पुण्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील ताम्हिणी आणि भुशी डॅम परिसरात दोन घटनांमध्ये एकूण सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांवर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बंदी आदेश लागू केले आहेत. ३१ जुलैपर्यंत हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. तसेच वेगाने वाहणाऱ्या, खोल पाण्यात उतरणे व पोहण्यास बंदी, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदी, नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे.

मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने, बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेले आहेत. या तालुक्यात असणाऱ्या भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात. इतर दिवसांसह शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी वरील भागांत पर्यटक हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून तसेच प्रामुख्याने मुंबई शहर व पुणे शहर या ठिकाणाहून येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असतो. तसेच रात्रीच्या वेळी पर्यटनस्थळांची माहिती नसल्याने पर्यटक भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, म्हणून उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये वर्षाविहार, पर्यटन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याठिकाणी असणार प्रतिबंधात्मक आदेश
मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, खंडाळा, सहारा ब्रिज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर
 
 • मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा.
 • हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर,
 • आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा
 • जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिकडोह
 • भोर तालुक्यातील भाटघर धरणे व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे
 • वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा .
 • खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर
 • इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटिंग क्षेत्र.
 
काय करू नये
 • धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई
 • पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांच्या परिसरात मद्यपान व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे
 • वाहतुकीचे रस्ते, तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे
 • बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे
 • सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, असभ्य वर्तन, हावभाव, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे
 • सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टम वाजविणे.
 • ध्वनी, वायू व जलप्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे
 
जबाबदार पर्यटन हवे : जिल्हाधिकारी
 • पर्यटकांनी स्वतःहून बंधने घालावी
 • पर्यटन संकल्पना रुजवावी
 • माहिती नसलेल्या अपरिचित ठिकाणी धोका पत्करणे चुकीचे
 • पश्‍चिम घाट सुंदर, पण तितकाच धोकादायक
 • दरडींचा धोका, मोठमोठे धबधबे
 • पाण्यात वाहून जाण्याच्या घटना, प्रसंगी पट्टीचे पोहणारेही वाहून गेल्याचे प्रकार घडलेत.
 • निसर्गाचा आस्वाद घ्या, मात्र निसर्गाशी स्वःच्या स्वतःच्या जिवाशी खेळू नका

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter