इमाम अबू हनिफा : धार्मिक संयमाचा आणि तर्कसंगत विचारांचा वारसा देणारा तत्त्वज्ञ

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 6 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

गुलाम रसूल देहलवी

"ज्ञानाचा ठेवा जर 'थुरैया' (कृत्तिका नक्षत्र) ताऱ्यावर जरी टांगलेला असता, तरी पारसचे (किंवा कुफाचे) विद्वान तिथपर्यंत पोहोचले असते."

ही एक प्रसिद्ध भविष्यवाणी असून ती हदीसमध्ये आढळते. हनफी विचारधारेचे संस्थापक इमाम अबू हनिफा (६९९–७६७) यांच्या गौरवार्थ हनफी विद्वान या वाक्याचा वारंवार उल्लेख करतात. दक्षिण आशियात आणि विशेषतः भारतीय उपखंडात हनफी विचारधारा मानणारा मोठा वर्ग आहे.

सहीह अल-बुखारी आणि सहीह मुस्लिम सारख्या अत्यंत विश्वासार्ह ग्रंथांमध्ये या हदीसचे शब्द असे आहेत: "जर ज्ञान (इल्म) किंवा धर्म (दीन) थुरैया नक्षत्रावर असता, तरी पारसचा एखादा माणूस तिथपर्यंत नक्कीच पोहोचला असता."

येथे 'थुरैया' म्हणजे ताऱ्यांचा असा समूह जो आकाशात अत्यंत उंचावर आणि दूर आहे. अरबी भाषेत याचा वापर अशा गोष्टीसाठी केला जातो जी मिळवणे खूप कठीण असते. विशेष म्हणजे, सुन्नी इस्लाममधील अनेक मोठे विद्वान हे पारस किंवा मध्य आशियाई पार्श्वभूमीचे होते. 

हदीसच्या प्राचीन अभ्यासकांच्या मते, याचा पहिला संदर्भ प्रेषितांचे प्रसिद्ध इराणी सोबती हजरत सलमान अल-फारसी यांच्याशी जोडला जातो. मात्र, नंतरच्या विद्वानांनी याचा विस्तार पारसी वंशाच्या त्या विद्वानांपर्यंत केला जे इस्लामिक ज्ञानाचे दिग्गज बनले, ज्यामध्ये इमाम अबू हनिफा यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

अबू हनिफा यांचा संबंध पारस आणि कुफा या दोन्ही ठिकाणांशी होता. ते मूळचे पारसी वंशाचे होते, पण त्यांनी कुफा येथे राहून आपले शिक्षण दिले. कुफा हे त्याकाळी इस्लामिक ज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र बनले होते. अब्बासी कालखंडाच्या सुरुवातीला न्यायशास्त्र आणि ईश्वरी ज्ञानावर त्यांचा बौद्धिक प्रभाव प्रचंड वाढला. यामुळेच अनेक प्राचीन विद्वानांनी ही भविष्यवाणी इमाम अबू हनिफा यांच्या रूपानेच पूर्ण झाली असे मानले.

भविष्यवाणीचा खरा अर्थ

या भविष्यवाणीचा गर्भित अर्थ असा आहे की, ज्ञान मिळवणे कितीही कठीण असले तरी अबू हनिफा यांच्यासारखे विद्वान आपल्या जिद्दीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तिथे पोहोचतील. ज्या विद्वानांनी ही भविष्यवाणी अबू हनिफा यांच्याशी जोडली, त्यांचा असा तर्क आहे की त्यांचा वारसा या भविष्यवाणीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे. इमाम विशेषतः धर्माच्या (दीन) बाबतीत शिस्तबद्ध तर्क (राय) आणि साधर्म्य (कियास) वापरण्यासाठी प्रसिद्ध होते.

त्यांची पद्धत कुराण आणि प्रेषितांच्या परंपरेवर घट्ट आधारलेली होती, तरीही त्यांनी बदलत्या परिस्थितीला तर्कशुद्ध विचारांच्या आधारे समजून घेण्यास वाव दिला. या अर्थाने, अबू हनिफा यांचे न्यायशास्त्र 'थुरैयापर्यंत पोहोचण्याच्या' त्या जिद्दीचेच रूप आहे. म्हणजेच, खरे ज्ञान कितीही दूर वाटले तरी सखोल अभ्यास आणि मेहनतीने ते मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले.

हनफी पंथाचे महत्त्व

इमाम अबू हनिफा यांच्या तर्कसंगत परंपरेतून प्रेरणा घेऊन बहुतेक हनफी विद्वान यावर भर देतात की इस्लाम हा एक जागतिक धर्म आहे, तो केवळ अरबांपुरता मर्यादित नाही. याचाच अर्थ, इस्लाममधील बौद्धिक प्रगती ही अनेक संस्कृतींच्या समन्वयातून झाली आहे. म्हणूनच, अबू हनिफा यांच्या तर्कसंगत न्यायशास्त्राचा उदय हा इस्लामची सखोल बौद्धिक परंपरा दर्शवतो. त्यांची विचारधारा पुढे जाऊन दक्षिण आशियातील सर्वात लोकप्रिय परंपरा बनली. जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, अशा ठिकाणी हनफी कायदा आणि त्यांच्या तर्काच्या पद्धतीमुळे (राय आणि कियास) इस्लामिक न्यायशास्त्राने नवी उंची गाठली.

धर्माची व्यापक संकल्पना — 'दीन'

अनेकदा 'दीन' म्हणजे केवळ कर्मकांड आणि काही विधींपुरती मर्यादित असलेली एक कडक नियमावली मानली जाते. पण खरोखर दीनचे सार एवढेच आहे का? प्राचीन विद्वानांनी याची खूप व्यापक आणि सखोल व्याख्या केली आहे. इमाम अबू हनिफा यांच्याबद्दल नितांत आदर बाळगणारे महान विद्वान अबू हमीद अल-गझाली यांनी अधिक सर्वसमावेशक संकल्पना मांडली. त्यांच्या मते, दीन हा केवळ विधींचा संग्रह नसून ती मानवजातीच्या कल्याणासाठी देवाने दिलेली एक नैतिक व्यवस्था आहे. 

या व्याख्येनुसार, धर्म हा केवळ प्रार्थनेच्या पलीकडे जाऊन न्याय, नैतिकता आणि सामाजिक सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे, दीन ही केवळ व्यक्ती आणि देव यांच्यातील कर्तव्यांची यादी न राहता, समाजाच्या हितासाठी असलेली एक व्यापक नैतिक चौकट बनते. आपल्या 'अल-मुस्तस्फा' या पुस्तकात ते लिहितात: "दीन ही एक दैवी व्यवस्था आहे जी पूर्णपणे लोककल्याणासाठी निर्माण केली गेली आहे."

हनफी परंपरेतील 'दीन'

हनफी विचारधारेत दीनला केवळ धार्मिक विधी किंवा कायद्याच्या नियमांपेक्षा खूप मोठे मानले जाते. ही एक अशी नैतिक आणि आध्यात्मिक चौकट आहे जी मानवी जीवनाला न्याय, नीतिमत्ता आणि सामाजिक कल्याणाकडे नेते. इमाम अबू हनिफा यांनी श्रद्धेची (इमान) व्याख्या करताना सांगितले की, "श्रद्धा म्हणजे हृदयात असलेला विश्वास आणि जिभेने दिलेली स्वीकृती होय." 

त्यांनी कर्माला श्रद्धेचे फळ मानले, पण ते श्रद्धेचे मूळ घटक नाहीत असे सांगितले. या फरकामुळे धर्माला केवळ बाह्य आचरणापुरते मर्यादित ठेवण्याला आळा बसला. एखाद्या व्यक्तीची श्रद्धा ही केवळ दिसणाऱ्या विधींवरून मोजली जात नाही, तर ती आंतरिक विश्वास आणि नैतिक जबाबदारीवरून ठरते.

दीन आणि फिक्ह मधील फरक

हनफी पंथ 'दीन' आणि 'फिक्ह' (न्यायशास्त्र) किंवा शरिया कायद्यातही स्पष्ट फरक करतो. 'दीन' म्हणजे देवाने दिलेले आध्यात्मिक आणि नैतिक मार्गदर्शन — जो इस्लामचा पाया आहे. तर 'फिक्ह' म्हणजे ते मार्गदर्शन प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्यासाठी मानवाने केलेले प्रयत्न. 

फिक्ह ही मानवी बुद्धीची प्रक्रिया असल्यामुळे त्यात तर्क, वादविवाद आणि बदलत्या काळाशी जुळवून घेणे येते. म्हणूनच हनफी पंथ आपल्या साधर्म्य तर्कासाठी (कियास) आणि सूक्ष्म न्यायनिर्णयासाठी ओळखला जातो.

हनफी परंपरा सार्वजनिक कल्याणावर (मसलहा) मोठा भर देते. नियम आणि कायदे हे मानवाच्या मूलभूत हितांचे रक्षण करण्यासाठी असतात, ज्याला 'मकासिद अल-शरिया' (कायद्याचे मुख्य हेतू) म्हटले जाते. 

यामध्ये जीव वाचवणे (हिफ्झ अल-नफ्स), धर्माचे रक्षण (हिफ्झ अल-दीन), बुद्धीचे रक्षण (हिफ्झ अल-अक्ल), संपत्तीचे रक्षण (हिफ्झ अल-माल) आणि वंशाचे रक्षण (हिफ्झ अल-नसब) यांचा समावेश होतो. थोडक्यात, धर्माबद्दलचा हनफी दृष्टिकोन केवळ कर्मकांडांबद्दल नसून तो एक न्याय्य समाज निर्माण करण्याबद्दल आहे.

या अर्थाने, दीनची हनफी समज इमाम अल-गझाली यांच्या नैतिक दृष्टीकोनाशी मिळतीजुळती आहे: धर्म ही मानवी कल्याण आणि सामाजिक सलोखा साधण्यासाठी असलेली एक दैवी व्यवस्था आहे. हनफी विचारधारा दीनला एक जिवंत नैतिक व्यवस्था मानते — जी श्रद्धा, कायदा आणि सामाजिक हित यांना एकत्र जोडते.

दीन, 'इरजा' आणि अबू हनिफा यांची नैतिक दृष्टी

हनफी पंथातील दीनची ही व्यापक समज त्यांच्या संस्थापकाच्या म्हणजेच इमाम अबू हनिफा यांच्या धार्मिक दृष्टिकोनाशी जोडलेली आहे. तीव्र राजकीय संघर्ष आणि गटबाजीच्या काळात वावरताना इमाम अबू हनिफा यांनी एक अशी भूमिका मांडली, ज्यामुळे मुस्लिम समाजातील एकता टिकून राहील.

या विचारांच्या केंद्रस्थानी 'इरजा'चा सिद्धांत होता. याचा शब्दशः अर्थ 'पुढे ढकलणे' असा होतो — म्हणजेच एखाद्या मुस्लिमाच्या श्रद्धेवर अंतिम निकाल देणे पुढे ढकलणे. या विचारानुसार, श्रद्धा (इमान) म्हणजे प्रामुख्याने हृदयातील विश्वास आणि तोंडाने दिलेली कबुली होय. मानवी कृती जरी नैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असल्या, तरी केवळ त्यावरून एखादी व्यक्ती श्रद्धावान आहे की नाही, हे ठरत नाही.

ही भूमिका खारीजींसारख्या गटांच्या पूर्णपणे विरोधात होती, जे पाप करणाऱ्या मुस्लिमांना थेट धर्माबाहेर (काफिर) ठरवायचे. अबू हनिफा यांनी असे कठोर निर्णय नाकारले. त्यांनी असा युक्तिवाद केला की मानवी कर्माचे अंतिम मूल्यमापन करण्याचा अधिकार केवळ देवाचा आहे.

श्रद्धेचे मूळ आणि मानवी वर्तनातील त्रुटी यांना वेगळे करून अबू हनिफा यांनी दीनला केवळ कायद्याच्या चौकटीत अडकण्यापासून वाचवले. त्यांच्या दृष्टीने धर्म हे इतरांना दोषी ठरवण्याचे साधन नव्हते, तर ते मानवाला सुधारणेकडे आणि सामाजिक सलोख्याकडे नेणारे एक माध्यम होते.

हाच दृष्टिकोन हे स्पष्ट करतो की हनफी परंपरेने तर्काला आणि साधर्म्याला (कियास) इतके महत्त्व का दिले. कायदा (फिक्ह) हा बदलत्या काळात दैवी मार्गदर्शन वापरण्याचा मानवी प्रयत्न मानला गेला, तर दीन हा जीवनाचा नैतिक आणि आध्यात्मिक पाया राहिला.

अशा प्रकारे, अबू हनिफा यांच्या विचारांनी इमाम अल-गझाली यांच्या नंतरच्या विचारांची पायाभरणी केली होती. दोन्ही विद्वानांनी यावर भर दिला की धर्माचा खरा उद्देश केवळ कर्मकांडांचे पालन करणे नसून न्याय आणि समाजाचे कल्याण साधणे हा आहे. दक्षिण आशियासारख्या प्रदेशात, जिथे हनफी पंथ प्रबळ झाला, तिथे या बौद्धिक वारशामुळेच इस्लामचे एक संयमित आणि सहअस्तित्वाला महत्त्व देणारे स्वरूप घडले.

अबू हनिफा यांच्या विचारांची आजच्या काळातील गरज

आजच्या काळात जेव्हा धर्माच्या संकुचित व्याख्या केल्या जातात, अशा वेळी इमाम अबू हनिफा यांची दीन आणि इरजाबद्दलची समज आपल्याला आठवण करून देते की आपल्या परंपरेत सहिष्णुता आणि नम्रतेसाठी मोठे स्थान आहे.

आधुनिक काळात मुस्लिम विद्वानांमध्ये धर्माचे स्वरूप, श्रद्धा आणि कर्माची भूमिका यावर मोठे वाद सुरू आहेत. अशा वेळी इमाम अबू हनिफा यांचे विचार आणि त्यांनी दीन व शरियामध्ये केलेला फरक, तसेच 'इरजा'चा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. हे विचार सुन्नी ईश्वरविज्ञानाला अधिक सर्वसमावेशक बनवतात. ही विचारधारा आजही तितकीच महत्त्वाची आहे, विशेषतः भारतात, जिथे बहुसंख्य मुस्लिम हनफी परंपरेचे पालन करतात.

अबू हनिफा यांच्या मते श्रद्धेचे सार केवळ बाह्य कर्मात नसून आंतरिक विश्वासात आहे. चांगली कर्मे निश्चितच महत्त्वाची आहेत, पण ती श्रद्धेचे मूळ अस्तित्व ठरवत नाहीत. सुरुवातीच्या काळातील वादांमध्ये हा दृष्टिकोन खूप मोलाचा होता. काही गट असे मानत की मोठे पाप केल्यास माणूस इस्लाममधून बाहेर पडतो, पण अबू हनिफा यांनी हा कठोरपणा नाकारला.

इरजाची संकल्पना: संयमाचा मार्ग

'इरजा' म्हणजे एखाद्याच्या श्रद्धेवरचा अंतिम निकाल कयामतच्या दिवसापर्यंत पुढे ढकलणे, हा हनफी इस्लामचा आत्मा आहे. सातव्या शतकातील राजकीय संघर्षातून निर्माण झालेल्या फुटीला प्रत्युत्तर म्हणून हा सिद्धांत पुढे आला. राजकीय संघर्षात अडकलेल्या किंवा चुका झालेल्या लोकांच्या श्रद्धेवर निकाल देण्यापेक्षा, इरजाच्या समर्थकांनी असा युक्तिवाद केला की एखाद्याचा खरा विश्वास ठरवण्याचा अधिकार केवळ देवाला आहे. 

इमाम अबू हनिफा यांची भूमिका याच भावनेचे प्रतिबिंब आहे. कर्माच्या पूर्णत्वापासून श्रद्धेला वेगळे करून त्यांनी हे तत्त्व मांडले की: कर्म अपूर्ण असले तरी श्रद्धा कायम राहू शकते. मानवांनी इतरांच्या आध्यात्मिक स्थितीवर अहंकारातून निकाल देणे टाळले पाहिजे. नैतिक उत्तरदायित्व आहेच, पण ते शेवटी देवाच्या निर्णयावर सोपवलेले आहे. या दृष्टिकोनाने 'संयमाचे शास्त्र' तयार केले — जिथे धर्माचा शस्त्र म्हणून वापर करण्यास नकार दिला गेला.

अशा प्रकारे, इमाम अबू हनिफा यांनी इस्लाममधील कठोर 'तकफिरी' (इतरांना काफिर ठरवणे) भूमिका फेटाळून लावली. त्यांनी असा युक्तिवाद केला की पाप करणारा मुस्लिम आपली श्रद्धा गमावत नाही, त्याचा निकाल देवावर सोडला पाहिजे. यामुळे मुस्लिम समाजाचे कट्टरतेपासून संरक्षण झाले आणि वैचारिक नम्रतेस प्रोत्साहन मिळाले.

हनफी परंपरा आणि भारतीय इस्लाम

अबू हनिफा यांच्या विचारांची प्रासंगिकता भारतीय संदर्भात अधिक स्पष्ट होते. येथील बहुसंख्य मुस्लिम हनफी पंथाचे पालन करतात, जो मध्ययुगीन काळात सुफी संत आणि विद्वानांच्या माध्यमातून सर्वत्र पसरला.

तर्क आणि संयमावर भर दिल्यामुळे, हनफी परंपरा भारताच्या बहुसांस्कृतिक वातावरणात अगदी चपखल बसली. यामुळे मुस्लिम विद्वानांना धर्माला केवळ कठोर कायद्यात न अडकवता सामाजिक वास्तवाशी जुळवून घेणे सोपे झाले. हनफी बौद्धिक वारशाने विविध समुदायांसोबतचे सहअस्तित्व आणि इस्लामची अशी व्यापक समज विकसित करण्यास मदत केली जिथे अध्यात्म आणि कायदा यांचा समतोल साधला जातो.

आधुनिक भारतीय वातावरणात, जिथे कट्टरता वाढताना दिसते, तिथे इमाम अबू हनिफा यांचे विचार एक महत्त्वाची सुधारणा म्हणून काम करतात. श्रद्धा ही प्रामुख्याने विश्वासात असते आणि अंतिम निकाल देवाचा असतो, या तत्त्वामुळे संघर्षाला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसतो.

अबू हनिफा यांचा वारसा इस्लामचा एक सखोल नैतिक दृष्टिकोन मांडतो जो नम्रता, तर्क आणि सामाजिक सलोख्याला महत्त्व देतो. बारा शतके उलटून गेली असली, तरी त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. धर्म आणि कायदा यातील फरक आणि 'इरजा'ची संकल्पना यामुळे संयमी सुन्नी ईश्वरविज्ञानाची पायाभरणी झाली.

आजच्या काळात अबू हनिफा यांच्या विचारांचा पुन्हा अभ्यास केल्याने वैचारिक मोकळेपणा आणि नैतिक संतुलन पुन्हा मिळवता येईल. भारतीय मुस्लिमांसाठी हा वारसा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला आठवण करून देतो की इस्लामच्या इतिहासात सहिष्णुता आणि सहअस्तित्वाचे शक्तिशाली मार्ग उपलब्ध आहेत.

(लेखक भारतीय इस्लामचे लेखक आणि अभ्यासक आहेत. त्यांचे 'इश्क सुफियाना: अनटोल्ड स्टोरीज ऑफ डिव्हाईन लव्ह' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.)