सर्वत्र चर्चा मौलाना सज्जाद नोमानी आणि मनोज जरांगे यांच्या भेटीचीच

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
मनोज जरांगे आणि मौलाना सज्जाद नोमानी
मनोज जरांगे आणि मौलाना सज्जाद नोमानी

 

महाराष्ट्रात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. अनेक मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. मराठा मतदारांमुळे अनेक मतदारसंघात विजय पराजयाची समीकरणे बदलू शकतात. याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठा मतांचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले. त्यानंतर आताही विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे यांनी घेतल्याने सामाजिक समीकरणे पूर्णत: बदलून गेली आहेत. 

तर दुसरीकडे महाराष्ट्रात १२ ते १३ टक्क्यांच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत. हीच मते निर्णायक ठरू शकतात, अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणूकीत याचाही प्रत्यय आला. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठा आंदोलनाला मुस्लिम समाजाने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. तर मराठा आरक्षणाबरोबर मुस्लीम आरक्षणाचाही प्रश्न सोडवू, अशी घोषणा मनोज जरांगे यांचा पवित्रा राहिला आहे. मराठा आरक्षण लढ्यात मुस्लीम बांधवाचा देखील आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे. तसेच दलित, मुस्लिम आणि मराठा अशी मोट बांधून नवे समीकरण तयार करू, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी याआधीच केली होती. 

अशातच आता मनोज जरांगे यांनी नुकतीच खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांच्याशी २ तास चर्चा केली आहे. ही भेट छत्रपती संभाजीनगर मधील एका हॉटेलमध्ये झाली. सज्जाद नोमानी इस्लामिक विद्वान आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. मुस्लीम समाजात त्यांना मोठा आन आहे. समाजकार्यातही ते अग्रेसर आहेत.महाराष्ट्रात नेरळ येथे त्यांच्या मोठ्या शिक्षणसंस्थाही आहेत. 

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, “गोर-गरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे. जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यामुळे मी आज सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यामुळे येणाऱ्या निडणुकीत काहीही होऊ शकते.”

पुढे बोलताना जरांगे म्हणतात, “सज्जाद नोमानी हे आजारी असल्याने त्यांना आंतरवालीमध्ये येता आले नाही. माझी भेट घेण्याची धडपड असूनही त्यांना भेटता येत नसल्याने मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्यांची भेट घेतली. माणुसकीच्या नात्याने आम्ही ही भेट घेतली आहे.”

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांची आहे. मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही मनोज जरांगे ऐरणीवर आणत आहेत. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा राहिला, तर राज्यातील चित्र बदलू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

कोण आहेत सज्जाद नोमानी?
सज्जाद नोमानी (Maulana Dr. Sajjad Nomani) हे एक प्रतिष्ठित इस्लामिक विद्वान, लेखक, आणि इस्लामच्या प्रचारकांपैकी एक आहेत. ते आल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी इस्लामिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. नोमानी फौंडेशनमार्फत देशभर त्यांचे मोठे सेवाकार्य सुरु असते. 
 

त्यांनी भारतात आणि जगभरातील मुस्लीम समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आणि शैक्षणिक समस्यांवर काम केले आहे. सज्जाद नोमानी यांना त्यांच्या विद्वत्तेसाठी आणि धर्माबद्दलच्या प्रगल्भ दृष्टिकोनासाठी ओळखले जाते, विशेषतः ते इस्लामच्या आध्यात्मिक आणि सामजिक दृष्टिकोनांचा प्रचार करतात.

नोमानी विविध सार्वजनिक सभांमध्ये आणि धार्मिक चर्चांमध्ये नियमित सहभाग घेतात. मुस्लिम समाजातील तरुणांना शिक्षण आणि नेतृत्वाच्या दिशेने ते कायम प्रोत्साहित करतात. त्यांच्या धार्मिक प्रवचनांना मोठी गर्दी होते. त्यांचे अनुयायी भारतच नव्हे तर जगभर पसरलेले आहेत.