शोम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातलं प्राचीन शहर 'गौर' ही पूर्वी बंगालची राजधानी होती. त्याचबरोबर भारतीय उपखंडातल्या सुफी अध्यात्म आणि इस्लामिक संस्कृतीचं ते खूप महत्त्वाचं केंद्रही होतं. मध्ययुगीन गौर आणि शेजारच्या पांडुआ भागात सुफी परंपरेची मोठी भरभराट झाली. या परंपरेने बंगालचा धार्मिक इतिहास, तिथला समाज, संस्कृती आणि जातीय सलोख्यावर खोलवर प्रभाव टाकला. गौरच्या अवशेषांमध्ये आज अनेक खानकाह, दर्गे आणि प्राचीन वास्तू विखुरलेल्या अवस्थेत आहेत. या वास्तू त्या गौरवशाली भूतकाळाची आजही साक्ष देतात.
बंगालमध्ये तेराव्या शतकात सुफी संतांचं आगमन सुरू झालं. इस्लामचा प्रसार करण्यासोबतच त्यांनी बंगालच्या विविध भागांमध्ये खानकाह स्थापन केल्या. मानवतावादी सेवा, शिक्षण, गरिबांना मदत आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्याचं मोठं काम त्यांनी यातून केलं. लवकरच गौर आणि पांडुआ ही या सर्व उपक्रमांची मुख्य केंद्रं बनून समोर आली. सुफी संतांनी याच भागात धार्मिक शिक्षण, आध्यात्मिक साधना आणि मानवतावादी कार्याची सुंदर सांगड घातली. त्यांनी समाजासमोर नवा आदर्श उभा केला, असं इतिहासकारांचं मत आहे.
गौरच्या सुफी परंपरेच्या अगदी सुरुवातीला शेख जलालुद्दीन तब्रीजी यांचं नाव सर्वात आधी आदराने घेतलं जातं. हे सुफी संत इराणमधल्या तब्रीज इथून आले होते. तेराव्या शतकात ते बंगालमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पांडुआ इथे आपली खानकाह स्थापन केली. धार्मिक शिक्षणासोबतच त्यांनी गरिबांसाठी निवारा, मोफत अन्न आणि विविध मानवतावादी उपक्रम सुरू केले. त्यांनी स्थापन केलेला 'बडो दर्गा' आजही पूर्व भारतातल्या सर्वात महत्त्वाच्या सुफी तीर्थक्षेत्रांपैकी मानला जातो.

त्यानंतर अखी सिराजुद्दीन उस्मान यांनी गौरमध्ये चिश्ती परंपरेच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. ते दिल्लीचे प्रसिद्ध सुफी संत निजामुद्दीन औलिया यांचे शिष्य होते. बंगालमध्ये परतल्यानंतर त्यांनी गौर आणि पांडुआ इथे सुफीवादाच्या आदर्शांचा मोठा प्रसार केला. तसंच तिथे चिश्ती परंपरेचा पाया भक्कम केला. त्यांचा मकबरा आजही गौरमधल्या सागरदिघीजवळ स्थित आहे. स्थानिक लोक त्यांना "पिरान-ए-पीर" किंवा "पुरण पीर" म्हणून खूप मानतात. दरवर्षी त्यांच्या उरुसाला असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने तिथे एकत्र येतात.
अखी सिराजुद्दीन यांच्या प्रमुख शिष्यांपैकी मखदूम शेख अलाउल हक हे होते. त्यांनी पांडुआमध्ये खानकाह स्थापन केली. त्यानंतर शिक्षण, समाजसुधारणा आणि मानवतावादी सेवेचं काम त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे संघटित केलं. त्यांचे सुपुत्र नूर कुतूबुल आलम यांनी या परंपरेचा आणखी विस्तार केला. मध्ययुगीन बंगालचे सुलतानही त्यांचा खूप आदर करत असत. विविध सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर ते या संतांचा सल्ला आवर्जून घेत असत.
गौरमधल्या खानकाहचं वैशिष्ट्य म्हणजे मानवतेच्या सेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी होय. या संस्थांमध्ये धर्म, जात किंवा वांशिक ओळखीवरून माणसाची किंमत ठरत नसे. तिथे मानवता हीच माणसाची सर्वात मोठी ओळख होती. प्रवाशांना निवारा, भुकेल्यांना अन्न, गरिबांना मदत आणि नैतिक शिक्षण देणं, हा या संस्थांचा मुख्य पाया होता. सुफी संतांसाठी मानवतेचं कल्याण हीच सर्वोच्च भक्ती होती. याच दृष्टिकोनावरून सुफी संतांना बंगालच्या सामान्य लोकांमध्ये मोठी पसंती आणि मान्यता मिळाली.

गौरच्या सुफी वारशाशी अनेक लोकपरंपरादेखील जोडलेल्या आहेत. स्थानिक समजुतीनुसार, अनेक लोक आजही नवस करायला विविध दर्ग्यांवर जातात. आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते कृतज्ञता व्यक्त करायला तिथे पुन्हा येतात. अशा समजुतींना प्रत्येक वेळी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार मिळत नाही. तरीही या गोष्टी बंगालच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानल्या जातात.
आज गौरमधले अनेक ऐतिहासिक दर्गे आणि खानकाह यांना मोठं पुरातत्वीय महत्त्व प्राप्त झालंय. अखी सिराजुद्दीन यांचा दर्गा, शाह जलालुद्दीन तब्रीजी यांचा बडो दर्गा, एकलाखी मकबरा, अदिना मशीद आणि इतर मध्ययुगीन वास्तू याच ऐतिहासिक वारशाचा भाग आहेत. हा प्रदेश भारतातल्या आणि परदेशातल्या संशोधक, इतिहासकार व पर्यटकांना आजही मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतोय.
इतिहासकारांच्या मते मात्र वेगळीच बाब समोर येते. गौरच्या सुफी वारशाशी संबंधित अनेक मौल्यवान कागदपत्रं, हस्तलिखितं आणि मौखिक परंपरांचं अद्याप योग्य प्रकारे जतन झालेलं नाही. आधुनिक संशोधन, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि वारसा संवर्धनासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. गौरचा सुफी वारसा हा धार्मिक इतिहास तर आहेच शिवाय तो बंगालचा बहुलवाद, मानवता आणि सामाजिक सलोख्याचा अमूल्य पुरावा आहे.
हेही वाचा: पांडुआची खानकाह: प्रेम, शिक्षण आणि सेवेचा सात शतकांचा सुफी वारसा
गौरच्या अवशेषांमधल्या शांततेतही मोठा संदेश घुमताना जाणवतो. राजवाडे कोसळून पडतील आणि साम्राज्यं नष्ट होतील, पण सुफी संतांनी मागे ठेवलेला प्रेम, सेवा आणि सलोख्याचा संदेश कधीही नष्ट होऊ शकत नाही, हीच ती मोठी घोषणा आहे. याच कारणामुळे गौर बंगालच्या इतिहासात आध्यात्मिक प्रकाशाचा अनोखा दीपस्तंभ म्हणून आजतागायत ताठ मानेने उभा आहे.