पुण्यातील येरवडा परिसरात नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचा वारसा जपला आहे. ऐतिहासिक शाहदावल बाबा दर्गा परिसरात बुधवारी संध्याकाळी रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सर्वधर्म समभाव ट्रस्टचे अध्यक्ष इकराम खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात आळंदीतील वारकरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध समाजांतील प्रतिनिधींनी एकत्र येत भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींची उपस्थिती. मुस्लीम समाजच्या पवित्र रमजान मासातील उपवास सोडण्यासाठी वारकरी संप्रदायाने दर्शवलेली ही आत्मीयता परिसरात चर्चेचा विषय ठरली. यावेळी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, येरवडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अंजुम बागवान आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र कदम यांनीही उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आयोजक इकराम खान यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले की,"हा रोजा इफ्तार कार्यक्रम केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून विविध समाजघटकांमध्ये परस्पर स्नेह आणि विश्वास वाढवण्याचे व्यासपीठ आहे. भारताची खरी ताकद विविधतेतील ऐक्यात आहे. श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी मानवता एकच आहे. रमजान महिन्यातील रोजा आपल्याला संयम, करुणा आणि इतरांविषयी सहानुभूती ठेवण्याची शिकवण देतो. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून आत्मशुद्धी, इच्छांवर नियंत्रण आणि मानवतेची जाणीव वाढवण्याचा मार्ग आहे."
ते पुढे म्हणाले की, "आळंदीतील वारकरी आणि विविध धर्मांच्या अनुयायांनी शाहदावल बाबा दर्ग्यात एकत्र येऊन इफ्तार केल्यामुळे आपापसात प्रेम, आदर आणि बंधुता वाढली आहे. यामाध्यमातून समाजाची खरी पायाभरणी असल्याचा प्रभावी संदेश समाजात पोहोचत आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाने नेहमीच परस्परांच्या सण-उत्सवात सहभागी होत सलोख्याने सहजीवन जगले आहे, ही परंपरा अशा उपक्रमांमधून अधिक बळकट होत आहे."
संतांच्या शिकवणीचा जागर
चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका मांडताना सांगितले की, "माऊलींनी (संत ज्ञानेश्वर महाराज) जगाला समता आणि विश्वबंधुत्वाचे पसायदान दिले आहे. त्यांनी समता, करुणा आणि सर्वभूतांप्रती बंधुभावाला विशेष महत्त्व दिले आहे. याठिकाणी रोजा इफ्तारमध्ये सहभागी होऊन त्या एकात्मतेच्या आणि भक्तीभावाच्या परंपरेचा आम्ही अनुभव घेतला. अशा कार्यक्रमांमुळे विविध समाजघटकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतात."
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे रोजा सोडला. यावेळी देशातील शांतता, समृद्धी आणि अखंड सामाजिक सलोख्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. एकमेकांना शुभेच्छा देत आणि विचारांची देवाणघेवाण करत या सोहळ्याने समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला.