर देणे आणि स्वतःचे मन प्रगल्भ करणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने वैचारिक जिहाद होय.
काळाच्या ओघात सत्याचे रक्षण करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. त्या-त्या काळातील आव्हाने आणि उपलब्ध साधनांनुसार या पद्धती ठरत असतात. आज आपण तलवारींच्या किंवा रणांगणावरील युद्धाच्या काळात जगत नाही. हे विचारांचे युग आहे.
आजकाल विचार वाऱ्याच्या वेगाने पसरतात, ते सर्वांपर्यंत पोहोचतात आणि अनेकदा त्यावरून मोठे वादंगही निर्माण होतात. अशा परिस्थितीत वैचारिक जिहाद हा इस्लाममधील संघर्षाचा एक अत्यंत कळीचा मुद्दा बनतो. ज्ञान, शहाणपण आणि विचारपूर्वक मांडणीच्या माध्यमातून सत्य समजून घेणे आणि ते हिरीरीने टिकवून ठेवणे, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.
वैचारिक जिहाद म्हणजे केवळ रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष किंवा हाणामारी नव्हे. हा शांतपणे लढला जाणारा, पण आतून कमालीचा ताकदवान असा लढा आहे. हा लढा शाळा-महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये, पुस्तकांच्या पानांवर, डिजिटल माध्यमांवर आणि माणसांच्या मनात लढला जातो.
विचारांच्या या अथांग जगात अत्यंत जबाबदारीने वावरणे ही काळाची गरज आहे. आपल्या धर्माविषयी चुकीची माहिती पसरणार नाही, कोणतेही गैरसमज निर्माण होणार नाहीत आणि कुणीही त्याला एका ठराविक साच्यात अडकवणार नाही, याची काळजी घेणे म्हणजेच हा लढा!
वैचारिक जिहाद हा मुळात मनाचा किंवा विचारधारेचा संघर्ष आहे. इस्लाममध्ये ज्ञान मिळवणे, चिंतन करणे आणि गोष्टी समजून घेण्यावर खूप भर दिला आहे. याच शिकवणीत या जिहादची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. पवित्र कुराण वारंवार लोकांना विचार करण्याचे, प्रश्न विचारण्याचे आणि ज्ञान मिळवण्याचे आवाहन करते.
इस्लाममध्ये श्रद्धेचा अर्थ आंधळेपणाने अनुकरण करणे असा अजिबात नाही. तर ती श्रद्धा जाणीवपूर्वक, ज्ञानावर आधारित आणि पक्क्या विश्वासावर उभी असायला हवी.
जिहादच्या या प्रकारात शिकणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टी येतात. मुस्लिम बांधवांनी आधी स्वतःचा धर्म अत्यंत सखोलपणे आणि स्पष्टपणे समजून घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर तो इतरांना पटेल आणि रुचेल अशा सोप्या भाषेत सांगावा. ही जबाबदारी केवळ मौलवी किंवा विद्वानांपुरती मर्यादित नाही. ती सर्वांची सामायिक जबाबदारी आहे. अर्थात, ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि काळजीपूर्वक पार पाडणेही तितकेच गरजेचे आहे.
मागील पिढ्यांसमोर नक्कीच वेगळ्या प्रकारची संकटे होती. पण आजच्या घडीला बहुतांश आव्हाने ही वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवरची आहेत. माध्यमांमधून इस्लामबद्दलचे गैरसमज आगीसारखे पसरतात.
अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना समजावून सांगताना बऱ्याचदा वरवरच्या गोष्टींचा आधार घेतला जातो. अशा परिस्थितीत मूग गिळून गप्प बसल्यास खोट्या माहितीला अधिक बळ मिळू शकते.
अशा वेळी लेखन, कला आणि प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत कळीची ठरते. ही केवळ कलाविष्काराची साधने राहिलेली नाहीत. ती सहभाग, आकलन आणि संरक्षणाची भक्कम शस्त्रे बनली आहेत. समोरासमोर बसून चर्चा करण्यापेक्षा या माध्यमांचा लोकांच्या जनमानसावर खूप मोठा प्रभाव पडतो. याच माध्यमातून लोकांचा इस्लामबद्दलचा दृष्टिकोन तयार होत असतो.
वैचारिक जिहादमध्ये सहभागी होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपली लेखणी. लेखनामुळे योग्य विचार करायला, मुद्देसूद मांडणी करायला आणि सखोल चिंतन करायला वेळ मिळतो. आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे वेळ कमी आहे आणि चुकीची माहिती सगळीकडे पसरलेली आहे. अशा काळात स्पष्ट आणि प्रामाणिक लेखन हा एक अत्यंत भक्कम आधार बनू शकतो.
निबंध, लेख, ब्लॉग्स आणि सोशल मीडियावरील विचारपूर्वक लिहिलेल्या पोस्ट्सच्या माध्यमातून मुस्लिम बांधव आपल्या धर्माची तत्त्वे जगासमोर मांडू शकतात. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करू शकतात. इस्लामचा मानवी चेहरा समोर आणणारे आपले वैयक्तिक अनुभव सर्वांसोबत शेअर करू शकतात.
लेखनामुळे विषयाच्या मुळापर्यंत जाता येते. ऑनलाईन होणाऱ्या वरवरच्या वादांमध्ये नेमकी हीच गोष्ट हरवलेली असते. पण, लेखनासाठी स्वतःवर ताबा असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी अचूकता, न्याय आणि नम्रता लागते. स्वतःच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी लिहिणे म्हणजे इतरांवर चिखलफेक करणे नव्हे. अत्यंत स्पष्टपणे आणि आदराने सत्य समोर मांडणे, हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो.
प्रत्येक गोष्ट केवळ युक्तिवाद करून समजावून सांगता येत नाही. धर्मातील काही गोष्टी सौंदर्य आणि भावनांच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे लोकांच्या काळजाला भिडतात. नेमक्या याच ठिकाणी वैचारिक जिहादमध्ये कलेची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.
सुलेखन, भौमितिक रचना, वास्तुकला आणि इतर अनेक माध्यमांतून आध्यात्मिक मूल्ये मांडण्याची इस्लामिक कलेला मोठी परंपरा लाभली आहे. आजच्या काळात हीच परंपरा डिजिटल आर्ट, फोटोग्राफी, चित्रपट आणि डिझाईन अशा आधुनिक माध्यमांतून अधिक सक्षमपणे पुढे नेली जाऊ शकते.
लेखन आणि कला ही जर शस्त्रे असतील, तर प्रसारमाध्यमे हे ते वापरण्याचे सर्वात मोठे रणांगण आहे. याच ठिकाणी नरेटिव्ह तयार होतात, ते लोकांपर्यंत पोहोचवले जातात आणि त्यांच्यावर चर्चाही झडतात.
अनेक लोकांसाठी इस्लामची ओळख त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून येत नाही. ते मोबाईल किंवा टीव्हीच्या पडद्यावर जे पाहतात, त्यावरूनच त्यांची समजूत तयार होते.
यामुळेच आजच्या काळात प्रसारमाध्यमे हे वैचारिक जिहादचे सर्वात महत्त्वाचे मैदान बनले आहे. व्हिडीओ, पॉडकास्ट, माहितीपट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे इस्लामची अत्यंत खरी आणि सर्वांना आपलीशी वाटेल अशी प्रतिमा समोर ठेवण्याची मोठी संधी मिळते. यामुळे मुस्लिम बांधवांना स्वतःची गोष्ट स्वतःच्या शब्दांत सांगता येते. इतरांनी ठरवून दिलेल्या साच्यात त्यांना अडकून राहावे लागत नाही.
सरतेशेवटी सांगायचे तर, वैचारिक जिहाद म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे. सत्य शोधण्याची, त्या सत्याची कास धरून जगण्याची आणि ते सत्य इतरांसोबत अत्यंत चांगल्या पद्धतीने शेअर करण्याची ती जबाबदारी आहे. विचारांवर चालणाऱ्या या आजच्या जगात, हा लढा आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा लढा नक्कीच ठरू शकतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter