नवी दिल्ली
अमेरिकेतील न्यायालयाने उद्योगपती आणि अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी तसेच त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावरील फौजदारी आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कथित फसवणूक आणि लाचखोरीच्या कायदेशीर प्रक्रियेचा अंत झाला आहे. न्यू यॉर्कच्या पूर्व जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती निकोलस गाराउफिस यांनी न्याय विभागाचा (DoJ) खटला मागे घेण्याचा अर्ज मंजूर केला.
न्यायालयाने हा खटला कायमस्वरूपी (With Prejudice) फेटाळला आहे, याचा अर्थ हे आरोप भविष्यात पुन्हा दाखल करता येणार नाहीत. नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकन फिर्यादींनी अदानी समूहावर सौर ऊर्जा करारांसाठी भारतीय अधिकाऱ्यांना कथित लाच दिल्याचा आरोप केला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकन न्याय विभागाने हा खटला पुढे चालवणे न्यायाच्या हितसंबंधात नसल्याचे स्पष्ट करत मागे घेतला.
या निकालानंतर गौतम अदानी यांनी एक्स (X) वर पोस्ट करत न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि सत्य समोर आल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण कठीण काळात ज्यांनी विश्वास कायम ठेवला, त्यांचे त्यांनी आभार मानले असून देशासाठी काम करत राहण्याची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अदानी समूहाने सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण नियमांचे पालन केल्याचे स्पष्ट केले होते.