युद्धापेक्षा राजनैतिक संवादातून तोडगा काढा - भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर यांचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद
भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद

 

नवी दिल्ली

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. या वाढत्या संघर्षावर भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद यांनी शनिवारी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीची पावले उचलण्याचे आवाहन केले. या प्रादेशिक संकटावर तोडगा काढण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याची मागणीही त्यांनी केली.

पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याकडे लक्ष वेधताना ग्रँड मुफ्ती यांनी एक मोठा इशारा दिला. हा संपूर्ण भाग पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत लोटला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांनी शनिवारी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. शांततापूर्ण मार्ग उपलब्ध असतानाही अस्थिरता आणि अशांतता पसरवणाऱ्या कृतींचे कधीही समर्थन करता येणार नाही, असे ते म्हणाले.

सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यातून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा त्यांनी दिला. या तणावाचा लाखो सामान्य नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. यात पश्चिम आशियाई देशांवर उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्या मोठ्या संख्येने भारतीयांचाही समावेश आहे, याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले.

संघर्षापेक्षा संवाद आणि राजनैतिक मार्गाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे, यावर शेख अबुबकर अहमद यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्र, जागतिक संस्था आणि जागतिक नेत्यांनी यात तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करावा. या भागात पुन्हा एकदा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. याचा संदर्भ देत त्यांनी लोकांना पवित्र कुराणचे पठण करण्याची विनंती केली. सर्वांनी सत्कर्म करावे आणि जागतिक शांततेसाठी मनापासून प्रार्थना करावी, असे ते म्हणाले. सर्वशक्तिमान अल्लाहने मानवजातीचे मोठ्या संकटांपासून रक्षण करावे. संपूर्ण जगात शांतता, सुरक्षा आणि सलोखा नांदावा, अशी आर्त प्रार्थना त्यांनी केली.

शेख अबुबकर यांच्याविषयी...
ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद यांचे कार्य केवळ धार्मिक नेतृत्वापुरते मर्यादित नाही. ते जामिया मार्कझच्या माध्यमातून शिक्षण आणि सामाजिक प्रकल्पांना प्रोत्साहन देतात आणि मार्कझ नॉलेज सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत, ज्यामध्ये वैद्यकीय आणि कायदा महाविद्यालये तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. त्यांनी आखाती देश आणि दक्षिण-पूर्व आशियात धार्मिक प्रवचने दिली आहेत आणि २०१९-२० मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोधातील आंदोलनांदरम्यान त्यांनी महिलांना रस्त्यावरील निषेधांपासून परावृत्त करताना कायद्याविरोधात भूमिका घेतली होती.

काही महिन्यांपूर्वी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील ३६ वर्षीय परिचारिका निमिषा प्रिया हिला यमनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही फाशी १६ जुलै २०२५ रोजी नियोजित होती. मात्र ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद यांच्या अथक मानवतावादी प्रयत्नांमुळे आणि यमनी धार्मिक नेत्यांशी झालेल्या चर्चेमुळे ही फाशी तात्पुरती स्थगित झाली होती. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter