जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) भारताच्या हवामानावर गंभीर परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून उघड झाले आहे. 'आयआयटी गांधीनगर' (IIT Gandhinagar) आणि अमेरिकेतील स्टॅनफर्ड व पर्ड्यू या विद्यापीठांनी केलेल्या अभ्यासानुसार, तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास, उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही नागरिकांना जीवघेण्या 'हीट स्ट्रेस'चा (उष्णतेचा ताण) सामना करावा लागू शकतो. जुलै ते ऑक्टोबर या मान्सूनच्या काळात उष्ण आणि दमट हवामानामुळे हा धोका अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जेव्हा अतिउष्णता आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे शरीराला घाम येऊनही नैसर्गिकरित्या थंडावा मिळत नाही, तेव्हा त्याला 'अनकंपेन्सेबल हीट स्ट्रेस' (Uncompensable heat stress) असे म्हटले जाते. उष्णतेच्या या सततच्या वाढीमुळे उष्माघात, अवयव निकामी होणे आणि मृत्यूचा धोकाही निर्माण होऊ शकतो. १९७९ ते २०२१ या काळातील आकडेवारीनुसार, भारतात हा 'हीट स्ट्रेस' आता अधिक वारंवार आणि मोठ्या भूभागावर दिसून येत आहे. १९८० च्या दशकात ०.०१ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा कमी असलेल्या या प्रभावित क्षेत्राचा विस्तार २०२० पर्यंत ०.०४ दशलक्ष चौरस किलोमीटरवर पोहोचला आहे.
सध्या 'हीट स्ट्रेस'चा सर्वाधिक परिणाम मार्च ते जून या उन्हाळ्याच्या महिन्यांत (भारताच्या ८ टक्के भूभागावर) दिसून येतो, तर पावसाळ्यात हे प्रमाण केवळ १ टक्का असते. मात्र, 'अमेरिकन जिओफिजिकल युनियन (AGU) ॲडव्हान्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षानुसार, भविष्यात तापमान २ अंशांनी वाढल्यास मान्सूनच्या काळात हा धोका वेगाने वाढेल. उन्हाळ्यात ६० टक्के तर पावसाळ्यात ५३ टक्के देश या असह्य उष्णतेच्या विळख्यात अडकू शकतो. या बदलत्या हवामानामुळे देशातील सुमारे ८० कोटी ते १२० कोटी लोकसंख्येला या 'हीट स्ट्रेस'चा फटका बसू शकतो, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटा प्रामुख्याने गंगेच्या खोऱ्यात आणि किनारपट्टीच्या भागात दिसून येत होत्या. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे आणि उच्च तापमानामुळे हा परिणाम जाणवत होता. मात्र, पावसाळ्यातील 'हीट स्ट्रेस' हा प्रामुख्याने ३५ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानात, वाढलेल्या आर्द्रतेमुळे पंजाब आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागात अधिक जाणवतो. संशोधकांच्या मते, आगामी काळात गंगेचे खोरे आणि उत्तर-पश्चिम भारतात उन्हाळ्यापेक्षा मान्सूनमध्ये या 'हीट स्ट्रेस'च्या घटना अधिक वारंवार घडताना दिसतील.