झुलेखा शकूर रजानी : जेनझीच्या मनाचा वेध घेणाऱ्या मानसिक आरोग्य तज्ज्ञ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 32 m ago
झुलेखा शकूर रजानी
झुलेखा शकूर रजानी

 

सानिया अंजुम

आजच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच हवे असते. झटपट आनंदाच्या या संस्कृतीत आपण इतके गुंतलोय की, मग संयम, स्वतःला समजून घेणे अन् भावनांवर ताबा ठेवणे कठीण का जातेय, हा प्रश्न आपल्यालाच पडतो. याच धावपळीच्या आयुष्यात थोडा थांबून विचार करायला शिकवतात मानसशास्त्रज्ञ झुलेखा शकूर रजानी.

बंगळुरूमधील 'उम्मीद समुपदेशन केंद्रा'च्या क्लिनिकल डायरेक्टर अन् इस्लामिक सायकॉलॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या झुलेखा रजानी मानसशास्त्र आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचा सुंदर मेळ घालतात. ८ हजार तासांहून अधिक काळ समुपदेशन, संशोधन आणि प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या झुलेखा यांचा आजच्या तरुणाईला एकच संदेश आहे, आयुष्यातील अडचणी दुरुस्त करण्याआधी स्वतःला समजून घ्या.

लहानपणीच्या आवडीतून घडलेला सुंदर प्रवास
झुलेखा यांच्यासाठी मानसशास्त्राची वाट निवडणे हा काही एका रात्रीत घेतलेला निर्णय नव्हता. लहानपणापासूनच त्यांना या विषयाची आवड होती. धार्मिक वातावरणात आणि विद्वान व्यक्तींच्या सहवासात वाढल्यामुळे इस्लाम धर्माविषयीचा अभ्यास आणि मानवी मनाचे शास्त्र अशा दोन्ही गोष्टींकडे त्यांचा कल राहिला. अल्लाहाने दिलेल्या सुप्त क्षमता म्हणजेच 'सालाहिया'च्या बळावर हा प्रवास पुढे जात राहिल्याचे त्या मानतात.

हाच प्रवास त्यांना कॅम्ब्रिज मुस्लिम कॉलेजपर्यंत घेऊन गेला. तिथे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत त्यांनी इस्लामिक सायकॉलॉजीचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर शिकागो आणि इस्तंबूल येथील 'खलील सेंटर'मध्ये प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभव घेतला. गेल्या सहा वर्षांपासून त्या या क्षेत्रात अत्यंत सक्रियपणे काम करत आहेत.

भारतातील मानसोपचाराची स्थिती अन् प्रसारमाध्यमे
भारतात अजूनही मानसिक आरोग्याविषयी हवी तशी मोकळी चर्चा होत नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. या परिस्थितीवर भाष्य करताना झुलेखा रजानी सांगतात, "The concept of mental health has been very weak in India."
(भारतात मानसिक आरोग्याची संकल्पना अजूनही खूप कमकुवत आहे.)

विशेषतः मुस्लिम समुदायात मानसोपचार आणि ईमान (श्रद्धा) यांचा समतोल साधत काम करण्याची मोठी संधी त्यांना दिसते. त्या याबद्दल स्पष्टपणे सांगतात, "There is a lot around psychology and iman."
(मानसशास्त्र आणि ईमान यांच्यात जोडणारा खूप मोठा दुवा आहे.)

यासोबतच, प्रसारमाध्यमांमुळे अनेकदा मानसिक आरोग्याबाबत गैरसमज पसरतात, असा मुद्दाही त्या मांडतात. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर बोलताना त्या म्हणतात, "The media plays a very important role in misconceptions regarding mental health."
(मानसिक आरोग्याबाबतच्या गैरसमजांमध्ये मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते.)

आजच्या जेनझी अस्वस्थता
आजची तरुणाई अशा वातावरणात मोठी झालीये जिथे प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची तुलना, त्वरित मिळणारे मनोरंजन अन् ऑनलाईन शॉपिंग यामुळे तरुणांमध्ये उतावीळपणा वाढलाय. या नव्या पिढीच्या मानसिकतेबद्दल निरीक्षण नोंदवताना त्या सांगतात, "There is a lot of urgency in this generation."
(आजच्या या पिढीमध्ये प्रचंड उतावीळपणा आणि घाई दिसून येते.)

या परिस्थितीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान सोडण्याची गरज नाही, तर स्वतःच्या मनात चाललेल्या भावना अन् 'नफ्स' (मनातील सुप्त इच्छा व वासना) समजून घेणे गरजेचे आहे, असे त्या मानतात.

नात्यांमधील बदल आणि आध्यात्मिक दृष्टिकोन
आजकाल पती-पत्नीमधील वाद, मुलांच्या संगोपनाच्या समस्या अन् कौटुंबिक चौकटीतील बदल यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या समस्येवर त्या फक्त पारंपरिक थेरपी न वापरता जैविक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा चारही बाजूंचा विचार करून मार्ग दाखवतात. तरुण, पालक, महिला अन् व्यसनाधीनतेच्या समस्येवर त्यांनी १०० हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल घेत २०२५ मध्ये 'ऑल इंडिया मुस्लिम डेव्हलपमेंट कौन्सिल'ने त्यांना '४० अंडर ४० लीडर्स' या सन्मानाने गौरवले. तसेच २०२६ मध्ये त्यांनी डिजिटल युगात तरुणांच्या मनःस्थितीवर आधारित 'रिट्रेनिंग द नफ्स' या विषयावर मांडलेला संशोधन निबंध खूप गाजला.

वेळेवर मदत घेणे हीच खरी बुद्धिमत्ता!
अनेकदा लोक परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर तज्ज्ञांकडे जातात. पण सुरुवातीलाच घेतलेला सल्ला मोठा त्रास वाचवू शकतो. मदत मागण्याबाबत त्या अगदी सोपा सल्ला देतात, "Don't wait for things to get very bad. One consultation would be helpful."
(परिस्थिती खूप बिघडण्याची वाट पाहू नका. सुरुवातीला घेतलेला एक सल्लाही खूप उपयुक्त ठरू शकतो.)

मानसिक आरोग्य म्हणजे फक्त संकटांचा सामना करणे नाही, तर स्वतःच्या मनाची ओळख करून घेणे, ध्येयाशी पुन्हा जोडले जाणे अन् "आपण नक्की काय बनत आहोत?" या प्रश्नाचा शोध घेणे होय.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter