जितेंद्र पुष्प , गयाजी- बिहार
बिहारमधल्या गया शहराची ओळख पूर्वजांसाठी केल्या जाणाऱ्या 'पिंडदान' या हिंदू विधीमुळे आणि प्रसिद्ध विष्णुपद मंदिरामुळे तर आहेच. शिवाय या पवित्र भूमीवर सुफी दर्गाही उभा आहे. तिथे सर्व धर्मांचे लोक आयुष्यातल्या निराशेच्या प्रसंगी येतात आणि शांती व आशेची नवी भावना घेऊन परत जातात. फल्गू नदीच्या तीरावर वसलेली खानकाह बीठो शरीफ ही श्रद्धा, माणुसकी आणि संमिश्र गंगा-जमुनी संस्कृतीचं जिवंत प्रतीक बनलीय. गया शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेली ही खानकाह-दर्गा अनेक शतकांपासून लोकांच्या श्रद्धेचं मुख्य केंद्र राहिलीय. हजरत मखदूम सय्यद शाह दुर्वेश अश्रफ यांच्या प्रार्थनेतून मानसिक त्रास, असाध्य आजार आणि जीवनातल्या विविध संकटांपासून मुक्ती मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे. याच उद्देशाने लोक दररोज दूरदूरवरून या पवित्र स्थानाला भेट द्यायला येतात. काही लोक स्वतःच्या दुःखातून मुक्ती मिळवायला येतात, तर काही लोक मनाच्या शांततेच्या शोधात तिथे पोहोचतात.
बीठो शरीफचा इतिहास सुमारे ६०० वर्षं जुना मानला जातो. हजरत मखदूम सय्यद शाह दुर्वेश अश्रफ इराणमधून भारतात आले, असं सांगितलं जातं. ते प्रख्यात सुफी संत होते. त्यांनी पायी हज यात्रा पूर्ण केली होती, असंही मानलं जातं. इसवी सन १४४३ मध्ये त्यांनी तिथे खानकाह, मशीद आणि हुजरा (ध्यान करण्यासाठी छोट्या खोल्या) स्थापन केल्या. काळाच्या ओघात हे ठिकाण सुफी परंपरेचं महत्त्वाचं केंद्र बनलं. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या गावाला मूळतः विठूर म्हणून ओळखलं जायचं. त्यानंतर हजरत मखदूम यांनी त्याचं नाव बेथू शरीफ असं ठेवलं. पुढे ते बीठो शरीफ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज हे गाव जातीय सलोख्याचा आदर्श म्हणून प्रसिद्ध आहे.
या गावचं सर्वात मोठं वैशिष्ट्य तिथलं सामाजिक वातावरण आहे. गावाची लोकसंख्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जवळपास समसमान विभागलीय. तरीही तिथे कधीही धार्मिक तणाव निर्माण झाल्याची नोंद नाही. दोन्ही समुदायांचे सदस्य एकमेकांच्या सणांमध्ये आणि परंपरांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्याच वेळी सर्व धर्माचे लोक दर्ग्यात येऊन आपला आदर व्यक्त करतात. म्हणूनच बीठो शरीफला भारताच्या संमिश्र सांस्कृतिक परंपरेचं म्हणजेच गंगा-जमुनी तहजीबचं प्रतीक मानलं जातं. खानकाह आणि दर्ग्याचे विद्यमान गद्दीनशीन सय्यद शाह अरबाब अश्रफ याबद्दल माहिती देतात. “हे केवळ धार्मिक स्थळ नाहीये, तर ते मानवतेचं आश्रयस्थान आहे. इथे भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी याचे दरवाजे नेहमी उघडे असतात. धर्म, जात किंवा भाषेचा कोणताही अडथळा इथे नाही. लोक इथे प्रार्थना करायला येतात आणि शांततेची भावना घेऊन परत जातात”, असं ते म्हणतात.

सय्यद शाह अरबाब अश्रफ यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी अनेक पिढ्या खानकाह आणि दर्ग्याचे गद्दीनशीन म्हणून काम पाहिलंय. त्यांचे वडील शाहीद शाह हे गया महाविद्यालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. कोविड-१९ च्या साथीच्या आजारात वडिलांच्या निधनानंतर अश्रफ यांनी गद्दीनशीन म्हणून ही जबाबदारी स्वीकारली. दर्ग्याशी जोडलेल्या अनेक कथा स्थानिक लोक आजही आवर्जून सांगतात. डॉक्टरांनी पूर्णपणे आशा सोडलेले रुग्ण या पवित्र स्थानाला भेट दिल्यानंतर बरे झाले, असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. काही लोकांना मानसिक आजार होते. तर काहींना वाईट शक्तींचा त्रास होता, असं मानलं जायचं. दर्ग्याला भेट दिल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, अशी माहिती स्थानिक लोक देतात. अशा कथांनी भाविकांची श्रद्धा अधिकच दृढ केलीय.
संध्याकाळच्या वेळी बीठो शरीफचं वातावरण मनमोहक बनतं. फल्गू नदीच्या तीरावर वाहणारा थंड वारा, दर्ग्यातले लुकलुकणारे दिवे आणि प्रार्थनेचे कोमल व लयबद्ध सूर संपूर्ण परिसराला आध्यात्मिक वलयाने भरून टाकतात. अनेक भाविक तिथे तासन्तास बसून प्रार्थना करतात. तर इतर लोक डोळे मिटून शांत चिंतनात हरवून जातात. दर्गा संकुलात हजरत मखदूम सय्यद शाह दुर्वेश अश्रफ, त्यांच्या पत्नी बीबी जान मलक आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या कबरी आहेत. तिथे प्राचीन दिवादेखील जतन करून ठेवलेला आहे. शतकानुशतकं जुना मानला जाणारा हा दिवा आजही दररोज संध्याकाळी पेटवला जातो. भाविक याला आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रकाशाचं प्रतीक मानतात.

तिथे दरवर्षी उरूस आयोजित केला जातो. त्यावेळी बीठो शरीफ वेगवेगळ्या उपक्रमांनी जिवंत होतं. केवळ बिहारमधूनच नाही, तर झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि नेपाळमधूनही मोठ्या संख्येने भाविक तिथे पोहोचतात. पाच दिवसांच्या या सोहळ्यात चादरपोशी (चादर चढवणं), कव्वालीचे कार्यक्रम, कुराण-ख्वानी (कुराण पठण) आणि लंगर (सामूहिक भोजन) अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.
हेही वाचा: बंगालच्या इतिहासातला अनोखा अध्याय: गौरचा सुफी वारसा!
उरुसादरम्यान भाविकांना हजरत मखदूम यांच्याशी जोडलेल्या पवित्र वस्तू पाहण्याची संधी मिळते. यात त्यांचे कपडे, टोपी आणि तस्बीह (प्रार्थनेची माळ) यांचा समावेश असतो. भाविक आदराने या पवित्र वस्तूंचं दर्शन घेतात. रात्रभर दर्गा प्रार्थना आणि कव्वालीच्या सुरांनी दुमदुमून जातो. त्यातून भक्ती आणि आध्यात्मिक उत्साहाचं सुंदर वातावरण तिथे निर्माण होतं.