Uniform Civil Code Bengal: आसाम-गुजरातच्या धर्तीवर बंगालमध्ये लागू होणार समान नागरी कायदा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी

 

पश्चिम बंगाल सरकार गुजरात आणि आसाम राज्यांनी अवलंबलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा पाठपुरावा करून राज्यामध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी सांगितले. उत्तर कोलकाता येथील कॉलेज स्ट्रीटवर आयोजित साहित्यिक आयकॉन बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या १८९ व्या जयंती सोहळ्याच्या एका शासकीय कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 

या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, विवाह, घटस्फोट आणि वारसाहक्क यांसारख्या विषयांवर नियंत्रण ठेवणाऱ्या समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विहित कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन केले जाईल.

विधानसभा अधिवेशनात विधेयक मांडणार
सुवेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सरकार आपल्या पक्षाने ठरवून दिलेल्या ६ महिन्यांच्या मुदतीपूर्वीच चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी विधानसभेत समान नागरी कायदा (UCC) विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी संध्याकाळी विधानसभेत झालेल्या बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय अंतिम करण्यात आला आहे. बंगालमधील आगामी काळातील हा सर्वात मोठा कायदेशीर आणि सामाजिक धोरणात्मक बदल मानला जात आहे.

निवडणुकीतील महत्त्वाचे आश्वासन
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास सहा महिन्यांच्या आत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. एप्रिल महिन्यात पक्षाचा संकल्प पत्र जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आश्वासनाचा प्रामुख्याने उल्लेख केला होता. 

उत्तराखंड, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनी आधीच युसीसीच्या प्रस्तावांवर काम सुरू केले असून, आता बंगालही इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर याची अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' चे रचनाकार बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय स्तरावरील 'वंदे मातरम्' संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.