Mushtaq Khan Passes Away: ५०० हून अधिक चित्रपटांत काम केलेले अभिनेते मुश्ताक खान यांचे कॅन्सरने निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 33 m ago
अभिनेते मुश्ताक खान
अभिनेते मुश्ताक खान

 

मुंबई 

‘वेलकम’, ‘गदर’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी (कॅन्सर) लढा देत होते आणि मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली असून दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर भावूक श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सेलिब्रिटींकडून मुश्ताक खान यांना श्रद्धांजली

चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ गाजवणाऱ्या मुश्ताक खान यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये संस्मरणीय सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अभिनेते राजपाल यादव यांनी आठवणींना उजाळा देत म्हटले की, दुपारीच ते मुश्ताक भाईंना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी संवाद साधला होता. ते एवढ्या लवकर सोडून जातील यावर विश्वासच बसत नाहीये.

दिग्दर्शक अनिस बासमी यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत म्हटले, "मुश्ताक भाईंच्या जाण्याने मी सुन्न आणि निःशब्द झालो आहे. ते एक खरोखर उल्लेखनीय कलाकार आणि सुंदर व्यक्ती होते." अभिनेता सनी देओलने त्यांना एक उत्तम अभिनेता आणि चांगला माणूस म्हणून स्मरण केले, तर संजय मिश्रा यांनीही त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.

मुश्ताक खान यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मोहसीन आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा अंतविधी शुक्रवारी पार पडणार आहे.