अमेरिका आणि इराणमधील युद्धाची ठिणगी पडल्यामुळे सध्या संपूर्ण जग दहशतीखाली आहे. रणांगण जरी सीमेवर असले, तरी अण्वस्त्र हल्ल्याची भीती आता खाडी देशांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. अशा कठीण प्रसंगात आपल्या जनतेचा जीव वाचवण्यासाठी बहरीन, कुवेत, कतार आणि जॉर्डन या देशांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. अण्वस्त्रांच्या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या देशांना भारताच्या एका छोट्याशा निळ्या गोळीचा आधार वाटत आहे.
काय आहे ही मॅजिकल बुलेट ?
हा संपूर्ण विषय 'प्रुशियन ब्लू' किंवा 'प्रु डेकॉर्प' कॅप्सूलशी संबंधित आहे. बहरीनच्या एका एजंटने चंदीगडमधील एका औषध कंपनीकडे तब्बल १ कोटी कॅप्सूलची मागणी नोंदवली आहे. हे केवळ एक साधे औषध नसून भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) तंत्रज्ञानावर आधारित एक अमोघ अस्त्र आहे. अण्वस्त्र हल्ल्यानंतर मानवी शरीरात 'सिझियम-१३७' आणि 'थॅलियम' सारखे घातक किरणोत्सर्गी घटक शिरतात. ही निळी कॅप्सूल या घटकांचा प्रभाव मुळापासून नष्ट करण्याचे काम करते.
औषधाची कार्यपद्धती
हे औषध शरीरात नेमके कसे काम करते हे समजून घेणे रंजक आहे. ही कॅप्सूल सेवन केल्यानंतर ती थेट आतड्यांमध्ये पोहोचते. तिथे असलेले विषारी किरणोत्सर्गी घटक ही कॅप्सूल स्वतःकडे खेचून घेते आणि त्यांना विष्ठेवाटे शरीराबाहेर काढून टाकते. याच क्षमतेमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या औषधाला मॅजिकल बुलेट असे नाव दिले आहे.
मोठा व्यवहार आणि उत्पादनाची धुरा
चंदीगडमधील औषध कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, सध्या या कोट्यवधींच्या व्यवहारावर प्राथमिक बोलणी सुरू आहेत. प्रुशियन ब्लू सोबतच 'पोटॅशियम आयोडाइड'च्या १ कोटी गोळ्यांची देखील मागणी करण्यात आली आहे. पोटॅशियम आयोडाइड हे मानवी शरीरातील थायरॉईड ग्रंथी सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. विशेष म्हणजे, या औषधाचा कच्चा माल अहमदाबादमध्ये तयार होतो, तर उत्पादनाची संपूर्ण जबाबदारी चंदीगडमधील कंपनी सांभाळत आहे.
भारताची स्वदेशी ताकद
युद्धाचा धोका पूर्णपणे टाळणे कोणाच्याही हातात नसले, तरी त्यापासून वाचण्याची पूर्वतयारी आता आखाती देश भारताच्या मदतीने करत आहेत. भारताची ही स्वदेशी ताकद आणि तंत्रज्ञान आता जगासाठी आशेचा किरण ठरत आहे. अण्वस्त्र युद्धाच्या या गडद सावलीत चंदीगडची ही औषध कंपनी जगाला जीवदान देण्यासाठी सज्ज झाली आहे.