एक कहाणी : प्रा. सय्यद असगर वजाहत अन् मुझफ्फर अलींच्या अतरंगी आठवणींची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
हिंदी साहित्यिक असगर वजाहत आणि दिग्दर्शक मुझफ्फर अली यांच्या तरुणपणाच्या आठवणी दर्शवणारे चित्र
हिंदी साहित्यिक असगर वजाहत आणि दिग्दर्शक मुझफ्फर अली यांच्या तरुणपणाच्या आठवणी दर्शवणारे चित्र

 

मलिक असगर हाशमी

हिंदी साहित्यातील बडे प्रस्थ असलेले प्रा. सय्यद असगर वजाहत मूळचे उत्तर प्रदेशातील फतेहपूरचे रहिवासी. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच अलाहाबाद विद्यापीठात जाऊन कॉलेज लाईफचा आनंद लुटाण्याचा त्यांचा प्लॅन होता.

परंतु मुला, शिक्षण घ्यायचे तर ते फक्त अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधूनच (AMU), अशी आईची सक्त ताकीद आली! कारण एकदम स्पष्ट होते. आजोळचे काही मातब्बर पाहुणे तिथे प्रोफेसरच्या खुर्चीवर विराजमान होते. शेवटी नाईलाजाने वजाहत साहेबांनी आपले बिर्‍हाड AMU च्या हॉस्टेलमध्ये हलवले.

नियतीचा खेळ तरी पहा! हॉस्टेलमध्ये पाऊल ठेवताच असगर साहेबांची भेट मुझफ्फर अलींशी झाली. (हेच ते मुझफ्फर अली, ज्यांनी पुढे जाऊन 'उमराव जान'सारखा अजरामर चित्रपट बनवला). दोघांचा सायन्स (केमिस्ट्री) शाखेत प्रवेश तर झाला, पण खऱ्या अर्थाने दोघांच्या डोक्यातील केमिकल लोचा भलताच होता.

अभ्यास सोडून जगातील सर्व नको ती कामे करण्यात दोघांचे मन भयंकर रमायचे. कला, साहित्य आणि कॅम्पसमध्ये उंडारणे, हाच काय तो या दोन मित्रांचा मुख्य सिलॅबस होता.

बीडीचे बंडल अन् गेट कीपरची दया!
रात्रंदिवस मोकाट फिरणाऱ्या या दोन मित्रांसमोर सर्वात मोठी अडचण असायची ती हॉस्टेलचा मुख्य गेट आणि तिथे बसलेला शिस्तप्रिय सुरक्षा रक्षक. उशिरा येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले जायचे. त्यानंतर युनिव्हर्सिटीचे प्रोक्टर साहेब अशी काही हजेरी घ्यायचे की थेट आजी आठवायची.

पण आपले दोन्ही उस्ताद काही साधे नव्हते. त्यांनी सुरक्षारक्षकाची सर्वात कमकुवत नस अचूक पकडली होती. ती म्हणजे बीडीचे बंडल. रात्री दोघे भटकून हॉस्टेलकडे परतताना खिशात बीडीचे एक बंडल तयार असायचे. ही लाच हातात पडताच सुरक्षा रक्षकाचे मन मेणासारखे वितळायचे.

हे बघ भावा, आज सोडून देतोय, उद्यापासून वेळेत यायचे, अशी ताकीद तो डोळा मारत अन् बीडी खिशात सरकवत द्यायचा. हो हो चाचा, नक्कीच, असा खोटा शब्द दोघेही अगदी निष्पाप चेहरा करून द्यायचे... आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच बीडी, तीच लाच अन् तीच वेळ!

'मौलाना घोडी' अन् पानाचा बनाव
AMU मध्ये दोघांना शिया थिओलॉजी हा विषय होता. हा विषय शिकवणाऱ्या मौलाना साहेबांचे खरे नाव बहुदा इतिहासाच्या पानात जमा झाले होते. कारण संपूर्ण युनिव्हर्सिटी त्यांना 'मौलाना घोडी' याच नावाने ओळखायची.

मौलाना साहेबांना पान खाण्याचा प्रचंड शौक होता. त्यांच्याजवळ नेहमी चांदीची चंची असायची. आपल्या वजाहत साहेबांकडे क्लासमधून पळ काढण्याची सर्वात भारी युक्ती हीच होती.

मौलाना साहेब, पान घेऊन येऊ, असा प्रश्न मौलानांचे पान संपत आले की असगर साहेब अत्यंत आज्ञाकारी विद्यार्थ्यासारखे उभे राहून विचारायचे. बस! पानाच्या बहाण्याने एकदा का वर्गाबाहेर सटकले की, थेट दुसऱ्या दिवशीच दर्शन द्यायचे!

प्रॅक्टिकलची शिफारस अन् निम्म्या किंमतीत पुस्तके!
अखेर परीक्षेचे दिवस आले. केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलमध्ये पास होण्याची दूरदूरवर कोणतीही आशा दिसत नव्हती. दोघांनी विचार केला की, थोडी जुगाडबाजी करून पहावी.

दोघे हिंदीच्या एका साध्या-सरळ शिक्षकाला सोबत घेऊन केमिस्ट्रीच्या प्रोफेसरकडे पोहोचले आणि रदबदली सुरू केली. केमिस्ट्रीच्या प्रोफेसर साहेबांनी चष्मा नाकावर सरकवला, दोघांना वरपासून खालपर्यंत निरखले आणि अहो, हे दोघे कोण आहेत, मी तर आजपर्यंत यांना माझ्या क्लासमध्ये पाहिलेसुद्धा नाही, असे तोंडाचा चंबू करत म्हणाले.

हा जबाब ऐकताच शिफारशीच्या फुग्यातील हवाच निघाली. दोघे निराश होऊन बाहेर पडले. नापास होणे अटळ दिसत होते. अशा वेळी दुःख करत बसण्याऐवजी दोघांनी जे केले, ते फक्त तेच करू शकत होते!

त्यांनी क्षणाचाही विलंब न करता केमिस्ट्रीची सर्व नवीकोरी पुस्तके रद्दीवाल्याला निम्म्या किंमतीत विकली. आलेले पैसे खिशात टाकून थेट पेकर हॉटेल गाठले. तिथे पोटभर मुर्ग-मुसल्लमवर ताव मारला, टॉकीजमध्ये जाऊन मस्त सिनेमा पाहिला आणि पुढची ट्रेन पकडून आपापल्या घरी निघून गेले. जिथे पोहोचल्यानंतर दोघांना घरच्यांच्या तुफान ओरड्याचा प्रसाद मिळाला, हे वेगळे सांगायला नको!

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter