डॉ. सोफिया बानू : ईशान्य भारतातील कृषी संशोधनातील मोठे नाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
डॉ. सोफिया बानू
डॉ. सोफिया बानू

 

दौलत रहमान

गुवाहाटी विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर डॉ. सोफिया बानू यांनी संशोधनालाच आपले करिअर म्हणून निवडले. आपल्या मनातील कुतूहलाचे रूपांतर समाजाला फायदेशीर ठरेल अशा कामात करण्याची संधी संशोधनामुळे मिळते, असे त्या मानतात. त्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. त्यांच्या शालेय जीवनातील प्रेरणादायी शिक्षकांनी त्यांच्या मनात वैज्ञानिक संशोधनाविषयीची आवड निर्माण केली.

'आवाज द व्हॉईस'ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. बानू यांनी आपल्या प्रेरणेविषयी सविस्तर सांगितले. निसर्गाची कार्यपद्धती समजून घेणे आणि त्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडवण्यासाठी करणे, ही गोष्ट आपल्याला सर्वाधिक प्रवृत्त करते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, संशोधन म्हणजे केवळ प्रयोगशाळेत प्रयोग करणे नव्हे. तर महत्त्वाचे प्रश्न विचारणे, कल्पनांची काळजीपूर्वक चाचणी घेणे आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे उत्तरे शोधणे म्हणजे संशोधन होय. त्यांना नवीन कल्पनांचा शोध घेण्याचे स्वातंत्र्य आणि एखादी नवीन गोष्ट शोधण्याचा आनंद खूप आवडतो.

गेल्या काही वर्षांत डॉ. सोफिया बानू आसाममधील अत्यंत प्रगतीशील आणि आश्वासक शास्त्रज्ञांपैकी एक बनल्या आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि समाजाला मदत होईल अशा दोन्ही पद्धतींनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
 

सोफिया यांच्या प्रमुख संशोधन क्षेत्रांपैकी एक म्हणजे अगरवूड होय. हे अगरवूड 'अक्विलाएरिया मॅलासेन्सिस' नावाच्या झाडापासून मिळते. ईशान्य भारतात अगरवूडला खूप जास्त महत्त्व आहे. कारण याचा उपयोग सुगंधी अत्तरे आणि पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. 

डॉ. बानू आणि त्यांचा संसोधक गट या झाडाला होणारे संसर्ग आणि अगरवूडची निर्मिती कशी होते, याचा सखोल अभ्यास करतात. त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतीने अगरवूडचे उत्पादन घेण्यास मदत होते. या पद्धतीमुळे झाडांचे संरक्षण देखील होते. हे संशोधन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावते. सोबतच एका महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्याचे काम करते.

त्यांचा दुसरा एक महत्त्वाचा प्रकल्प आसामी लिंबावर आधारित आहे. ही आसाममध्ये उगवणारी लिंबाची एक विशेष प्रजाती आहे. डॉ. बानू यांच्या संशोधनाने या लिंबाच्या जनुकीय रचनेचा अभ्यास केला. आसाममधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणलेल्या लिंबामध्ये किरकोळ फरक असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. 

यावरून या फळामध्ये मोठी जनुकीय विविधता असल्याचे सिद्ध होते. परंतु, या फळाची अनोखी वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी विशेष पावले उचलण्याची गरजही यातून अधोरेखित झाली आहे. या अभ्यासाची दखल 'नेचर इंडिया'ने घेतली असून २०२३ मधील पहिल्या १० प्रमुख संशोधन निष्कर्षांमध्ये याला स्थान दिले आहे. हे संशोधन आसामी लिंबाचे वैज्ञानिक आणि सांस्कृतिक मूल्य टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
 

डॉ. बानू यांनी आरोग्याशी संबंधित संशोधनावरही मोठे काम केले आहे. विशेषतः शरीरात इन्सुलिन कसे काम करते आणि पेशी तणावाचा सामना कसा करतात, यावर त्यांनी अभ्यास केला आहे. हे अभ्यास मधुमेह यांसारख्या चयापचयाशी संबंधित आजारांबद्दलची समज सुधारण्यास मदत करतात. जैवतंत्रज्ञान हे केवळ वनस्पती विज्ञानातच नव्हे, तर वैद्यकीय विज्ञानातही कसे मोलाचे योगदान देऊ शकते, हे या संशोधनातून दिसून येते.

त्यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, आसाम अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, त्रिपुरा युनिव्हर्सिटी आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांसारख्या अनेक नामांकित संस्थांसोबत काम केले आहे. त्यांच्या प्रकल्पांना भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ यांसारख्या राष्ट्रीय संस्थांकडून निधी मिळाला आहे. त्यांच्या टीमने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये १०० पेक्षा जास्त शोधनिबंध सादर केले आहेत. या परिषदांमध्ये त्यांच्या टीमने अनेक सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे पुरस्कारही जिंकले आहेत.

डॉ. बानू यांनी ४० पेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले असून शैक्षणिक पुस्तकांमध्ये १० प्रकरणांचे योगदान दिले आहे. संशोधन कार्याव्यतिरिक्त त्या लोकांना विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी वर्तमानपत्रात वेगवेगळ्या विषयांवर लेखही लिहितात.
 

त्यांना २४ पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रम आणि चर्चासत्रांमध्ये व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गुवाहाटी विद्यापीठात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. डॉ. बानू 'सायंटिफिक रिपोर्ट्स'सह अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या संपादन मंडळाच्या सदस्या आहेत. तिथे त्या जगभरातील शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचे पुनरावलोकन करण्याचे महत्त्वाचे काम करतात. याव्यतिरिक्त त्या पाच व्यावसायिक संघटनांच्या आजीवन सदस्या आहेत आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात मदत केली आहे.

लोकप्रिय वर्तमानपत्रांमध्ये वैज्ञानिक विषयांवर पुरेशी चर्चा होत नाही, असे डॉ. बानू यांचे स्पष्ट मत आहे. वास्तविक पाहता लाखो लोक दररोज वर्तमानपत्रे वाचतात. हाच फरक दूर करण्यासाठी त्या अँटिऑक्सिडंट्स, स्टेम सेल्स आणि जेनेटिकल मॉडिफाइड ऑर्गनिझम्स यांसारख्या विषयांवर नियमितपणे लेख लिहितात. या लेखनाच्या माध्यमातून त्या विज्ञानातील गुंतागुंतीच्या कल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून सामान्य जनता त्या सहज समजू शकेल. तरुण विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी संशोधनात करिअर करावे, हाही यामागील त्यांचा मुख्य उद्देश आहे.

डॉ. बानू आणि त्यांच्या संशोधन पथकाने वनस्पती जैवतंत्रज्ञान, आण्विक जीवशास्त्र आणि जीनोमिक्स यांसारख्या क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांनी 'क्रिसपर' जीन एडिटिंग, मॉलिक्युलर इव्होल्युशन आणि वनस्पती-आधारित रासायनिक संयुगे यांसारख्या आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानावर पुस्तकांचे धडे देखील लिहिले आहेत. ही कामे इतर संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवीन घडामोडींबद्दल शिकण्यास मदत करतात.

आपले करिअर घडवण्यात आपल्या कुटुंबाचा, विशेषतः पालकांचा खूप मोठा वाटा असल्याचे डॉ. बानू सांगतात. त्यांच्या शालेय जीवनापासूनच पालकांनी त्यांना शिकण्यासाठी आणि विज्ञानाबद्दल कुतूहल बाळगण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना शिक्षण आणि करिअरबाबत योग्य निर्णय घेता आले.

त्यांच्या संशोधनाच्या एका टप्प्यात त्यांना फिल्डवर्कसाठी वारंवार प्रवास करावा लागला होता. त्यावेळी त्या सलग दोन वर्षे नियमितपणे घरी परत येऊ शकल्या नव्हत्या, अशी आठवण त्या सांगतात. या आव्हानात्मक काळातही त्यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला. कुटुंबाकडून मिळालेल्या या प्रोत्साहनामुळेच त्यांना जोखीम पत्करण्याचे आणि आपले वैज्ञानिक काम सुरू ठेवण्याचे धैर्य मिळाले.

आज डॉ. सोफिया बानू यांना आपल्या संशोधनाचा प्रभाव अधिक वाढवायचा आहे. सोबतच तरुण शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या अगरवूड आणि आसामी लिंबू यांसारख्या महत्त्वाच्या वनस्पती सुधारण्यासाठी अधिक चांगल्या आणि शाश्वत पद्धतींचा अभ्यास करण्याचा विचार करत आहेत. आपल्या प्रयोगशाळेतील संशोधनाचा प्रत्यक्ष फायदा ईशान्य भारतातील शेतकरी आणि स्थानिक समुदायांना मिळावा, अशी त्यांची आशा आहे.

एकंदरीत, डॉ. सोफिया बानू यांचे ध्येय भक्कम वैज्ञानिक संशोधनाची सांगड समाजाच्या प्रत्यक्ष फायद्यांशी घालणे हेच आहे. आपल्या कार्यातून शैक्षणिक क्षेत्राला आणि सामान्य जनतेला पाठबळ देण्याची त्यांची इच्छा आहे. या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना वैज्ञानिक संशोधनात करिअर करण्याची प्रेरणा देणे, हा त्यांचा मुख्य हेतू आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter