रमजान ईद : परमेश्वराच्या आज्ञापालनाची फलनिष्पत्ती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

के.एस.ए. सरताज

सजीवांच्या निर्मितीत सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे माणूस. आत्मा व शरीर यांच्या बेरजेचे हे समीकरण. व्यक्तीचे संतुलन बिघडले की त्याचा परिणाम कुटुंब, मोहल्ला, शहर, राज्य, राष्ट्र व जगावर पडतो म्हणून आत्मा व शरीर पवित्र, संतुलित ठेवण्याच्या साधनाला आपण धर्म असे नाव देतो. प्रत्येक धर्मामध्ये काही वेळ मानसिक गरजांपासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या क्रियेला उपवास, सौम, फास्ट, रोजा असे म्हटले गेले आहे.

रमजानचे रोजे म्हणजे स्व:च्या मर्जीवर न चालता अल्लाहने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे प्रात्याक्षिक; त्याची उदाहरणे थोडक्‍यात अशी- जेव्हा साखरझोपेची वेळ असते तेव्हा मनस्थिती नसूनही उठणे, जेवणाची इच्छा नसताना जेवण करणे, जेवण करून झोपण्याची इच्छा असताना जागून नमाज अदा करणे, दिवसा जेव्हा जेवणाची इच्छा असते तेव्हा नमाज अदा करणे, दिवसा जेव्हा जेवणाची इच्छा असते तेव्हा जेवण न करणे, तहान लागत असूनही पाणी न पिणे या शारीरिक व नैसर्गिक गरजांची पूर्तता हे कुठल्याही प्रकारचे पाप नसून या गरजांपासून स्वत:ला वंचित ठेवणे हे फक्त अल्लाहच्या मर्जीसाठीच होय. हा झाला शारीरिक पैलू; परंतु शारीरिकरीत्याच अल्लाहचा आज्ञाधारक बनणे अपेक्षित नसून व्यक्तीचा आत्मादेखील पवित्र करणे, हा रोजाचा मुख्य उद्देश होय. उपाशी व्यक्तीची वेदना काय असते ते उपाशी राहिल्याशिवाय कळणार नाही. 

त्याचप्रकारे माणसाला किंवा मानवीय समाजाला एकमेकांपासून जो त्रास दिला जातो त्याच्या निवारणासाठी आत्मा पवित्र करणे गरजेचे आहे. आज माणसाचा माणसावरून विश्‍वास उडत आहे. संगणक, रोबो आणि वैज्ञानिक युगाच्या या प्रगतिशील माणसाचा नैतिक स्तर कुठे गेला आहे? मानव समाजाला बहुसंख्य घटक जो सर्व धर्मात आहे तो या सैतानी व दुष्कृत्य करणाऱ्यांना फक्त बघत आहे. शरीर व आत्मामध्ये असलेले हे व्यसन संपुष्टात आणण्याची गरज सर्वांना भासते. या उद्देशाच्या पूर्तीसाठीच साधना, मेडिटेशन, रोजे उपयोगी ठरतात. व्यसन, वाईट विचारांचा स्तर कोणताही असो त्यांना आपल्या शरीर व आत्मातून काढण्यासाठी रोजे उत्कृष्ट साधन आहे. 

रोजा ठेवणारा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसे जेवण पाण्यापासून दूर राहून आपल्या प्रकृतीला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनामध्ये येणारे वाईट व अश्‍लील विचारांना काढून आपला आत्मा पवित्र व स्वत:ला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच अनुषंगाने पैगंबर मोहंमद यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने पूर्ण श्रद्धा व आत्ममूल्यमापनासहित रोजाचे पालन केले तिचे पाप माफ केले जाईल.

मानव कल्याणासाठी ज्या लोकांनी महिनाभर चांगले कार्य करण्याचे प्रयत्न केले, वाईट कामांपासून स्वत:ला दूर ठेवले, काही व्यसन असेल तर व्यसनापासून स्वत:ला मुक्त केले व अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्याचे स्वभावतःच जास्तीत जास्त प्रयत्न केले अशा लोकांसाठी अल्लाहतर्फे या कार्याची फलनिष्पत्ती म्हणजे 'ईद-उल-फित्र'.

रमजान महिन्याची महत्त्वाची दोन कारणे. सृष्टीला पवित्र ठेवण्यासाठी, माणसाच्या मार्गदर्शनासाठी कुरआन याच महिन्यात अवतरित करण्यात आले तसेच या पवित्र कामासाठी लागणाऱ्या व्यक्तींचा शरीर व आत्मा पवित्र करण्यासाठी रोजे याच महिन्यात अनिवार्य करण्यात आले.रमजान महिन्यातच कुरआन अवतरित करण्यात आले व त्यात मानवजातीला संबोधित करून अल्लाहने सांगितले की, तो 'रब्बिल आलमिन' अर्थात सृष्टीत जो काही आहे तो सर्वांचा पालनकर्ता. त्यानेच मानवनिर्मिती केली. या आधारावर सर्व मानवजात एकच कुटुंब आहे. प्रत्येक माणूस अल्लाहची निर्मिती आहे म्हणून त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी अंत:करणाने आयुष्यभर सेवा करत राहणे हा रोजाचा मुख्य उद्देश. 

बंधुत्वाची ही भावना कुरआनने दिल्याने व वैयक्तिकरीत्या संपूर्ण मानव कल्याणासाठी चांगले कार्य करण्याची तसेच वाईट कामापासून दूर राहण्याची व मनापासून प्रत्यक्ष मुक्ती प्राप्त करण्याची अंमलबजावणीची क्षमता रोजामुळे परमेश्‍वराने निर्माण केली म्हणून अल्लाहचा आज्ञाधारक भक्त (मुस्लिम) या नात्याने त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नतमस्तक होऊन मुस्लिम बांधव नमाज अदा करतात व दुआही मागतात; ज्या द्वारे महिनाभर चांगले कार्य करण्यास व वाईट कामापासून दूर राहण्याच्या अंमलबजावणीची अशीच कृपा पुढच्या रमजानपर्यंत कायम ठेव यासाठी सर्व लोक एकमेकांचे अभिनंदन करतात व अल्लाहचा शुक्र (आभार) अदा करतात.

-  के.एस.ए. सरताज

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter