पुणे पुस्तक महोत्सवाला दीड लाख पुणेकरांची हजेरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुणे पुस्तक महोत्सवाला शनिवारी आणि रविवारी दीड लाखाहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या दोन दिवसांत महोत्सवात पुस्तकांच्या खरेदी-विक्रीत कोट्यवधींची उलाढाल झाल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्क्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या दोन्ही मंडपात मराठी, हिंदी आणि इंग्रजोसह विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. शनिवारी सकाळपासून ते रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास दीड लाखाहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली.

पांडे म्हणाले, "पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्क्यांची सवलत दिली जात आहे. त्यामुळे पुस्तक खरेदी विक्रीत मोठी उलाढाल होत आहे. कोणत्या पुस्तकांची विक्री अधिक झाली, कोणत्या विषयांची पुस्तके खरेदी करण्याला नागरिकांची पसंती मिळाली आणि एकूण उलाढाल याबाबत महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात सविस्तर माहिती देण्यात येईल."

'बोलत्या छायाचित्रां'चे अनोखे प्रदर्शन

राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उ‌द्घाटन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन २१ डिसेंबरपर्यंत फर्ग्यूसन महाविद्यालयात खुले राहणार आहे.

महोत्सवाच्या सांस्कृतिक पर्वातमंगळवारी (ता. १६) इतिहास, विचार आणि राष्ट्रभावनेचा सशक्त आविष्कार घडवणारे 'चाणक्य' हे गाजलेले हिंदी नाटक सादर होणार आहे. हे नाटक पुणेकरांना विनामूल्य पाहता येणार आहे.

अभिनेते मनोज जोशी यांनी या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले असून, त्यात प्रमुख भूमिका साकारत चाणक्याच्या कठोर, तेजस्वी आणि दूरदृष्टीपूर्ण व्यक्तिमत्त्वाला रंगमंचावर सजीव केले आहे. हे नाटक मंगळवारी (ता. १६) सायंकाळी साडे पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहे. नाटकाच्या विनामूल्य प्रवेशिकादेखील बालगंधर्व रंगमंदिरात मिळणार आहेत.

पुस्तक महोत्सवाला आज मुख्यमंत्री देणार भेट

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. १५) भेट देणार आहेत. यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित 'गिनिजगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता फर्क्युसन महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे.

मेहता प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. लोकसहभागातून साकारलेल्या १२ विश्वविक्रमांचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. महोत्सवात गेल्या दोन वर्षात नऊपेक्षा जास्त गिनीज विश्वविक्रम साकारण्यात आले आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक उपस्थित राहणार आहेत.