डॉ. शाइस्ता युसूफ : साहित्याला संस्कृतीशी जोडणारा भक्कम दुवा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
डॉ. शाइस्ता युसूफ
डॉ. शाइस्ता युसूफ

 

सानिया अंजुम 

डॉ. शाइस्ता युसूफ यांचे व्यक्तिमत्त्व कोणत्याही एका व्याख्येत बसणारे नाही. कवयित्री, कादंबरीकार, अनुवादक, उद्योजिका, रंगमंच कलाकार आणि समाजसुधारक अशा अनेक भूमिका त्या लीलया पार पाडतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक ओळख एकमेकींना पूरक ठरते आणि अधिक समृद्ध करते. त्यांचे जीवन एखाद्या सरळ रेषेसारखे नसून त्यांच्या 'सदियों का रक्स' या कादंबरीप्रमाणेच अनेक पदर असलेले एक सखोल कथन आहे.

त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब मूळचे हैदराबादचे असून नंतर ते बंगळुरूमध्ये स्थायिक झाले. एका सुसंस्कृत आणि मूल्य जपणाऱ्या खानदानात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील अब्दुल रहमान कॉन्ट्रॅक्टर हे मुंबईतील उद्योग जगतातील मोठे नाव होते. शाइस्ता यांना साहित्याचा वारसा परंपरेने मिळालेला नव्हता, तर त्यांनी तो स्वतःच्या आवडीने जोपासला. सातवीत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. दहावीत असतानाच त्यांचा विवाह मुंबईतील कार डीलर आणि आर्किटेक्ट इम्तियाज युसूफ यांच्याशी झाला. कमी वयात लग्न झाले तरी संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचा आवाज कधीच दबला नाही, उलट अनुभवांच्या समृद्धीमुळे तो अधिक प्रगल्भ झाला.

शाइस्ता यांनी १९७० मध्ये लेखनाला सुरुवात केली. त्या वळणाबद्दल त्या सांगतात, "एक अशी वेळ आली जेव्हा मला जाणीव झाली की माझा आवाज जगापर्यंत पोहोचायला हवा." ही जाणीवच त्यांच्या आजीवन साहित्यिक प्रवासाचा पाया ठरली.
 

त्यांचा शैक्षणिक प्रवास त्यांच्या बौद्धिक खोलीची साक्ष देतो. त्यांनी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र विषयात एम.ए. केले. १९८४ मध्ये बंगळुरू विद्यापीठातून उर्दू विषयात एम.ए. पदवी मिळवली. सौंदर्यशास्त्रात पदविका संपादन केली. त्यानंतर उर्दू साहित्य आणि समाजसेवेतील योगदानासाठी तुमकूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट आणि एलएल.डी. पदवी देऊन गौरवले. गरोदरपणात परीक्षा देणे असो किंवा घर आणि महत्त्वाकांक्षा यांची सांगड घालणे, त्यांनी या दोन्ही गोष्टींकडे कधीच अडथळे म्हणून पाहिले नाही, तर त्या जबाबदाऱ्या मानून पूर्ण केल्या.

त्यांच्या साहित्याचा कॅनव्हास अतिशय समृद्ध आहे. 'गुल-ए-खुद्रो', 'सुनी परछाईयां' आणि 'आब-ए-आईना' यांसारख्या काव्यसंग्रहांनी त्यांची कवयित्री म्हणून ओळख प्रस्थापित केली. 'सुनी परछाईयां'ला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. या पुस्तकाचे प्रकाशन बंगळुरू विद्यापीठाच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक शम्सुर रहमान फारुकी यांच्या हस्ते झाले, जो त्यांच्यासाठी एक मोठा गौरव होता.

'गुल-ए-खुद्रो' हे नाव त्यांच्यासाठी सार्थ ठरले. प्रख्यात लेखिका कुर्रतुलैन हैदर यांनी त्यांचे वर्णन 'गुल-ए-खुद्रो' म्हणजेच 'रानात आपोआप फुलणारे रानफूल' असे केले होते. कोणत्याही साहित्यिक घराण्याशी संबंध नसताना स्वतःच्या हिमतीवर उभे राहिलेल्या शाइस्ता यांच्यासाठी ही मोठी दाद होती. कुर्रतुलैन हैदर यांनीच त्यांना सल्ला दिला होता, "मुशायऱ्यांमध्ये स्वतःला वाया घालवू नकोस." या सल्ल्यानेच त्यांना क्षणभंगुर टाळ्यांऐवजी चिरंतन साहित्यावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा दिली.
 

साहित्य विश्वातील अनेक दिग्गजांशी त्यांचे ऋणानुबंध होते. निदा फाजली यांच्यासोबत त्यांनी काव्यचर्चा केली. ज्येष्ठ कवी अख्तर-उल-इमान यांनी त्यांच्या कवितेची प्रशंसा केली. बाकर मेहदी आणि प्रसिद्ध कवयित्री सारा शगुफ्ता यांच्याशीही त्यांचा जवळून परिचय होता. त्यांनी 'मुलगी सिगारेट ओढते' यांसारख्या धाडसी विषयावरही कविता लिहिली आहे, जी एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून मांडलेली एक वेगळी बाजू होती.

बंगळुरूमध्ये राहत असूनही त्या काहीशा आश्चर्याने म्हणतात, "मला नवल वाटते की बंगळुरू पेक्षा दिल्ली आणि मुंबईमध्ये लोक मला जास्त ओळखतात."

त्यांचे गद्य लेखनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी महमूद अयाज यांच्यावर एक ग्रंथ लिहिला. 'टेल्स ऑफ टुमारो'चा 'आने वाले कल की कहानिया' या नावाने केलेला अनुवाद भारतीय इंग्रजी लेखकांच्या कथा उर्दू वाचकांपर्यंत घेऊन गेला. रेख्ता पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेली त्यांची 'सदियों का रक्स' ही कादंबरी त्यांचे सर्वात महत्त्वाकांक्षी काम मानले जाते. या कादंबरीतील पात्रे काल्पनिक असली तरी ती वास्तवाशी घट्ट जोडलेली आहेत. तत्त्वज्ञानाचा अभ्यास असल्याने त्यामध्ये काळाचा प्रवाह, समाज आणि मानवी जाणिवांचे उत्तम दर्शन घडते.

कलाक्षेत्रातील त्यांच्या प्रवासाला आणखी एक परिमाण लाभले. त्यांनी 'इप्टा' (IPTA) मध्ये रंगमंच कलाकार म्हणून काम केले. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या नाटकात काम केले. कादर खान यांच्याशी संबंधित नाट्यवर्तुळाशी त्या जोडल्या गेल्या होत्या. कॉलेजमध्ये अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या शाइस्ता यांनी बंगळुरूमध्ये ऑडिशन देऊन आकाशवाणी मुंबईसाठी दोन वर्षे काम केले. रंगमंचाने त्यांना आत्मविश्वास दिला, रेडिओने आवाजाची शिस्त लावली आणि साहित्याने त्यांना कायमचे स्थान दिले.

त्यांचे आयुष्य केवळ पुस्तके आणि काव्यवाचनापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या सासरच्या कुटुंबातील जहीर लष्करवाला ऊर्फ 'दिवाण चाचा' यांच्या प्रेरणेने त्यांनी सौंदर्य प्रसाधने क्षेत्रात पाऊल ठेवले आणि 'मिस्टिक हर्बल कॉस्मेटिक्स'ची स्थापना केली. बंगळुरूच्या ॲव्हेन्यू रोडवरील त्यांच्या कुटुंबाचे जुने पन्सार दुकान आजही प्रसिद्ध आहे. त्यांच्या मुलाने नंतर या व्यवसायाचा विस्तार करत 'मिस्टिक हर्बल'चे 'क्लेरिस' (Clarice) असे नामकरण केले.

