सुलेमान शेख
मराठवाड्याच्या अगदी टोकाला वसलेलं तुळजापूर तालुक्यातील अवघ्या शे-दीडशे उंबरठ्याचं 'देवसिंगा नळ' नावाचं एक छोटेखानी खेडं. बालाघाटच्या पर्वतरांगेवरील मध्ययुगीन काळातील प्रसिद्ध नळदुर्ग किल्ल्यापासून हे जवळचं गाव आहे. शेती हा इथला मुख्य व्यवसाय, त्याला दुग्धव्यवसायाची जोड.
गावात पाणी साठवणुकीची फारशी सोय नाही, दळणवळणाची साधनेही यथातथाच आहेत. रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने पोटापाण्यासाठी जवळच्या शहरांत स्थलांतर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
गावाची एकूण लोकसंख्या बाराशेच्या आसपास असून येथे संमिश्र वस्ती आहे. मुस्लिम आणि लमाण समाज जवळपास समसमान संख्येने आहेत, तर इतर समाजाची लोकसंख्या ६० ते ६५ टक्के आहे. याच गावात नुकतीच दहावीच्या मुख्य विसर्जनाने मोहरमची अत्यंत भावपूर्ण सांगता झाली.
हनुमान-हुसेन : गावाचे अद्वैत
इथल्या गावगाड्यात, रूढी-परंपरेत सामाजिक सलोख्याचे तसेच सहिष्णुतेचे मोठे सांस्कृतिक संदर्भ पाहायला मिळतात. संपूर्ण पंचक्रोशीत हे गाव हिंदू-मुस्लिम एकतेसाठी प्रसिद्ध आहे. एकमेकांच्या धर्मातील सण-उत्सव दोन्ही समाजाचे लोक अत्यंत हिरिरीने एकत्र येऊन साजरे करतात. मोहरम, हनुमान जयंती, कारहूनवी (कर्नाटकी बेंदूर), सेवालाल महाराज जयंती तसेच नवरात्रोत्सवात संपूर्ण गाव एकवटतो.
हनुमान आणि हसन-हुसेन ही या गावाची मुख्य ग्रामदैवतं आहेत. या गावाची सर्वात मोठी खासियत म्हणजे दोन्ही दैवतं अद्वैताने पूजली जातात. इथले लोक त्यांच्या नावांचे उच्चारण नेहमी एकमेकांशी जोडूनच करतात.
समावेशक दख्खनची सुफी परंपरा
हा संपूर्ण परिसर बहमणी राज्यातून उदयास आलेल्या वेगवेगळ्या शाह्यांच्या म्हणजेच मुस्लिम राजवटीच्या प्रभावाखाली राहिला. भारतात इस्लाम हा प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या हयातीतच दक्षिणेत मलबार किनाऱ्यावर आला होता.
दख्खनच्या प्रदेशातील अनेक मुस्लिम राजे पर्शियन वंशाचे असल्याने त्यांच्यावर शिया पंथाचा मोठा प्रभाव होता. त्यांनी सुफी संतांना मोठ्या प्रमाणात राजाश्रय दिला, ज्यामुळे दक्षिणेत सुफी परंपरेचा खोलवर ठसा उमटला.
याच कारणामुळे दख्खनचा हा प्रदेश नेहमीच समावेशक परंपरांचा, संमिश्र संस्कृतीचा माहेरघर राहिला. पर्शियन संस्कृती ही संकुचित धार्मिक चौकटीत अडकून न राहता, सर्व वंशांच्या सीमा ओलांडून मुक्तपणे संचार करणारी संस्कृती मानली जाते.
हिंदूंच्या पुढाकाराने सुरू झालेली परंपरा
भारतीय उपखंडातील असंख्य गावांमध्ये, शहरांमध्ये हिंदू समाज मोहरमच्या कार्यक्रमांत पिढ्यान्पिढ्या सहभागी होत आला आहे. कर्नाटकातील अनेक गावांत आजही मुस्लिम वस्ती नसतानाही हिंदू बांधव एकत्र येऊन 'आशूरखाना' उभारतात, श्रद्धेने मोहरम पाळतात. ते स्वतः ताजिये बनवतात, मिरवणुकांत भाग घेतात.
याच सांस्कृतिक प्रभावातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, कर्नाटकाच्या सीमेला लागून असलेल्या देवसिंगा नळ या मुस्लिमबहुल गावात एका हिंदू व्यक्तीच्या पुढाकाराने मोहरमची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, गावातील प्रत्येक कुटुंबाला मोहरमच्या सेवेचा मान मिळेल, याची आवर्जून काळजी घेतली गेली.
भारतीय लोकपरंपरेचे 'आलम'
देवसिंगा नळमध्ये चंद्रदर्शनासोबत 'कुदाली' मारून (अलावावर कुदळ मारणे) मोहरमची सुरुवात होते. पाचव्या दिवशी 'आशुरागृहात' पंजाची (आलम/सवारी) तसेच डोलीची स्थापना केली जाते. हजरत हसन, हजरत हुसेन, बारा इमाम, नालसाहेब अली यांच्या पंजांसोबतच डोलीमध्ये प्रेषितांच्या कन्येची तसेच हसन-हुसेन यांच्या मातोश्रींची स्थापना केली जाते.
हे सर्व 'आलम' भारतीय लोकपरंपरेतून साकारले असून ते स्थानिक कारागिरांनी घडवले आहेत. बांबू, कागद, लाकूड तसेच स्थानिक धातूंचा वापर करून भारतीय ताजिये तयार केले जाऊ लागले. डोली सजवताना भारतीय रथपरंपरेचा, मंदिरांच्या शोभायात्रांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो.
कत्तलची रात्र, त्यागभावनेचे फकीर
महिन्याची सातवी तारीख ही 'लहान कत्तलची रात्र' म्हणून साजरी केली जाते. यादिवशी नैवेद्य दाखवून फातेहा पढला जातो. या काळात गावातील अनेकजण 'फकीर' होतात. कोणी एका दिवसासाठी, कोणी सात दिवसांसाठी तर काहीजण वर्षभरासाठी फकीर होण्याचा संकल्प करतात. पीडा, त्याग तसेच समर्पणाची प्रत्यक्ष अनुभूती घेणे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
आठव्या दिवशी पहाटे पंजाची मिरवणूक निघते. गावातील प्रत्येक घरासमोर सवारी नेली जाते, तिथे नारळ फोडून सवारी पकडणाऱ्यांच्या पायावर पाणी घालत दर्शन घेतले जाते. शेवटी हनुमान मंदिरावळ मारुतीरायाला 'सलाम' करून सवारी पुन्हा आशूरखान्यात स्थापन केली जाते.
आर्त रिवायती अन् मराठीचा गोडवा
नववी तारीख ही 'मोठी कत्तल' म्हणून पाळली जाते. यादिवशी हसन-हुसेन यांचे पंजे वगळता बाकीच्या सवाऱ्यांची मिरवणूक निघते, तर दहाव्या दिवशी पहाटे पाचही सवाऱ्यांसहित डोलीची मिरवणूक काढली जाते. सवारी मिरवणुकीत निघाल्यावर लोक आपल्या आयुष्यातील व्यथांवर सवारीला मार्ग विचारतात. डोलीखाली झोपून तो दैवी भार झेलला जातो.
रोज संध्याकाळी येथे पारंपारिक 'रिवायती' गायल्या जातात. रिवायत म्हणजे आर्तता तसेच स्तुती असणारी प्रार्थनापर कवणं. इथल्या रिवायती मुख्यतः मराठी भाषेत गायल्या जातात, सोबतच दखणी तसेच कन्नड भाषेचाही वापर होतो.
