आपल्या चिरतरुण आवाजाने संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे काल मुंबईत निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन आणि कला क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.
आनंद भोसले यांनी दिलेली माहिती
आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी आईच्या निधनाबद्दल सविस्तर माहिती दिली. गेल्या काही तासांत आशा ताईंचे अवयव निकामी होत गेले आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ११:०० ते दुपारी २:०० या वेळेत लोअर परळ येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर दुपारी ४:०० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
असा होता सांगीतिक प्रवास
आशा भोसले यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे झाला होता. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. जागतिक स्तरावर सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. त्यांनी हजारो गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य केले. जरी आज त्या शारीरिक रूपाने आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या आवाजातील जादू गाण्यांच्या रूपाने कायमच आपल्यासोबत राहील.
देशभरातून वाहण्यात आली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि अष्टपैलू व्यक्तींपैकी एक असलेल्या श्रीमती आशा भोसले जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या दशकांच्या अनोख्या सांगीतिक प्रवासाने आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला."
ते पुढे म्हणाले की, "भावपूर्ण धून असो वा उत्साही रचना, त्यांच्या आवाजात एक चिरंतन तेज होते. त्यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या आठवणी मी सदैव जपेन. त्यांचे कुटुंब, चाहते आणि संगीतप्रेमींच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील."
अभिनेता सलमान खानने शोक व्यक्त करताना म्हटले की, "भारतीय संगीताचे हे खूप मोठे नुकसान आहे. आशाजींबद्दल ऐकून मन हेलावले. एक न भरून निघणारा आवाज, तुमची गाणी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील."
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आदरांजली वाहताना लिहिले की, "आशा भोसले जी त्यांच्या आवाजाच्या आणि तेजाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील. किती महान कलाकार!"
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, "आशा जी आता आपल्यात नाहीत, पण त्या मागे संगीताचा मोठा खजिना सोडून गेल्या आहेत. जोपर्यंत जगात प्रेम, रोमान्स आणि जगण्याची ओढ कायम आहे, तोपर्यंत त्यांची गाणी आपल्याला जिवंतपणाची जाणीव करून देत राहतील. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नुसार जगातील सर्वाधिक गाणी ध्वनिमुद्रित करणारा आशाजींचा आवाज कायमच अजरामर राहील."
अभिनेता शाहरुख खानने श्रद्धांजली वाहताना लिहिले की, "आशा ताईंच्या निधनाची बातमी ऐकून खरोखरच खूप दुःख झाले. त्यांचा आवाज भारतीय सिनेमाचा एक आधारस्तंभ राहिला असून तो येणारी अनेक शतके जगभर गुंजत राहील. अशा प्रतिभेचा वारसा चिरंतन असतो. त्यांनी नेहमीच मला प्रेम आणि आशीर्वाद दिले, मला त्यांची खूप उणीव भासेल. आशा ताई, आत्म्यास शांती लाभो... तुमचे खूप प्रेम."