थिरुप्परनकुंदरम : हिंदू, जैन आणि मुस्लिम समाजाने ‘असा’ दिला सौहार्दाचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तमिळनाडूतील मदुराईजवळ थिरुप्परनकुंदरम हे एक नयनरम्य गाव आहे. तलाव आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे मध्यभागी उभे असलेले विशाल खडकाचे डोंगर. हा डोंगर सुमारे शेकडो मीटर उंच आहे. याची खासियत अशी की येथे हिंदू, जैन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्मांचे पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी तिन्ही धर्मांचे लोक मोठ्या संख्येने येतात. येथे भगवान मुरुगन यांचे प्रसिद्ध मंदिर आहे.

काही गुहांमध्ये जैन शिल्पकला सर्वांचे लक्ष वेधते. याच ठिकाणी सिकंदर सुलतान यांची दर्गाही आहे. सिकंदर हे मदुराईचे शेवटचे सुलतान होते आणि सूफी संत म्हणूनही त्यांची ओळख होती.

कित्येक वर्षांपासून तिन्ही धर्मांचे लोक कोणत्याही वैरभावाशिवाय आपली पूजा, अर्चना आणि इबादत करण्यासाठी येत होते. जमिनीच्या मालकीच्या काही किरकोळ कायदेशीर वादांशिवाय या परिसराने सांप्रदायिक एकतेचा आदर्श घडवला होता.

मात्र, अचानक आपण अशा काळात पोहोचलो जिथे सलोख्याच्या अशा सर्व उदाहरणांना नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. यंदा मार्च महिन्यात येथे सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ लागला तेव्हा सर्व धर्मांच्या लोकांना चिंता वाटू लागली.

प्रशासनाने तणाव दडपला, पण पुन्हा असा तणाव कधी निर्माण होईल याची भीती कायम राहिली. काही संघटनांच्या हालचालींमुळे असे कधीही घडू शकते, असे वाटू लागले. मात्र, त्यानंतर दिसलेली समजूतदारपणा आशा निर्माण करणारा आहे.

३ जून रोजी टूटीकोरिन येथे इंडियन युनियन मुस्लिम लीगने एक परिषद आयोजित केली. या परिषदेमुळे पुन्हा तणावाची भीती निर्माण झाली. प्रसारमाध्यमांच्या कव्हरेजमुळे ही भीती अधिकच वाढली. तरीही या परिषदेचा विषय होता - सांप्रदायिक सलोखा.

ही परिषद शांततेत पार पडली आणि त्यातून तमिळनाडूतील राजकीय शक्ती शांततेच्या बाजूने उभ्या असल्याचा विश्वास मिळाला. यानंतर जुलै महिन्यात तमिळनाडूतील दुसऱ्या राजकीय शक्तीने, मनिकीन्य मक्कई कच्ची (एमएमके) यांनी टूटीकोरिन येथेच परिषद आयोजित केली.

एमएमके हा तमिळनाडूतील मुस्लिम समाजात प्रभाव असलेला राजकीय पक्ष आहे आणि तो राज्यातील डीएमके सरकारचा भाग आहे. या परिषदेत सांगण्यात आले की तमिळनाडू हा समावेशक समाज आहे. येथे सांप्रदायिक तणावाला स्थान नाही.

या परिषदेची खासियत अशी की यात हिंदू धार्मिक नेते आणि ज्योतिमइल इरईपनीचे संस्थापक थिरुवडईकुडिल स्वामीगल यांनी भाग घेतला. तसेच कॅथोलिक पादरी जेबथ जेस्पर राज यांनीही हजेरी लावली.

थिरुप्परनकुंदरम येथे तणाव पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी केवळ राज्यातील दोन प्रमुख मुस्लिम राजकीय पक्षच सक्रिय नव्हते. एक-दोन अपवाद वगळता बहुतांश राजकीय पक्षांनी स्थानिक प्रशासनाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर इथ अनेक सर्वपक्षीय बैठका झाल्या. याचमुळे थिरुप्परनकुंदरम येथील लोक आता सुटकेचा श्वास घेत आहेत. तमिळनाडूतील या राजकीय पक्षांनी खरेतर संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे. जेव्हा वातावरणात विष पेरण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा काय करायला हवे याचा आदर्श त्यांनी घालून दिला.