गुलाम रसूल देहलवी
सोमवारी, दिल्लीतील सर्वात मोठा दर्गा, हजरत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या मेहरौली शरीफ येथील तीन दिवसीय वार्षिक उरुसाची सांगता झाली. त्यांना 'कुतुब साहेब' म्हणूनही ओळखले जाते. देशाच्या विविध भागांतून आणि विविध धर्मांचे भाविक मोठ्या संख्येने दर्ग्याला भेट देण्यासाठी आले होते. मी देखील दर्ग्याच्या प्रसिद्ध संध्याकाळच्या 'रोशनी' (पवित्र कबरीवर दिवेलावणी) कार्यक्रमात सहभागी झालो होतो. त्यावेळी एक ऐतिहासिक घटना माझ्या मनात ताजी झाली. हे तेच प्रांगण आहे जिथे महात्मा गांधींनी ख्वाजा गरीब नवाज यांचे महान खलिफा हजरत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या मजारीला भेट दिली होती.
ही घटना आहे २७ जानेवारी १९४८ची. गांधीजींची ही भेट म्हणजे फाळणीनंतरच्या दिल्लीतील हिंसक परिस्थितीत सांप्रदायिक तणाव कमी करण्याचा एक प्रतिकात्मक आणि अर्थपूर्ण प्रयत्न होता.
हजरत कुतुब साहेब हे 'वहादत-उल-वजूद' (सर्वव्यापी अस्तित्व) चे मोठे समर्थक होते. हे सुफी तत्त्वज्ञान 'अद्वैत' या हिंदू वेदांत संकल्पनेशी सुसंगत आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी यांनी त्यांना ‘कुतुब-उल-अक्ताब’ (ध्रुवांचा ध्रुव) ही उपाधी दिली होती. ते म्हणत, "सत्याच्या प्रकाशापासून कधीही तोंड फिरवू नका आणि अल्लाहच्या मार्गावर धैर्याने उभे राहा." याच शिकवणीमुळे कुतुब साहेब उपखंडातील सुफी इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित संतांमध्ये गणले जातात. आजही त्यांचा आध्यात्मिक प्रकाश मेहरौली शरीफला उजळवून टाकत आहे.
गांधीजी आपल्या हत्येच्या केवळ तीन दिवस आधी दर्ग्याच्या दर्शनासाठी आले होते. दंगलग्रस्त दिल्लीतील मुस्लिमांनी भीती आणि दहशतीच्या वातावरणात आपली घरे सोडून जाऊ नये, हा यामागील उद्देश होता. गांधीजींनी येथे स्थानिक लोकांशी भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, ते आपल्याच देशात परके नाहीत. या प्रसंगी त्यांच्यासोबत मौलाना अबुल कलाम आझाद आणि राजकुमारी अमृत कौर हेही उपस्थित होते. गांधीजींची ही भेट केवळ आध्यात्मिक श्रद्धेचे प्रदर्शन नव्हते, तर त्यातून त्यांनी एक मोठा राजकीय आणि नैतिक संदेशही दिला होता.
जानेवारी १९४८मध्ये दिल्ली हिंसक घटनांनी हादरली होती. सांप्रदायिक सलोखा पुन्हा प्रस्थापित व्हावा यासाठी गांधीजींनी १३ ते १८ जानेवारी दरम्यान सहा दिवसांचा उपवास केला होता. हिंदू आणि शीख नेत्यांनी मुस्लिमांच्या मशिदी आणि दर्गे परत करण्याची हमी दिल्यानंतरच त्यांनी उपवास सोडला होता.
दर्ग्यातून गांधीजींनी साधलेला संवाद
दर्ग्यात आपल्या भावना व्यक्त करताना गांधी म्हणाले होते, "मी येथे दर्शनासाठी आलो आहे. माझी विनंती आहे की, जे मुस्लिम, हिंदू आणि शीख शुद्ध मनाने येथे आले आहेत, त्यांनी हे वचन द्यावे की ते कधीही वादाला डोके वर काढू देणार नाहीत, उलट नेहमीच बंधुभाव आणि प्रेमाने राहतील. आपल्याला आपली हृदये शुद्ध करायची आहेत आणि आपल्या विरोधकांशीही प्रेमाने वागायचे आहे."
त्यांच्या या कृतीचे लगेच राजकीय परिणामही दिसून आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली प्रशासनाला दर्गे आणि मशिदींच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मौलाना आझाद यांच्या मते, गांधीजींच्या या भेटीमुळे स्थलांतर न करता दिल्लीला आपली मानण्यास मुस्लिमांना मोठा भावनिक आधार मिळाला.
दर्ग्याच्या गर्भगृहात म्हणजे मजारीच्या आतील भागात महिलांना सहसा प्रवेश मिळत नाही. मात्र या ऐतिहासिक प्रसंगी मात्र त्यांना गांधीजींसोबत आत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी जुने अडथळे तोडावे लागतील, असा संदेश देणारी ही कृती होती.
गांधीजींचा सलोख्याचा संदेश 'फुलों की सैर' उत्सवाने ठेवलाय जिवंत
आजही हजरत कुतुब साहेब यांचा दर्गा 'फुलों की सैर' या उत्सवाच्या माध्यमातून गांधीजींच्या सलोख्याच्या संदेशाला जिवंत ठेवला आहे. या उत्सवात दर्गा आणि जवळच असलेल्या देवी योगमाया मंदिरात फुलांच्या चादरी आणि पंखे अर्पण केले जातात. हिंदू, मुस्लिम आणि शीख असे सर्वजण या मिरवणुकीत सहभागी होतात. हीच ती गंगा-जमुनी तहजीब आहे, जिची आठवण गांधीजींनी आपल्या शेवटच्या भाषणात सर्वांना करून दिली होती.
मेहरौली शरीफचे स्थानिक लोक आजही सांगतात की, गांधीजींनी मुस्लिमांना दिल्ली सोडून जाण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची आणि हक्काची जाणीव करून दिली. मेहरौली शरीफमधील गांधीजींची शेवटची सार्वजनिक उपस्थिती केवळ एक आध्यात्मिक यात्रा नव्हती, तर भारताच्या बहुसांस्कृतिक आत्म्याचे रक्षण करण्याचा एक अविस्मरणीय प्रयत्नही होता.
हजरत कुतुब साहेबांचा दर्गा आजही उभा आहे आणि त्याच्या प्रांगणात आशा आणि बंधुभावाचा संदेश देणारी गांधीजींची आठवण एका बीजाप्रमाणे रुजलेली आहे. आपल्याला जर गांधीजींच्या स्मृती खरोखरच जपायच्या असतील तर केवळ त्यांच्या पुतळ्यांवर हार घालणे पुरेसे नाही. आपल्यालाही त्यांच्यासोबत चालावे लागेल - मेहरौलीच्या दिशेने… एकमेकांच्या दिशेने… आणि त्या भारताच्या दिशेने, जिथे केवळ दर्गेच नव्हे तर माणसेही सर्वांसाठी आहेत.