करूणामय निरोप अन् विसर्जन सोहळा
रोज रात्री पारंपारिक हलगीच्या तालावर विविध खेळांचे पैतरे रंगतात. दहाव्या दिवशी संध्याकाळी अलावाभोवती रिंगण करून बहादुरीला दाद देणारा 'दुल्हा' खेळला जातो, समूहाकडून 'मरसिया' (शोकगीते) गायली जातात. विसर्जनाला निघताना सवाऱ्यांचा डोलीसोबत म्हणजेच माता बिबी फातिमा यांच्यासोबत भेटीचा अत्यंत करूणामय सोहळा पार पडतो.
ओढ्याच्या किनारी विसर्जनासाठी 'कर्बलाचे मैदान' तयार केले जाते. गावच्या वेशीपर्यंत महिला सवाऱ्या निरोप देण्यासाठी येतात. बाराव्या दिवशी 'जियारत' करून सांगता होते. दूध, पीठ तसेच गूळ एकत्र करून खापरावर भाजलेले 'रोठ' आणि चपातीला मध्यभागी उठाव देऊन बनवलेले 'चोंगे' हा इथला मुख्य प्रसाद असतो.
गावगाडा अन् पाटीलकीचा मान
इथल्या मोहरमवर मुलकी महसुली राज्यव्यवस्थेचा मोठा प्रभाव दिसतो. गावचा पाटील हा गावाचा प्रमुख समजला जातो, त्याच्याच अधिकृत परवानगीने सर्व सवाऱ्या गावात वास्तव्यास असतात. मिरवणूक काढणे किंवा सवारी कोणाला पकडायला द्यायची, याचा अंतिम निर्णय पाटलाचा असतो.
देवसिंगा नळचे सरपंच तसेच पाटीलकीचा मान असलेले युवराज पाटील सांगतात, “गावातला मोहरम आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. मोहरम तसेच हनुमान जयंती हे आमच्यासाठी कोणत्याही एका धर्माचे सण नसून ते संपूर्ण गावाचे उत्सव आहेत. कर्बलाच्या युद्धभूमीवर हुसेन यांनी सत्य तसेच न्यायासाठी रक्त सांडले, त्याच मूल्यांचे स्मरण म्हणून आम्ही गावात भव्य रक्तदान शिबिर घेतले.”
आशूरखान्याचे मुल्ला हसन शेख आपली भावना मांडताना म्हणतात, “गेल्या तीन पिढ्यांपासून आम्हाला ही सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. इथल्या ख्यातीमुळे केवळ मुस्लिमच नाही, तर मोठ्या संख्येने हिंदू भाविकही नवस फेडायला येतात.”
सध्याच्या अस्वस्थ, ध्रुवीकरणाच्या काळात हा गावचा मोहरम संपूर्ण भारतीय समाजाला सहिष्णुता, परस्पर आदर तसेच न्यायासाठी एकत्र उभे राहण्याचा एक मोठा शाश्वत संदेश देतो.
मोहरमचे अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व
इस्लामी कालगणनेनुसार मोहरम हा वर्षातला पहिला महिना असून त्याचा अर्थ 'पवित्र' असा होतो. या महिन्याच्या दहाव्या दिवसाला 'आशुरा' म्हणतात. पैगंबरांनी आपल्या अनुयायांना या दिवशी उपवास तसेच प्रार्थना करण्याचा आदेश दिला होता. इस्लाममध्ये या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सृष्टीची निर्मिती, आदम-इव्ह यांचे पृथ्वीवरील आगमन, स्वर्ग तसेच नरकाची निर्मिती याच महिन्यात झाली, अशी धार्मिक धारणा आहे.
याच आशुरेच्या दिवशी प्रेषितांचे नातू हजरत इमाम हुसेन हे करबलाच्या युद्धभूमीवर यजीदच्या सैन्याशी लढताना शहीद झाले. त्यांची दुःखद स्मृती म्हणून पहिले नऊ दिवस ताबूत बसवून दहाव्या दिवशी विसर्जित केले जातात. इमाम हुसेन यांच्या शहादतीची ही कथा केवळ इस्लामी इतिहासापुरती मर्यादित न राहता, ती न्याय, सत्य तसेच अत्याचाराविरुद्धच्या संघर्षाचे सार्वत्रिक नैतिक प्रतीक बनली आहे.