जम्मू
जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या' (IFFJK) माध्यमातून केंद्रशासित प्रदेशाच्या सांस्कृतिक प्रवासात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. आगामी ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवामुळे परिसरातील कला, संस्कृती आणि संवादाला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महोत्सवाच्या पूर्वतयारी निमित्त माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे (DIPR) आयोजित 'फ्रेम बाय फ्रेम: द स्टोरीटेलर्स मीट' या संवादादरम्यान माहिती विभागाच्या आयुक्त सचिव आर. एलिस वाज यांनी देशभरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. हा महोत्सव केवळ चित्रपट प्रदर्शनाचे व्यासपीठ नसून अर्थपूर्ण संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे माध्यम ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माहिती संचालक श्रेया सिंगल यांनी सांगितले की, ७ ते १० सप्टेंबर दरम्यान श्रीनगर, जम्मू आणि गुलमर्ग येथे होणाऱ्या या महोत्सवाला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ८० हून अधिक देशांमधून चित्रपटांच्या एन्ट्रीज आल्या असून, यात फिचर फिल्म्स, लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन केले जाईल. याशिवाय चित्रपट निर्मितीवर आधारित मास्टरक्लास आणि तांत्रिक सत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत. या महोत्सवामुळे काश्मीर पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यांचे आवडते केंद्र म्हणून उदयास येईल.