देशाला वेड लावणाऱ्या नाशिक ढोलचे जनक गुलाब खान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 54 m ago
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाशिक ढोलचे जनक ८५ वर्षीय गुलाब खान आणि त्यांची टीम
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाशिक ढोलचे जनक ८५ वर्षीय गुलाब खान आणि त्यांची टीम

 

भक्ती चाळक

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या मिरवणूका जगप्रसिद्ध आहेत. या मिरवणुकीत सामील होणाऱ्या ढोल-ताशा मंडळांची बात काही औरच. एक ताल आणि सुरावर भल्याभल्यांना ठेका धरायला लावणारा नाद. या ढोल-ताशांच्या दुनियेत ‘नाशिक ढोल’ ही एक अशी स्वतंत्र शैली आहे, जिची भुरळ फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण देशाला आणि बॉलिवूडलाही पडली आहे. 

तुम्हाला माहितीये का कोट्यवधी लोकांना आपल्या तालावर थिरकवणाऱ्या या नाशिक ढोलचा जनक एक मुस्लिम व्यक्ती आहे. वयवर्षे ८५ पार केलेले गुलाब खान आजही त्याच उत्साहाने ढोल वाजवतात. ‘आवाज-द-व्हॉईस’शी संवाद साधताना गुलाब खान यांनी नाशिक ढोलचा संपूर्ण प्रवास उलगडला.

असा सुरु झाला नाशिक ढोलचा प्रवास
अवघ्या आठ वर्षांचे असताना गुलाब खान इतर मुलांप्रमाणे डबे वाजवून खेळायचे. त्या डब्यांतून निघणाऱ्या धून लोकांना आवडू लागल्या. नाशिकमधील मुस्लीम समाजात, विशेषतः अन्सारी समाजात मोहरमच्या वेळी ढोल वाजवण्याची परंपरा होती. तिथे वाजवल्या जाणाऱ्या तालांचे बारकावे त्यांनी आत्मसात केले.

मोहरमच्या मिरवणुकीत वाजवता वाजवता त्यांच्या तालाची जादू नाशिकच्या सराफ बाजारातल्या सोनार लोकांपर्यंत पोहोचली. त्यांनी गुलाब खान यांना स्वतःच्या कार्यक्रमांत बोलावण्यास सुरुवात केली. तिथून सुरु झाला नाशिक ढोलचा प्रवास.

सुरुवातीच्या काळात उत्पन्नाचे साधन म्हणून ते टांगा चालवायचे. सोबतच त्यांनी ढोल वाजवण्याची आवड जोपासाली. सवंगड्यांना एकत्रित घेऊन कार्यक्रमांमध्ये ढोल वाजवायला सुरुवात केली. मोहरमच्या १० दिवसांत तयार झालेली टीम नंतर विविध संस्कृतींचे ताल शिकू लागली. गुजराती, सिंधी, मारवाडी, पंजाबी लोकसंस्कृतीतील ताल आत्मसात करत त्यांनी नाशिक ढोलला बहुसांस्कृतिक रूप दिले.

त्यानंतर मुंबई, गुजरात, राजस्थान करत ही संपूर्ण टीम देशभरात पोहोचली. १९६०-६५ च्या काळात त्यांच्या ढोलचा आवाज चित्रपटसृष्टीपर्यंत धडकला. १९७९ मधील ‘औलिया इस्लाम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर सुनील दत्त यांच्या ‘काले धंदे गोरे लोग’ या चित्रपटात ते चित्रित झाले. 

अनिल कपूर यांच्या गाजलेल्या ‘राम लखन’ चित्रपटातील गाण्यात वापरलेला ढोलाचा आवाज हा गुलाब खान यांच्याच पथकाचा होता. त्याला डबिंग करून बँडमध्ये वापरण्यात आले होते. इतकेच नाही तर त्या काळात सुनील दत्त यांच्या घरच्या गणपतीमध्ये ढोल वाजवण्याचा मान यांनाच मिळायचा.

सामाजिक सलोख्याबद्दल आणि या प्रवासाबद्दल सांगताना गुलाब खान म्हणतात, “संगीत आणि कलेला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. आम्ही नेहमी प्रत्येक धर्माच्या सणात लोकांचे मन जिंकण्यासाठीच ढोल वाजवला आहे.”
 
गणेशोत्सवात ढोल वाजवण्याची ६५ वर्षांची परंपरा 
गणेशोत्सवात नाशिक ढोलची एन्ट्री कशी झाली, याची कथाही रंजक आहे. मुंबईतील झवेरी बाजारात गणपतीच्या पहिल्या दिवशी ढोल वाजवताना चेंबूरच्या एका मोठ्या शेठजींनी त्यांना पाहिले आणि विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केले. आज चेंबूरच्या ‘श्री गणेश बालमित्र मंडळ’ आणि सिंधी समाजाच्या ‘झूलेलाल मंदिरा’त गुलाब खान यांची तिसरी पिढी गेल्या ६५ वर्षांपासून सलग ढोल वाजवत आहे.

आपल्या बहुविध संस्कृतीच्या तालांबद्दल बोलताना गुलाब खान आवर्जून सांगतात, “आमच्या ढोलवर सिंधी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, राजस्थानी, हैदराबादी आणि मराठी अशा प्रत्येक भाषेनुसार ताल वाजतो. आम्ही सगळ्यांसाठी ढोल वाजवतो, याचा आनंद जास्त आहे.”

डोक्यावर बाटली ठेऊन स्टंट्स
गुलाब खान यांच्या नाशिक ढोलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संगीतासोबत केलेले चित्तथरारक स्टंट्स. समोर कोणी नाचणारे नसले तरी डोक्यावर काचेची बाटली ठेवून डान्स करणे किंवा ढोल घेऊन खाली झोपलेल्या माणसावर दोन-तीन माणसे उभी राहणे, असे कठीण स्टंट्स त्यांची टीम आजही करते. हे कठीण स्टंट्स पूर्ण प्रशिक्षण घेऊनच सुरक्षितरित्या केले जातात.  

ओरिजिनल आणि डुप्लिकेट नाशिक ढोलमधील फरक सांगताना ते म्हणतात, “डुप्लिकेट ढोलवाल्यांना आमच्यासारखे ३-४ तालच येतात. पण आमच्याकडे भरपूर ताल आहेत. आमचे स्टंट्स हे आमचे हुकुमाचे एक्के आहेत, जे इतर कोणीही करू शकत नाही.”

१५० कलाकारांच्या टीममध्ये महिलांचाही सहभाग 
गुलाब खान यांच्या ताफ्यात आज १५० कलाकारांची टीम आहे, ज्यामध्ये २० ते ३० महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या टीममध्ये ४० टक्के मुस्लिमेतर आणि ६० टक्के मुस्लीम कलाकार आहेत. महिलांच्या टीममध्ये तर ३० मुस्लिमेतर आणि १० मुस्लीम महिला आहेत.

इथे प्रशिक्षणात गरीब घरातील तरुण-तरुणींना प्राधान्य देऊन प्रशिक्षण दिले जाते. आज या पथकात काम करणाऱ्या वादकांच्याही तीन-तीन पिढ्या एकत्र ढोल वाजवत आहेत. कॉर्पोरेट इव्हेंट, लग्नसराई, बारसे किंवा मंदिरातले उत्सव... या नाशिक ढोलला वर्षाचे ३६५ दिवस मागणी असते.

देशभक्त घराण्याचा ऐतिहासिक वारसा
गुलाब खान यांचे पुत्र कादिर खान यांनी आपल्या कुटुंबाचा ऐतिहासिक पट मांडला. गुलाब खान हे एका नामांकित आणि सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात.

देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना, इंग्रजांच्या ताब्यातील जागा सोडवण्यासाठी त्यांच्या पूर्वजांनी मोठा लढा दिला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांकडून भाडे मिळणारी ती मोक्याची जागा त्यांच्या आजोबांनी भारत सरकारला वैद्यकीय कॅम्प आणि पोलीस चौकीसाठी मोफत वापरायला दिली. त्या काळातील भाड्याच्या पावत्या आणि ताम्रपट आजही त्यांच्याकडे सुरक्षित आहेत.

नाशिक ढोलची धून
पुण्यात नंतरच्या काळात ‘पुणेरी पथक’ उदयास आल्याने नाशिक ढोलची तिथली मागणी काहीशी कमी झाली असली, तरी मुंबई, गुजरात, कर्नाटक आणि हैदराबादमध्ये आजही गुलाब खान यांच्या नाशिक ढोलचाच बोलबाला आहे.

८५ वर्षे वयातही त्याच ऊर्जेने ढोल वाजवणारे गुलाब खान आणि त्यांची तीन पिढ्यांची टीम हे महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक समृद्धीचे एक चालते-बोलते उदाहरण आहे. आजच्या डीजेच्या जमान्यातही जेव्हा जेव्हा बाप्पाच्या मिरवणुकीत नाशिक ढोलचा गजर होत राहील, तेव्हा तेव्हा एका मुस्लीम अवलियाने रचलेला हा तालांचा इतिहास आसमंतात अमर होत जाईल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter