अंतरा खातून : आर्थिक संकटांवर मात देत मैदान गाजवणारी फुटबॉलपटू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 42 m ago
अंतरा खातून
अंतरा खातून

 

शांतीप्रिय रॉय चौधरी

समाजाचे टोमणे, गरिबीची झळ अन् डोक्यावरून वडिलांचे हरवलेले छत्र... या साऱ्या संकटांनी अंतरा खातून या तरुणीचे फुटबॉल खेळाडू बनण्याचे स्वप्न वारंवार मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की शेवटी मैदानावरचा फुटबॉल सोडून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तिला कपड्याच्या दुकानात नोकरी पत्करावी लागली. पण खेळावरचे अथांग प्रेम आणि जिद्द तिला पुन्हा एकदा हिरव्या मखमली मैदानावर ओढून घेऊन आली आहे.

पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील शंकरपूर येथील उखरा पुजारी फुटबॉल कोचिंग कॅम्पमध्ये सराव करणारी अंतरा ही एक अत्यंत होतकरू फुटबॉलपटू आहे. अपयशाच्या अन् संघर्षाच्या गर्तेतून बाहेर पडत ती आता आपले क्रीडा क्षेत्रातील करिअर पुन्हा एकदा नव्याने उभे करत आहे. तिची ही रोमहर्षक कहाणी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खेळात नाव कमवू पाहणाऱ्या असंख्य तरुण मुलींसाठी एक मोठा आशेचा किरण ठरत आहे.

सामाजिक पूर्वग्रहांच्या वादाळात अडकलेले स्वप्न
लहान वयातच अंतराला फुटबॉलचे प्रचंड वेड लागले. तिने प्रशिक्षक तीर्थ चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. अंतराची मेहनत, चिकाटी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा पाहून प्रशिक्षकांनी तिच्यातील सुप्त प्रतिभा लगेचच ओळखली. पण एका साध्या घरातल्या मुलीसाठी फुटबॉलपटू बनण्याचा हा रस्ता मुळीच सोपा नव्हता.

एका मुलीने फुटबॉल खेळावा, हे पाहताच शेजाऱ्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील मुलीने मैदानावर धावपळ का करावी, असा सवाल उपस्थित केला गेला. तिला खेळापासून दूर करून तिचे लग्न लावून देण्याचा सल्लाही तिच्या आई-वडिलांना देण्यात आला. खेळ हा केवळ मुलांसाठी असतो, मुलींचे मैदानावर काही काम नाही, अशीच बहुतेकांची धारणा होती. याशिवाय हिजाब आणि बुरखा घालून खेळण्यावरूनही अनेकांनी तिच्यावर आक्षेप घेतला.

तिचे वडील शेख अली एका छोट्या खाजगी कंपनीत काम करायचे आणि आई गृहिणी होती. घरात तुटपुंजं उत्पन्न असल्यामुळे फुटबॉलसाठी लागणारे मूलभूत साहित्य खरेदी करणेही या कुटुंबाच्या आटोक्याबाहेरचे होते.

फूटबॉलचे योग्य बूट विकत घेणेही अंतराला परवडत नसे. शाळेच्या गणवेशाखाली ट्रॅक पँट आणि भावाचे जुने, फाटलेले कॅनव्हासचे शूज घालून ती मैदानाची वाट धरायची. कधी कधी तर कोणाला कळू न देता छुप्या पद्धतीने तिला सरावाला जावे लागायचे. पण तिने आपल्या स्वप्नांशी किंवा विचारांशी कधीही तडजोड केली नाही.
 
हिजाब घालून खेळण्याबाबत जेव्हा जेव्हा तिच्यावर टीका झाली, तेव्हा अंतराने दिलेले उत्तर सर्वांचे डोळे उघडणारे होते, "माझ्या डोक्यावर हिजाब आहे, माझ्या पायांवर नाही. मला माझ्या पायांनी खेळू द्या!"

तिचे हे शब्द तिच्यातील प्रचंड आत्मविश्वासाची साक्ष देणारे होते. समाजाने उभारलेल्या भिंतींपेक्षा स्वतःच्या कौशल्याच्या बळावर ओळख निर्माण करण्याचा तिचा हा ठाम निर्धार होता.
 

रमझानच्या रोज्यांमध्येही सुरूच राहिला सराव
रमझानच्या पवित्र महिन्यातही अंतराची खेळाप्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. दिवसभर कडक रोजा ठेवल्यानंतर संध्याकाळी इफ्तार झाल्यावर ती तडक सरावासाठी मैदानावर पोहोचायची.

उपवास धरून असा कडक सराव करणे शरीरासाठी अत्यंत थकवणारे ठरू शकते, असा इशारा प्रशिक्षकांनी तिला दिला होता. पण अंतराने सराव थांबवण्यास साफ नकार दिला आणि आपली मेहनत सुरूच ठेवली. तिच्या या अफाट मेहनतीचे फळ लवकरच तिला क्रीडा क्षेत्रातील संधी आणि यशाच्या रूपाने मिळू लागले.

२०२३ मध्ये तिने उखरा कुंजबिहारी हायस्कूलचे प्रतिनिधित्व करताना सुब्रतो कप स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सहभाग घेतला. या संघात साईड-बॅक डिफेंडर म्हणून खेळताना तिने पश्चिम वर्धमान जिल्हा अजिंक्यपद पटकावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

२०२४ मध्ये तिने हळदिया येथे आयोजित १७ वर्षांखालील स्पर्धेत पश्चिम वर्धमान जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय दुर्गापूर लीगमध्येही ती खेळली आणि अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अंतरासाठी या सर्व संधी म्हणजे फुटबॉल जगतात स्वतःचे नाव कमावण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल होते. पण यशाचे हे शिखर गाठत असतानाच तिच्या आयुष्यात एक भयंकर दुर्दैवी घटना घडली.

वडिलांचे छत्र हरवले अन् मैदान सुटले
वडिलांच्या अचानक झालेल्या निधनाने अंतरा पूर्णपणे खचून गेली. या दुःखातून सावरणे कठीण असतानाच कुटुंबावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला. तिचा भाऊ गॅरेजमध्ये काम करून जेमतेम पैसे कमवत होता, पण एवढ्या तुटपुंज्या उत्पन्नात पूर्ण घराचा खर्च भागवणे अशक्य होते. कुटुंबाला या कठीण प्रसंगी सावरण्याची जबाबदारी अंतरावर आली. शेवटी अत्यंत जड अंतःकरणाने तिने फुटबॉलचा सराव सोडण्याचा आणि नोकरी शोधण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला.

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी तिने स्थानिक कपड्यांच्या दुकानात कामाला सुरुवात केली आणि आपल्या खेळाच्या स्वप्नांना तात्पुरती मूठमाती दिली.

सामाजिक टोमणे आणि गरिबीशी लढा देत ज्या खेळासाठी तिने रक्ताचे पाणी केले होते, तोच खेळ सोडावा लागणे हा तिच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. पण परिस्थितीपुढे तिचे काहीच चालत नव्हते. मात्र, तिचे प्रशिक्षक तीर्थ चॅटर्जी तिची ही प्रतिभा अशी वाया जाऊ देण्यास तयार नव्हते.

प्रशिक्षकाच्या आधाराने पुन्हा मैदानावर पुनरागमन
अंतरामधील अफाट क्षमता ओळखून आणि तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून, चॅटर्जी यांनी तिला पुन्हा मैदानात आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.

त्यांनी कपड्याच्या दुकानाच्या मालकाशी थेट संवाद साधला आणि अंतराला दररोज सरावासाठी दोन तास देण्याची विनंती केली. सुदैवाने दुकान मालकानेही सहकार्य दाखवले आणि तिची नोकरी सांभाळून सरावाची परवानगी दिली. या सुवर्णसंधीमुळे अंतराला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची संधी मिळाली.

तिचे हे पुनरागमन केवळ सराव सुरू करण्यापुरते मर्यादित नाही. वारंवार कसोटी पाहणाऱ्या परिस्थितीसमोर हार न मानत स्वतःचे स्वप्न जिवंत ठेवणाऱ्या एका जिद्दी तरुणीची ही कहाणी आहे. आर्थिक अडचणींमुळे एकेकाळी खेळ सोडावा लागलेली तीच मुलगी आज पुन्हा एकदा या खेळात आपले स्थान निर्माण करण्यासाठी जिद्दीने उभी राहिली आहे.

प्रशिक्षक चॅटर्जी यांना तिच्या भविष्याबद्दल खूप आशा आहेत. नियमित सराव आणि योग्य संधी मिळाल्यास अंतरा पुन्हा एकदा जुन्या फॉर्मात येईल आणि खूप मोठी मजल मारेल, असा विश्वास त्यांना वाटतो. अंतरानेही आशा सोडलेली नाही.

"सर मला पुन्हा मैदानावर घेऊन आले आहेत. माझ्याकडे काहीतरी करून दाखवण्याची ताकद आणि जिद्द आहे. आता बघूया मी किती लांबपर्यंत मजल मारू शकते," असे ती आत्मविश्वासाने सांगते.

पुढचा खडतर प्रवास
अंतराला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तिची ही कहाणी हेच सिद्ध करते की केवळ प्रतिभा असून चालत नाही, तर यशाचा मार्ग सरळ नसतो. गरीब कुटुंबातील तरुण खेळाडूंना त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण आधाराची गरज असते. ज्या मुलींना त्यांच्या कपड्यांवरून किंवा पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळात उतरल्यामुळे सामाजिक तिरस्काराला सामोरे जावे लागते, त्यांच्यासमोरील आव्हाने दुप्पट असतात.

अशा वेळी गुणवत्तेची पारख करून व्यावहारिक अडचणींवर मात करण्यास मदत करणाऱ्या मार्गदर्शकाचे महत्त्व किती मोठे असते, हे अंतराच्या अनुभवातून स्पष्ट होते. तिच्या प्रशिक्षकाच्या एका निर्णयामुळे तिला तिच्या आवडत्या खेळात पुनरागमन करण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आपले फुटबॉल करिअर पुन्हा एकदा सावरताना नियमित सराव, आर्थिक स्थिरता आणि तिला पाठिंबा देणारे वातावरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

डोक्यावर हिजाब आणि डोळ्यांत फुटबॉलच्या मैदानावरील यशाचे स्वप्न घेऊन अंतरा खातून पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. तिची ही वाटचाल एकच प्रेरणादायी संदेश देते: परिस्थितीने स्वप्ने कितीही दूर लोटली, तरी योग्य पाठिंबा मिळाल्यास ती स्वप्ने पुन्हा नक्कीच जिवंत करता येतात.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News