Dhurandhar The Revenge OTT Release : हजारो कोटींची कमाई करणारा 'धुरंधर २' आता ओटीटीवर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाचे पोस्टर
'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाचे पोस्टर

 

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करणाऱ्या 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट ४ जून रोजी 'जिओहॉटस्टार' (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका विशेष डिजिटल प्रीमियर इव्हेंटसह प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.

१,७९० कोटींची विक्रमी कमाई
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर जागतिक बॉक्स ऑफिसवर तब्बल १,७९० कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. भारतात पहिल्यांदाच हा चित्रपट त्याच्या मूळ आणि अनफिल्टर्ड (Unfiltered) स्वरूपात जिओहॉटस्टारवर उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती प्लॅटफॉर्मने एका निवेदनात दिली आहे. ४ जून रोजी रात्री ७ वाजता चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वी ३0 मिनिटांचा एक विशेष प्रेशो (Pre-show) दाखवला जाईल. यामध्ये चित्रपटाची स्टारकास्ट, पडद्यामागच्या गोष्टी आणि चित्रपट निर्मितीचे अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यानंतर ५ जूनपासून हा चित्रपट सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल.

'धुरंधर' फ्रेंचायझीचे मोठे यश
हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये रिलीज झालेल्या 'धुरंधर' चित्रपटाचा सीक्वल आहे. पहिल्या भागानेही बॉक्स ऑफिसवर १,३०० कोटी रुपयांची दमदार कमाई केली होती. दोन्ही भागांनी मिळून जगभरात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने 'जसकीरत सिंह रांगी' या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे, जो पाकिस्तानमध्ये एका गुप्त मोहिमेवर जातो. पहिल्या भागात तो कराचीतील गुन्हेगारी सिंडिकेट आणि राजकीय वर्तुळात प्रवेश करून भारतातील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करतो, तर दुसऱ्या भागात २६/११ च्या हल्ल्याचा बदला घेताना दिसतो.

दिग्गज कलाकारांची फौज
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी या डिजिटल प्रीमियरबद्दल आनंद व्यक्त केला असून हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या तीव्रतेचा अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे आणि बी६२ स्टुडिओजच्या लोकेश धर यांनी केली आहे. दरम्यान, अमेरिका आणि कॅनडामध्ये हा चित्रपट शनिवारपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे.