नवी दिल्ली
नायजेरियातील लागोस येथे सुरू असलेल्या यू-२३ राष्ट्रकुल फेन्सिंग (Fencing) अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत कुल १७ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये चार सुवर्ण, चार रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश असून, भारतीय संघाने पुरुष आणि महिलांच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
रविवारपासून सुरू झालेली ही स्पर्धा १४ ऑगस्टपर्यंत चालणार असून, पहिल्याच दिवशी भारतीय संघाने प्रत्येक प्रकारात दमदार कामगिरी केली. फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सेबर (Sabre), फॉइल (Foil) आणि इपी (Epee) या तिन्ही श्रेणींमधील सर्व सहा वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारताच्या कमीत कमी एका खेळाडूने पदकास गवसणी घातली आहे.
पुरुष संवर्गातील सेबर प्रकारात निखिल वाघ याने सुवर्णपदक पटकावले, तर लक्ष्य बडसरने रौप्य पदक जिंकले. तसेच अश्विनी आर्या आणि लैशराम मोरंबा यांनी कांस्यपदक मिळवले. पुरुष फॉइल प्रकारात तेजस पाटीलने रौप्य आणि हेमाश सनसामने कांस्य पदक जिंकले. महिलांच्या गटातही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके आपल्या नावावर केली. महिलांच्या फॉइल प्रकारात जॉयस अशिताने सुवर्ण तर कनकलक्ष्मीने रौप्य पदक मिळवले. महिलांच्या इपी प्रकारात प्राची लोहानने सुवर्णपदक पटकावले, तर महिलांच्या सेबर प्रकारात जेफरलिनने सुवर्ण आणि आखरीने रौप्य पदक जिंकले.