त्यांनी 'शाइस्ताज खुबानी का मीठा' आणि 'उरूजम' हे आरोग्य उत्पादनही बाजारात आणले. व्यापार आणि भावना यांचा समतोल साधताना त्या म्हणतात, "व्यवसाय डोक्याने चालतो आणि शायरी हृदयाने." या एका ओळीत त्यांनी दोन्ही क्षेत्रांत मिळवलेल्या प्रभुत्वाचे सार सामावलेले आहे.

उर्दू भाषेप्रती असलेली त्यांची निष्ठा केवळ व्यक्तिगत लेखनापुरती राहिली नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी बनली. त्यांनी खलील मामून यांच्या 'ऑल इंडिया उर्दू ट्रस्ट'मध्ये विश्वस्त म्हणून काम केले. त्या 'इंटरनॅशनल सुफी वर्ल्ड ट्रस्ट'च्या संस्थापक विश्वस्त आहेत.

स्वतःची स्वतंत्र संस्था उभी करण्याच्या जिद्दीने २०१२ मध्ये त्यांनी जुबैदा बेगम, हलीमा फिरदौस, महनूर जमानी आणि फरीदा रहमतुल्ला यांच्यासह 'महफिल-ए-निसा'ची स्थापना केली. ही संस्था उर्दू भाषा, महिला आणि वारसा जतन करण्यासाठी काम करते. त्यांनी सरकारी शाळा दत्तक घेतल्या, प्राथमिक स्तरावर स्पर्धा घेतल्या आणि उर्दू दिवसाच्या भव्य रॅली काढल्या. सुरुवातीला संकोच वाटत होता तरी नंतर या रॅलींचे मोठ्या सार्वजनिक उत्सवात रूपांतर झाले. त्यांनी नेहमीच कामाचा दर्जा राखण्यावर भर दिला, कारण दर्जा नसेल तर काम सुरू ठेवण्यात त्यांना रस नव्हता.

त्यांची संस्थात्मक उपस्थिती सर्वत्र जाणवते. त्या कर्नाटक उर्दू अकादमी, दिल्लीतील कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज आणि साहित्य अकादमीशी जोडल्या गेल्या आहेत. त्या 'ऑल इंडिया उर्दू मंच'च्या संस्थापक सदस्य आणि खजिनदार आहेत. त्यांची अनेक पुस्तके कर्नाटक बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्यांचा आवाज वर्गावर्गापर्यंत पोहोचला आहे. टीव्हीवरील चर्चासत्रे आणि साहित्यिक स्पर्धांच्या परीक्षकांमध्ये त्या उर्दू साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात.

त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला आहे. २०१० मध्ये 'गुल-ए-खुद्रो'साठी त्यांना कर्नाटक उर्दू अकादमी पुरस्कार मिळाला. 'सुनी परछाईयां'साठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. यासोबतच विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.

त्यांच्या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. सातवीत कविता लिहिणारी मुलगी ते बंगळुरूमध्ये 'सदियों का रक्स' सादर करणारी कादंबरीकार, मुंबईतील कमी वयातील लग्न ते दिल्लीपर्यंत मिळालेली बौद्धिक ओळख, साहित्यातील 'गुल-ए-खुद्रो' ते व्यवसायातील 'क्लेरिस' आणि रंगमंचावरील अभिनयापासून 'महफिल-ए-निसा'ची स्थापना, अशा प्रत्येक टप्प्यावर त्या अधिक सशक्त झाल्या.

साहित्य आणि उपजीविका या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात नसतात, हे त्यांच्या आयुष्यावरून दिसते. तत्त्वज्ञान आणि व्यापार सोबत नांदू शकतात. परंपरांना काळानुसार बदलता येते. एकदा स्वतःचा आवाज गवसला की, तो कधीही शांत होत नाही, हेच शाइस्ता युसूफ यांनी सिद्ध केले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter