पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याच्या अरिजित सिंगच्या निर्णयावर अदनान सामीने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गायक आणि संगीतकार अदनान सामी याने अरिजित सिंगच्या पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अरिजितच्या या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे आणि त्यावर कोणतेही तर्कवितर्क लावले जाऊ नयेत, असे मत सामीने व्यक्त केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अरिजित सिंगने सोशल मीडियाद्वारे पार्श्वगायनातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करून संपूर्ण संगीत विश्व आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.

जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय

झी म्युझिक कंपनीच्या अंतर्गत रिलीज झालेल्या 'लिपस्टिक लगा के, नजर उतार ले' या नवीन गाण्याच्या लाँचिंगवेळी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अदनान सामीने ही भूमिका मांडली. तो म्हणाला, "त्याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे. त्याचा निर्णय काहीही असो, आपण सर्वांनी त्या निर्णयाचा आदर करत त्याला त्याचा वेळ (स्पेस) दिला पाहिजे. त्याने हा निर्णय कोणत्याही भावनेच्या भरात घेतलेला नाही; तो नक्कीच खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा."

कारणांबद्दल अंदाज बांधणे चुकीचे

सामीने पुढे स्पष्ट केले की, अरिजितने त्याच्या या निर्णयामागील कारणे सार्वजनिकपणे स्पष्ट करणे अजिबात बंधनकारक नाही. "त्यामागे काहीतरी भक्कम कारण असावे, जे फक्त त्यालाच माहीत आहे. ते जगाला सांगणे त्याच्यासाठी आवश्यक नाही, किंवा कदाचित योग्य वेळी जगाला ते समजेल. हे त्याचे आयुष्य आहे आणि जेव्हा त्याला वाटेल की तो हे कारण सांगण्यास तयार आहे, तेव्हाच तो ते सांगेल. पण त्यासाठी त्याला त्याचा स्पेस दिला पाहिजे," असे सामीने स्पष्ट केले.

संगीत क्षेत्रातील दबाव आणि मानसिक आरोग्य

करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना अरिजितने घेतलेल्या या निर्णयामुळे संगीत क्षेत्रातील मानसिक आरोग्य, भावनिक थकवा आणि कामाचा दबाव यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना ५४ वर्षीय अदनान सामी म्हणाला की, अशा प्रकारे सरसकट तर्क लावणे अन्यायकारक आहे.

कामातून ब्रेक घेणे ही पूर्णपणे वैयक्तिक बाब असून त्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असू शकतात. संगीत कंपन्यांच्या धोरणांबद्दल बोलताना तो म्हणाला की, प्रत्येक कंपनीचे स्वतःचे नियम असतात, मात्र कोणते काम स्वीकारायचे हे शेवटी कलाकारावर अवलंबून असते.