भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंतीनिमित्त देशाची मानवंदना!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

आज भारताच्या आधुनिक इतिहासातील एका महान पर्वाचा उत्सव साजरा होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे अग्रदूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती संपूर्ण देशासह जगभरात उत्साहात साजरी केली जात आहे. नवी दिल्लीतील संसद भवनापासून ते न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष ऐकू येत आहे. 

नवी दिल्लीत या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून संसदेच्या प्रेरणा स्थळ येथे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती राधाकृष्णन, अध्यक्ष बिर्ला आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला फुले अर्पण केली.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यांनी गुजरातच्या गांधीनगरमधील लोकभवन येथे बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य एका न्याय्य आणि पुरोगामी समाजाच्या निर्मितीसाठी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील."
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "बाबासाहेब भीमराव आंबेडकर जी यांनी आपल्याला प्रत्येक वर्गाला समान अधिकार आणि संधी देणारे संविधान देऊन आपल्या लोकशाहीचा भक्कम पाया रचला. देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी कलम ३७० ला कडाडून विरोध केला होता. समाजाला शिक्षित होण्याचा आणि संघटित राहण्याचा मंत्र देणाऱ्या बाबासाहेबांचे जीवन आपल्याला शिकवते की, जेव्हा संकल्प राष्ट्रसेवा आणि लोककल्याणाचा असतो, तेव्हा प्रत्येक अडथळा छोटा होतो. सामाजिक न्यायाचे अग्रदूत, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब भीमराव आंबेडकर जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन."
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही भारताला नैतिक आणि घटनात्मक आत्मा देणाऱ्या या दूरदृष्टी असलेल्या महामानवासमोर नतमस्तक होतो. बाबासाहेब केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे अथक योद्धा होते. हीच मूल्ये भारताच्या संकल्पनेची व्याख्या करतात. आज संविधानावर संकटाचे ढग असताना, त्यांचे शब्द आणि इशारे अधिक तीव्रतेने आठवतात. हा क्षण धैर्य आणि विश्वासाची मागणी करतो. आपण केवळ त्यांचे स्मरण करून चालणार नाही, तर त्यांनी मांडलेल्या प्रत्येक तत्त्वाचे रक्षण करण्यासाठी, त्यांनी मिळवून दिलेल्या प्रत्येक हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या प्रत्येक मूल्यासाठी उभे राहिले पाहिजे."
विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर न्याय, समानता आणि सन्मानावर आधारित मजबूत भारताचे स्वप्न दिले. मात्र आज काही शक्ती पद्धतशीरपणे बाबासाहेबांचा वारसा आणि आपले संविधान कमकुवत करण्याचे काम करत आहेत. लोकशाही संस्था पोकळ केल्या जात आहेत, हक्कांवर गदा येत आहे आणि समानतेच्या कल्पनेवर हल्ले होत आहेत. हा देश बाबासाहेबांच्या आदर्शांवर उभा आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या आदर्शांच्या रक्षणासाठी पूर्ण ताकदीने लढेन. आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत पुन्हा जिवंत करूया. सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter