IRS निरुपमा कोटरू यांचा ८व्या ललदेद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
काश्मिरी लेखक व दिग्दर्शक प्राणकिशोर कौल, वस्तू व सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त जसमितसिंग धांद्रा, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, प्राचार्या सुषमा नहार, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर
काश्मिरी लेखक व दिग्दर्शक प्राणकिशोर कौल, वस्तू व सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त जसमितसिंग धांद्रा, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, प्राचार्या सुषमा नहार, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर

 

सर्वच धर्मांनी मूल्य जोपासण्याचा भाव कायम अधोरेखित केलेला आहे. व्यक्तींच्या कामाचा पाया मूल्याधिष्ठित असल्यास, संबंधित व्यक्ती हा स्वतःबरोबर समाजालाही चांगली दिशा देतो, असे मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी शनिवारी (ता. २७) व्यक्त केले. काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी (ललदेद) यांनी याच आधारे मनांना जोडण्याचे काम आयुष्यभर केल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.

सरहद संस्थेच्या वतीने काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या आठव्या ललदेद राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षीय स्थानावरून फिरोदिया बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय महसूल सेवेतील (आय. आर. एस.) निरुपमा कोटरू यांना २०२४ च्या ललदेद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

या वेळी काश्मिरी लेखक व दिग्दर्शक प्राणकिशोर कौल, वस्तू व सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त जसमितसिंग धांद्रा, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, प्राचार्या सुषमा नहार, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते. 

काश्मीरमध्ये ज्या काळात संत कवयित्री ललदेद गेल्या, त्याच काळात महाराष्ट्रात संत परंपरा नांदत होती. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी समाज जागृतीचे काम केले. शिवयोगिनी लल्लेश्वरीपासून ते शेख काशरुद्दीन ऊर्फ नंद ऋषी या संत कवींनी काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.  हेच काम  संत परंपरेने केले असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. 

'समन्वय हा काश्मिरी संस्कृतीचा गाभा' 
समन्वय हाच काश्मिरी संस्कृतीचा गाभा आहे. हाच घागा घट्ट करण्यासाठी ललदेद यांच्या नावाने पुरस्कार सुरू केल्याचे सरहद्दचे अध्यक्ष संजय नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

'आवड म्हणून कामाकडे पाहते'
मी सरकारी नोकरी म्हणून नाही, तर आवड म्हणून माझ्या कामाकडे पाहते. स्वतःला अधिकाधिक ओळखण्याची ती एक संधी असते. त्यामुळेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयात नाटय, कला, नृत्य या क्षेत्रात मी जे काही केले, त्यातून मला खूप काही शिकायला मिळाल्याचे, मत निरुपमा कोटरू यांनी व्यक्त केले.