महाविकास आघाडीने एक मुस्लीम उमेदवार न दिल्याने नाराजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 12 d ago
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि नसीम खान
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि नसीम खान

 

काँग्रेसची भूमिका छळाची असून त्यांनी महाराष्ट्रातील ४८ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नाही, अशी टीका नसीम खान यांनी केली आहे. राज्यातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघात ३० ते ३५ टक्के मुस्लिम मतदार आहेत. काँग्रेसला त्यांची मते हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही? असा सवालही नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. ते मुंबईत बोलत होते.

ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार नसीम खान उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण याठिकाणी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज झाले.

"या निवडणुकीतही पक्षानं राज्यात तसेच बाहेरील राज्यातही प्रचार करण्याचा आदेश मला दिला होता. त्यासह पक्षाच्या सर्व आदेशांचे मी पालन केले. मात्र, राज्यात काँग्रेसनं एकाही मुस्लिम व्यक्तीस उमेदवारी का दिली नाही? या प्रश्नाचं उत्तर देण्यास माझ्याकडं शब्द नसल्यानं मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही," असं खान यांनी आपल्या राजिनामापत्रात म्हटलं आहे.

याच नाराजीतून त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र देखील लिहलं आहे. लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत, असं नसीम खान यांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर नसीम खान यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला काही तिखट सवाल देखील विचारले. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार का दिला नाही? असा सवाल नसीम खान यांनी विचारला.

राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही, अशी खंतही नसीम खान यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, नसीम खान स्वतः मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना पक्षानं उमेदवारी दिली नाही. नसीम खान हे चारदा राज्यात मंत्री व आमदार राहिले आहेत. त्यामुळं मुंबई काँग्रेसमध्ये त्यांचं वजन आहे. मला लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असं राज्याच्या नेतृत्वाने सांगितलं होतं, असा दावाही नसीम खान यांनी केला.

नसीम खान एमआयएममध्ये प्रवेश करणार का?
दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना लोकसभा निवडणुकीसाठी खुली ऑफर दिली. यावर तुम्ही एमआयएममध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न माध्यमांनी नसीम खान यांना विचारला. एमआयएमने माझ्यासाठी सहानुभूती दर्शवली याबाबत मी त्यांचे आभार मानतो. मला याबाबत कुठलेही भाष्य करायचे नाही, असं म्हणत नसीम खान यांनी एमआयएमच्या ऑफरवर बोलणं टाळलंय.