रात्री-अपरात्री रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे नादिरभाई!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
रुग्णमित्र नादिरभाई (मध्यभागी) यांच्यासमवेत प्रमोद मुजुमदार आणि प्रा. मेहबूब सय्यद.
रुग्णमित्र नादिरभाई (मध्यभागी) यांच्यासमवेत प्रमोद मुजुमदार आणि प्रा. मेहबूब सय्यद.

 

अहमदनगरमध्ये प्राध्यापक मेहबूब सय्यद यांच्यामुळे रुग्ण मित्र नादिर भाई नूर खान या एका अनोख्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. नादिरभाई म्हणजे अत्यंत आकर्षक आणि हसतमुख व्यक्तिमत्व. प्रथमदर्शनी त्यांचे व्यक्तिमत्व आणि आवाज ऐकताच चटकन नसिरुद्दीन शहा या अभिनेत्याची आठवण येते.

नादिरभाई यांचे दुचाकी वाहन दुरुस्तीचे छोटेसे गॅरेज आहे. अगदीच लहानसे वर्कशॉप आहे. एका जुन्या कसलेल्या अनुभवी मेकॅनिकचे ते दुकान आहे. नादीर भाई आपला व्यवसाय मुख्यतः रात्री करतात, असं समजलं. लोकांना माहीत असते की नादिरभाई आपल्या दुचाकीची दुरुस्ती रात्री करणार. याचे कारण मात्र फारच वेगळे आहे.

नादिरभाई हे अहमदनगरमधील एक रुग्ण मित्र आहेत. वास्तविक रुग्ण मित्र असा उल्लेख केला की समोर येतो तो गरजू रुग्णांना मदत करणारा माणूस. पण, नादिरभाईंचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. दिवसा-रात्री कोणत्याही वेळी-अवेळी गरजू रुग्णाचे नातेवाईक नादिरभाईंना फोन करतात किंवा त्यांचे दार ठोठावतात आणि नादिरभाई तातडीने मदतीला उभे राहतात. या त्यांच्या कामाची सुरुवात झाली ती व्यक्तिगत जीवनात आलेल्या दु:खद अनुभवामुळे. 

नादिरभाईंची आई आणि वडील या दोघांना लागोपाठ कॅन्सरची बाधा झाली होती. त्या दोघांवर उपचार करण्यासाठी नादिरभाई आणि त्यांच्या भावांनी खूप धडपड केली परंतू आर्थिक कोंडीमुळे ते आपल्या आई-वडिलांना सर्व प्रकारचे औषधोपचार देऊ शकले नाहीत. याची फार मोठी मानसिक खंत नादिरभाई यांना वाटत होती. त्यामुळे यापुढे कोणीही रुग्ण औषध उपचाराविना बळी जाणार नाही, यासाठी आपल्याला शक्य असेल ती मदत आपण आयुष्यभर करायचीच, असे नादिरभाईंनी ठरवले.   

याचा अर्थ नादिरभाई पैशाची मदत करतात असे नाही. तर, अपघातात सापडलेले जखमी रुग्ण असो वा दुरच्या गावातून दुर्धर आजारावरील उपचारासाठी आलेले रुग्ण असोत. अशा सर्वांसाठी नादिरभाई प्रत्यक्ष मदतीला उभे राहतात. त्यांना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन जातात. आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळतील यासाठी संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयातील विभागांशी संपर्क साधतात. पण काही करून रुग्णाला योग्य ते उपचार मिळतील अशी व्यवस्था ते करतात. असे त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन करता येईल. 

इतकेच नव्हे तर गेली १४-१५ वर्षे निष्ठेने नादिरभाई हे काम करत आहेत. धर्म, जात, पंथ असा कोणताही भेद न करता येणाऱ्या प्रत्येक रुग्णासाठी अतिशय तळमळीने नादिरभाई धाऊन जातात. कोणी सोबत आले तर ठीक नाहीतर ते एकटे जातात. त्यामुळे त्यांना त्यांचे सर्व मित्र 'वन मॅन आर्मी' असे म्हणतात.  

एके दिवशी एका आजीचा पीसीओवरून फोन आला
एकदा एका पीसीओवरून त्यांना फोन आला. एक आजी बोलत होत्या. या आजींना नादिरभाईंचा नंबर पीसीओ मालकानेच जोडून दिला होता. या बाईंच्या मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते आणि तो एका हॉस्पिटलमध्ये दाखल होता. या आजी शेवगाव अमरापूरच्या. त्यांच्या मुलाच्या पायाच्या ऑपरेशनसाठी ७५ हजार रुपयांचा खर्च येणार होता. आपला मुलगा आता मरणार, असे त्या आजींना वाटत होते. नादिरभाई  धावून गेले. त्यांनी रुग्णाला खाजगी हॉस्पिटलमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. 

त्यावेळेस त्या रुग्णाचा बाप दारू पिऊन तिथे आला. त्याने नादीरभाई शिव्या घातल्या. "तुम्ही माझ्या मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये का आणले? आता तो मेला तर तुमची जबाबदारी," असे बोलू लागला. मात्र, नादीरभाईंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना परिस्थितीची कल्पना दिली आणि रुग्णाचे ऑपरेशन करण्याची विनंती केली. दोन दिवसातच रुग्णाचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. रुग्ण बरा झाल्यावर त्या आजी नादीरभाईंच्या पाया पडायला आल्या. त्यांनी नादीरभाईंचे मनापासून आभार मानले आणि आपल्या जवळची दोन केळी त्यांना दिली. रुग्णाचे ऑपरेशन मोफत पार पडले होते आणि रुग्ण व्यवस्थित झाला. 
 
 
नादीरभाईंमुळे रुग्णांचे होतात त्वरित उपचार  
नादीरभाईंच्या संपर्कात कधी कधी एक्सीडेंटमध्ये सापडलेले रुग्णही येतात. आता तर अपघाताचे प्रसंग आल्यास सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचारी थेट नादीरभाईंनाच बोलावतात. न नादिरभाई अशा रुग्णांच्या घरी संपर्क साधतात आणि पुढचे काम सोपे होते. नादिरभाईंच्या पुढाकाराने रुग्णांचे त्वरित उपचार होतात. तेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. ही नादीरभाईंची खासियत आहे की ते सर्व रुग्णांना नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्येच नेतात आणि व्यवस्थित उपचार होतील याची खबरदारी घेतात. 

एका अर्थाने आपले सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याचे काम नादीरभाई करत असतात. अर्थातच सातत्याने १४ वर्षे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नादिरभाईंना सर्वच ओळखतात. कधीही एक पैसा कोणाकडून न घेता उलट आपल्याच पदरचा पैसा ते खर्च करतात. अनेक रुग्णांना मुंबईतील नामांकित रुग्णालयात नादिरभाईंनी उपचार मिळवून दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुढाकार घेवून एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या महाविद्यालयीन मुलाचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले. 

आणि नंतर त्या मुलाच्या घरी फोन करून कळवले. तेव्हा त्या मुलाचे उच्चशिक्षित आई वडील म्हणाले, "आमचा मुलगा नगरला गेलेलाच नाही. हा दुसरा कोणाचातरी मुलगा असणार." नंतर दोन दिवस मुलगा घरी आला नाही, तेव्हा घाबरून हे पालक नगरला आले. तेव्हा त्यांना समजले की आपला मुलगा किती गंभीर स्थितीत होता. 

गेल्या १५ वर्षातील या प्रवासात नादिरभाईंना चांगले अनुभव आले. तसेच, वाईट अनुभवही आले. लोक असे गृहीत धरतात की नादिरभाई म्हणजे आपले नोकरच आहेत. काही निवृत्त पोलिस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी नादिरभाईंना अरे तुरे म्हणून कामाला लावण्याचाही प्रयत्न केला. पण, नादीरभाईंनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. परंतू त्यांना मदत मात्र व्यवस्थित केली. कित्येकदा रुग्णाचे कुटुंबीय रुग्णाची जबाबदारी नादीरभाईंवर टाकून दूर होण्याचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी नादीरभाई त्यांना सभ्य भाषेत बोलून वठणीवर आणतात. एकंदरीत नादिरभाई हे एक वल्ली व्यक्तिमत्व आहे. 

अशा अनेक कथा नादिरभाईंच्या खात्यात जमा आहेत. पण, त्यापेक्षा गेल्या १५ वर्षात शेकडो गरजू रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे सर्व श्रेय नादिरभाईंना जाते. कोणाकडूनही एक छदाम पैसा न घेता नादीरभाई हे काम करत राहतात. उपजीविकेसाठी आपले वाहन दुरुस्तीचे गॅरेज चालवतात. कधी दिवसा रुग्णसेवेसाठी जावे लागले तर रात्रभर गॅरेजचे काम करतात. इतके हे विलक्षण नादिर भाई! 

ही रुग्णसेवा करत असतानाच नादीरभाईंनी आपला संसारही अतिशय जबाबदारीने सांभाळला आहे. घरी पत्नी आणि तीन मुली अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. नादिरभाईंच्या या तिन्ही मुली उच्च शिक्षित आहेत. आता एका मुलीचे लग्नही झाले आहे. इतक्या वर्षांच्या नादिरभाईंच्या सेवेतून त्यांनी मोठी संपत्ती मिळवली नाही. मात्र, त्यांच्या खाती जमा झालेले वैभव म्हणजे प्रचंड जन संग्रह. त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी नगरमधील अनेक डॉक्टर, नगरपालिका अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक असे सुमारे तीन हजार पाहुणे उपस्थित होते.  
 
नादीरभाईंची ओळख ही नगर भेटीतील मोठी कमाई होती. त्यांनी आग्रह धरून त्यांच्या गॅरेजमध्ये आम्हाला नेले. त्या छोट्याशा गॅरेजमध्ये दोन-तीन फ्रेम लावलेल्या होत्या. त्यातील एक फ्रेम म्हणजे माननीय नादीर नूर खान, रुग्णमित्र यांच्या सत्काराचे मानपत्र होते. तर, दुसरी फ्रेम होती ती नादिरभाईंना नगरमधील नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णमित्र या पुरस्कारातील मानपत्राची. 

त्या मानपत्रातील मजकूर वाचताना आपलाच उर अभिमानाने भरून येतो. एखादी व्यक्ती आयुष्यभर समाजातील गरजू लोकांसाठी इतक्या निस्पृह वृत्तीने काम करत राहते, ही गोष्टच स्फूर्तीदायक वाटते. पण, त्याहीपेक्षा नादिरभाई म्हणजे आजच्या काळात सर्व समाजाला माणुसकीचे उदाहरण घालून देणारा सलोख्याचा दीपस्तंभ वाटत राहतो! 

सलाम नादिरभाई!

- प्रमोद मुजुमदार,
(समन्वयक, सलोखा संपर्क गट) 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter