सैफ अली खानने 'कर्तव्य'मधील पात्राबाबत सोडले मौन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 43 m ago
अभिनेता सैफ अली खान
अभिनेता सैफ अली खान

 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी कर्तव्य या क्राईम-ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील गुंतागुंतीची पात्रे पाहून मी या प्रोजेक्टकडे ओढला गेलो, असे सैफने एका मुलाखतीत सांगितले. भक्षक फेम दिग्दर्शक पुलकित यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, यात सैफ एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे, जो वाढत्या धोक्यांचा सामना करत असतानाच आपले कर्तव्य आणि कुटुंबाची सुरक्षा यांच्यात अडकला आहे. सत्ता, अपराधीपणाची भावना आणि मौन पाळण्याचे परिणाम यावर हा चित्रपट भाष्य करतो. सैफ अली खान म्हणाला की, "मी कर्तव्यमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला कारण मला याची स्क्रिप्ट खूप आवडली. हा एक उत्कृष्ट ड्रामा असून आंतरराष्ट्रीय दर्जाची मांडणी यात करण्यात आली आहे. अनेकांनी मला सांगितले की, ही माझ्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिका आहे."

लंगडा त्यागीशी तुलना
कर्तव्यमधील सैफच्या पवन या भूमिकेची तुलना २००६ मधील ओमकारा चित्रपटातील गाजलेल्या लंगडा त्यागी या पात्राशी केली जात आहे. यावर बोलताना सैफ म्हणाला, "दोन्ही चित्रपट हिंदी भाषिक पट्ट्यातील पार्श्वभूमीवर आधारित आहेत. त्यामुळे आवाजाचा लूक किंवा बोलण्याची ढब थोडी सारखी वाटू शकते, मात्र पात्रे पूर्णपणे वेगळी आहेत."
 
सैफ अली खानने नेहमीच मोठ्या पडद्यावरील ग्लॅमरपेक्षा कथेला महत्त्व दिले आहे. एजंट विनोद, तान्हाजी, देवरा आणि सेक्रेड गेम्स यांसारख्या विविध धाटणीच्या कलाकृतींमधून त्याने आपली छाप पाडली आहे. "मला 'तान्हाजी'मधील खलनायक साकारताना आनंद मिळाला आणि सेक्रेड गेम्ससारखा वेब शो करतानाही खूप काही शिकायला मिळाले. मी फक्त चांगल्या कामातून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो," असे ५५ वर्षीय सैफने नमूद केले.

गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला कर्तव्य चित्रपट १५ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय मिश्रा आणि झाकीर हुसेन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.