अल्ट्रा-डिस्टन्स रनर सुफिया सुफीची ५,००० किलोमीटरची धाव भारतीय जवानांना समर्पित!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
सुफिया सुफी तिच्या मनाली-लडाख मार्गावर धावताना
सुफिया सुफी तिच्या मनाली-लडाख मार्गावर धावताना

 

आशा खोसा

भारताची प्रसिद्ध 'अल्ट्रा-डिस्टन्स रनर' सुफिया सुफी सध्या एका भन्नाट आणि धाडसी प्रवासावर आहे. कन्याकुमारी ते काराकोरम असा तब्बल ५,००० किलोमीटरचा तिचा 'रन फॉर ड्रीम्स' हा प्रवास आता काश्मीरमध्ये पोहोचलाय. विशेष म्हणजे, आपली ही ऐतिहासिक धाव तिने देशाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं सहावं रेकॉर्ड नोंदवण्यासाठी तिची ही धडपड सुरू आहे.
 
बनिहालमध्ये जंगी स्वागत आणि जवानांची साथ
तिच्या या प्रवासाचा आज ६७ वा दिवस आहे. काश्मीर प्रांताच्या सीमेवर असलेल्या बनिहालमध्ये तिने जसा प्रवेश केला, तसं तिथल्या सीआरपीएफ (CRPF) जवानांनी तिचं जोरदार स्वागत केलं आणि उत्साहाने तेही तिच्यासोबत या धावेत सामील झाले. राजस्थानच्या अजमेरची राहणारी सुफिया, देशभरात जिद्द, निश्चय आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी ही ५००० किलोमीटरची धाव पूर्ण करत आहे.
 
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर डोंगरदऱ्यांचा आणि आव्हानात्मक रस्ता पार करताना सुफियाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी 'सीआरपीएफ'च्या १६६ व्या बटालियनच्या जवानांनी तिला संपूर्ण सुरक्षा आणि रसद (logistical support) पुरवली. बनिहालमध्ये प्रवेश करताना संपूर्ण मार्गावर सुरक्षा दलांनी तिला कडेकोट सुरक्षा दिली.
 
"आपला आतला आवाज जागा झाला पाहिजे..."
आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना सुफिया म्हणाली, "मी राजस्थानच्या अजमेरची आहे. सध्या मी 'कन्याकुमारी ते काराकोरम रन' हे मोठं चॅलेंज स्वीकारलंय, जे तब्बल ५००० किलोमीटरचं आहे. आज माझ्या धावेचा ६७ वा दिवस असून मी इथे बनिहालमध्ये पोहोचले आहे. इथल्या लोकांनी माझं खूप प्रेमाने स्वागत केलं. मी धावत असल्याची माहिती मिळताच सीआरपीएफच्या जवानांनी मला सर्वतोपरी मदत केली. रस्ता ओलांडताना किंवा धावताना मला कोणताही त्रास होऊ नये, याची ते पूर्ण काळजी घेत आहेत."
 
माध्यमांशी बोलताना तिने महिलांसाठी एक खास संदेश दिला. ती म्हणाली, " 'बायका हे करू शकत नाहीत,' या मानसिक कोंडीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही एकदा सुरुवात केली की रस्ते आपोआप खुले होतात आणि तुम्हाला सगळीकडे मदत करणारे लोक मिळतात. फक्त आपला आतला आवाज जागा झाला पाहिजे..."
 
सुफियाचे थक्क करणारे जुने विक्रम
३९ वर्षीय सुफिया सुफीने याआधीही आपल्या नावावर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद केली आहे:
मनाली ते लेह रन: हाडे गोठवणारी थंडी (उणे तापमान) आणि अत्यंत उंचावरील कठीण रस्त्यांचा सामना करत तिने ४८० किलोमीटरचं अंतर अवघ्या ९८.२ तासांत (१०० तासांच्या आत) पूर्ण केलं होतं. विशेष म्हणजे, याआधीचा १५६ तासांचा स्वतःचाच रेकॉर्ड तिने यात मोडला होता.
 
सुवर्ण चतुष्कोण (Golden Quadrilateral): दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई यांना जोडणारा तब्बल ६,००२ किलोमीटरचा 'सुवर्ण चतुष्कोण' तिने पायी धावत पूर्ण केला. यासाठी तिला ११० दिवस, २३ तास आणि २४ मिनिटे लागली. हे अंतर पायी सर्वात वेगाने गाठणारी ती पहिली महिला ठरली.
 
काश्मीर ते कन्याकुमारी: आपल्या तिसऱ्या रेकॉर्डमध्ये तिने काश्मीर ते कन्याकुमारी असा जवळपास ६,००० किलोमीटरचा प्रवास ११० दिवसांत चार प्रमुख शहरांमधून धावत पूर्ण केला होता.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter