Bank Strike Update: बँक कर्मचाऱ्यांच्या ३ दिवसीय संपामुळे ग्राहकांसाठी मोठा निर्णय; रविवारीही सुरू राहणार बँका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 18 m ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँका रविवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ५ दिवसांच्या बँकिंग आठवड्यासह विविध मागण्यांसाठी आगामी २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारला आहे. हा प्रस्तावित संप महिन्याच्या शेवटी आणि बँकांच्या सहामाही क्लोजिंगच्या (half-yearly closing) काळात होत आहे. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने, ग्राहकांना सलग तीन दिवस बँकिंग सेवांपासून वंचित राहावे लागू नये म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे.

आरबीआयकडून मंजुरी प्राप्त

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने स्पष्ट केले की, २७ सप्टेंबर २०२६ रोजी रविवार असूनही सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, एटीएम-लिंक शाखा आणि चलन तिजोऱ्या (currency chests) पूर्णपणे सुरू राहतील. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आवश्यक मंजुरी दिली आहे.

दरम्यान, संप टाळण्यासाठी सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून युनियनशी चर्चा सुरू असून ग्राहकांनी शक्यतो डिजिटल चॅनेल किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करावा, असे आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे.