मुंबई :
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेले आणि पर्यटकांसह मुंबईकरांचे अत्यंत आवडते असलेले ऐतिहासिक 'के रुस्तम' (K Rustom) आईस्क्रीम पार्लर सध्या अडचणीत आले आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या आयकॉनिक आउटलेटचा परवाना निलंबित केला आहे. अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
तपासणीत उघड झाले धक्कादायक वास्तव एफडीएच्या पथकाने या लोकप्रिय दुकानात अचानक भेट देऊन तपासणी केली. या वेळी दुकानाच्या आवारात आणि साठवणुकीच्या जागेत जिवंत उंदीर तसेच माश्यांचा सुळसुळाट असल्याचे आढळून आले, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याशिवाय, आईस्क्रीम तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुदत संपलेले (Expired) कृत्रिम फ्लेवरिंग एजंट्स आणि इसेन्स साठवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
या मुदत संपलेल्या साठ्यामध्ये पिस्ता, अननस, गोड संत्री, चेरी, बदाम, अमेरिकन आईस्क्रीम सोडा, मिक्स्ड फ्रूट, स्ट्रॉबेरी, ब्लॅककरंट, रम जमैका, लिंबू आणि प्लम अशा नामांकित फ्लेवर्सचा समावेश होता. हा सर्व साठा पुन्हा वापरात आणला जाऊ नये, म्हणून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तो पथकाच्या उपस्थितीत जागेवरच नष्ट केला.
'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' या विशेष मोहिमेअंतर्गत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी मुंबईतील खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी सध्या तीव्र करण्यात आली आहे.
गुणवत्तेतही आढळली मोठी त्रुटी या कारवाईपूर्वी एका बाह्य प्रयोगशाळेच्या अहवालातून 'के रुस्तम'च्या आईस्क्रीमच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार, आईस्क्रीममध्ये दुधाच्या फॅटचे (Milk Fat) प्रमाण किमान १० टक्के असणे बंधनकारक आहे. मात्र, या पार्लरच्या नमुन्यांमध्ये ते केवळ ७.९४ टक्केच आढळून आले.
तसेच, आईस्क्रीमच्या सुरक्षित हाताळणीसाठी आवश्यक असलेली 'कोल्ड चेन' (Cold Chain) देखील दुकानात राखली जात नव्हती. अन्न सुरक्षा अधिकारी तेजस्विनी पाटील आणि आकाश चव्हाण यांनी ही तपासणी केली असून, प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल येईपर्यंत हे दुकान पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सह-आयुक्त पी. आर. शिंगारवाड आणि सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांनी दिले आहेत.