मतदार यादीतील समस्या एकाच ठिकाणी सुटणार! निवडणूक आयोगाने सुरू केली '१९५०' हेल्पलाइन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) नागरिकांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व शंका आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 'राष्ट्रीय मतदार हेल्पलाइन' (१९५०) आणि सर्व ३६ राज्य व जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. यासोबतच, नागरिकांना त्यांच्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (BLO) थेट संपर्क साधता यावा, यासाठी 'बुक-अ-कॉल विथ BLO' (Book-a-call with BLO) नावाची एक नवीन सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

काय आहे '१९५०' हेल्पलाइन?

ही एक टोल-फ्री (१८००-११-१९५०) हेल्पलाइन असून, ती दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. प्रशिक्षित अधिकारी नागरिकांना निवडणूक सेवा आणि त्यांच्या प्रश्नांबाबत मदत करतील. याशिवाय, प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात प्रादेशिक भाषांमध्ये मदत पुरवण्यासाठी राज्य संपर्क केंद्र (SCC) आणि जिल्हा संपर्क केंद्र (DCC) देखील सुरू करण्यात आली आहेत.

सर्व तक्रारी आणि प्रश्न 'नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल' (NGSP 2.0) द्वारे नोंदवले जातील आणि त्यांचा मागोवा घेतला जाईल.

'बुक-अ-कॉल विथ BLO' सुविधा

ECINET प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या नवीन सुविधेद्वारे, नागरिक त्यांच्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसरशी (BLO) थेट संपर्क साधण्यासाठी कॉल बुक करू शकतात. तसेच, ECINet ॲपचा वापर करूनही निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

निवडणूक आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) आणि निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांना या तक्रारींवर नियमित लक्ष ठेवण्याचे आणि ४८ तासांच्या आत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

या सुविधांव्यतिरिक्त, नागरिक [email protected] या ईमेल आयडीवरही आपल्या तक्रारी पाठवू शकतात. निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना या सुविधांचा वापर करून आपल्या शंकांचे पारदर्शकपणे निराकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.