झेहरा नकवी : वैयक्तिक स्वातंत्र्यावर परखड मते मांडणारी लेखिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
झेहरा नकवी
झेहरा नकवी

 

ओनिका माहेश्वरी 

साहित्य आणि समाजात जेव्हा कधी मातृत्व किंवा आई असण्याबद्दल चर्चा होते, तेव्हा नेहमीच एका सुंदर, आदर्शीकृत प्रतिमेची चौकट समोर ठेवली जाते. पण या पारंपरिक साच्याला धाब्यावर बसवून आपली रोखठोक मते मांडणारी एक व्यासंगी लेखिका, कवयित्री आणि स्वतंत्र पत्रकार सध्या लक्ष वेधून घेत आहेत, त्या म्हणजे ज़ेहरा नक़वी. 

समाज नेहमी महिलांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतो की त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वोच्च कर्तव्य म्हणजे एक 'आई' असणे. पण या धारणेला आव्हान देत ज़ेहरा स्पष्टपणे मानतात की, कोणत्याही स्त्रीची पहिली आणि खरी ओळख एक स्वतंत्र माणूस म्हणून असते. गेल्या एका दशकाहून अधिक काळ जेंडर, साहित्य आणि सामाजिक-राजनीतिच्या विविध मुद्द्यांवर परखडपणे लिहिणाऱ्या ज़ेहरा नक़वी यांचे लेखन महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आईच्या मर्यादित चौकटीत पाहण्याऐवजी त्यांच्या संपूर्ण मानवीय अस्तित्वाच्या नात्याने समजून घेण्याची जोरदार वकिली करते.
 

अलिगड मुस्लिम यूनिवर्सिटीचा सुवर्णकाळ
ज़ेहरा नक़वी यांच्या वैचारिक आणि शैक्षणिक जडणघडणीत अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटीचा मोठा वाटा आहे. तिथून पत्रकारितेचे शिक्षण घेताना त्यांनी तब्बल चार सुवर्णपदके (गोल्ड मेडल) पटकावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. पण अलीगड त्यांच्यासाठी केवळ पदव्या मिळवण्याचे ठिकाण नव्हते, तर तिथे त्यांच्या विचारांना मोठी क्षितिजे मिळाली आणि सर्जनशीलतेला खुले आकाश लाभले. शालेय जीवनापासूनच कविता लिहिण्याची आवड असलेल्या नक़वी यांनी युनिव्हर्सिटीच्या काळात नाटक, संगीत आणि सर्जनशील लेखनात आपले विशेष प्राविण्य दाखवले.

तिथल्या फ्रेशर्स पार्टीदरम्यान त्यांनी सादर केलेली 'ओ अब्दुल्ला' ही कविता आजही लोकांच्या स्मरणात आहे. वुमन्स कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करतात. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हा नसून, स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि जगाला स्वतःच्या नजरेतून पाहण्याची क्षमता निर्माण करणे हा आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
 

अभिव्यक्तीचे स्वतंत्र व्यासपीठ
ज़ेहरा यांच्या लेखनशैलीची एक वेगळीच गंमत आहे. त्यांना मध्यरात्रीपासून ते अगदी सकाळी सूर्य उगवेपर्यंतच्या शांत वेळेत लिहायला आवडते. दिवसभर मुलांमागे आणि संसारात धावपळ केल्यानंतर रात्रीचे हे शांत क्षणच त्यांना मनापासून सुखावतात. दिवसभरात मनात आलेले विचार त्या आपल्या मोबाईलच्या नोटपडमध्ये पटकन टिपून ठेवतात आणि जेव्हा लिहायला बसतात, तेव्हा उर्वरित जगापासून पूर्णपणे तोडून आपल्या शब्दांच्या विश्वात हरवून जातात.

त्यांच्या लेखनाचे मुख्य ध्येय सत्याचा शोध घेणे आणि ते कोणत्याही भीतीशिवाय किंवा लाजेविना लोकांसमोर मांडणे हे आहे. त्यांचे विचारप्रधान लेख आणि ओघवते कॉलम 'इंडियन एक्सप्रेस', 'द हिंदू', 'रीडर्स डायजेस्ट', 'द वायर', 'आउटलुक', 'द क्विंट', 'फायनान्शियल क्रॉनिकल', 'चाइल्ड मॅगझीन' आणि 'विमेंस वेब' यांसारख्या देश-विदेशातील नामांकित वृत्तपत्रे आणि पोर्टलवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात.
 

वास्तवाचे दाहक सत्य
हे हाउस प्रकाशन संस्थेकडून प्रसिद्ध झालेले त्यांचे पहिले संस्मरण पुस्तक 'द रिलक्टेंट मदर: अ स्टोरी नो वन वांट्स टू टेल' मातृत्व अशा एका बाजूला प्रकाश टाकते, ज्याच्याकडे समाज नेहमी डोळेझाक करतो. हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातील अशा तीन वर्षांच्या अनुभवांवर आधारित आहे, ज्यामध्ये मुलाच्या जन्मापासून ते सुरुवातीच्या मातृत्वकाळातील संघर्षाचा प्रवास अत्यंत प्रामाणिकपणे मांडण्यात आला आहे.

नवीन जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यामध्ये ताळमेळ बसवताना मेटाकुटीस आलेल्या एका तरुण मुलीची ही कहाणी आहे. समाज एका आईकडून प्रत्येक गोष्टीत त्यागाची अपेक्षा करतो, पण ज़ेहरा अगदी स्पष्टपणे सांगतात की आई होण्याच्या या सुंदर प्रवासात प्रेमासोबतच प्रचंड थकवा, चीडचीड, ताणतणाव, एकटेपणा आणि स्वतःची ओळख हरवून बसण्याची भीतीही दडलेली असते. या भावना मनात आल्याने कोणतीही स्त्री वाईट आई ठरत नाही, कारण शेवटी आईसुद्धा एक माणूसच असते आणि तिच्याही काही मर्यादा व इच्छा असू शकतात, या वास्तवावर त्यांनी बोट ठेवले आहे.
 

स्वतंत्र अस्तित्वाची पायाभरणी
ज़ेहरा नक़वी यांचे स्पष्ट मत आहे की बाळ झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचे वैयक्तिक विश्व किंवा तिचे करिअर तिथेच संपून जाता कामा नये. विवाहसंस्था, नातेसंबंधांमधील जवळीक, आर्थिक स्वावलंबन आणि महिलांचे करिअर या विषयांवर त्या अत्यंत मोकळेपणाने लिहितात. त्यांच्या मते, नोकरी किंवा करिअर म्हणजे केवळ पैसे कमावण्याचे साधन नाही, तर तो प्रत्येक महिलेच्या आत्मसन्मानाचा आणि अस्तित्त्वाचा प्रश्न आहे.

त्याचप्रमाणे शिक्षणाला केवळ पदवी पुरते मर्यादित न मानता ती आत्मनिर्णयाची खरी मुक्ती मानतात. देशाच्या किंवा समाजाच्या प्रगतीचे मोजमाप केवळ जीडीपी किंवा तंत्रज्ञानाच्या जोरावर न करता, तिथे किती प्रमाणात लैंगिक समानता आणि सामाजिक न्याय आहे, यावरून झाले पाहिजे, अशी जोरदार मागणी त्या करतात.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला सन्मान
त्यांच्या या निडर आणि दर्जेदार लेखनाची दखल घेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचांनी त्यांचा गौरव केला आहे. त्यांना वर्ष २०२० आणि २०२१ साठी प्रतिष्ठित 'I.N.S.P.I.R.E रायटर ऑफ द ईयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय उत्तर प्रदेशातील १०० सर्वात प्रेरणादायी मुस्लिम महिलांच्या 'RBTC' यादीत त्यांचे नाव आवर्जून सामील करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, राज्याच्या यशस्वी महिलांवर राज्यसभेच्या टीव्हीसाठी बनवलेल्या माहितीपटातही (डॉक्युमेंट्री) त्यांचा समावेश होता.

ज़ेहरा नक़वी यांचे आजवरचे संपूर्ण लेखन वाचकांना एकाच मूलभूत प्रश्नाजवळ आणून सोडते की आपण खरोखरच महिलांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या ओळखीसह स्वीकारण्यासाठी तयार आहोत का? अशी ओळख जी त्यांनी स्वतः आपल्या हक्काच्या शब्दांत कोरली आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter