समाजवादी पक्षाचे नेते झीशान अन्सारी यांनी गाईला राष्ट्रमाता दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. अन्सारी यांनी वाराणसी येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर हे पत्र लिहिले आणि प्रशासनामार्फत ते पंतप्रधानांना पाठवले.
भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे गाईला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत आदराचे स्थान आहे, हे लक्षात घेऊन सरकारने कायदेशीर पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
मुस्लिम समुदायातून पुढाकार
पत्रकारांशी बोलताना झीशान अन्सारी म्हणाले की, मी मुस्लिम समुदायातून येतो आणि म्हणूनच मी स्वतः हा पुढाकार घेतला आहे. भारतीय समाजात गाईबद्दल असलेल्या भावना अत्यंत तीव्र आणि पवित्र आहेत. भाजपचे नेते नेहमी गाईच्या मुद्द्यावर वेगवेगळी विधाने करत असतात. त्यामुळे आता केंद्र सरकारने गाईला अधिकृतपणे राष्ट्रमाता घोषित करून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे अन्सारी म्हणाले.
भारतीय संस्कृतीतील गाईचे स्थान
देशातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये आजही पहिली भाकरी किंवा पोळी गाईसाठी बाजूला काढून ठेवली जाते, या परंपरेचा उल्लेख त्यांनी केला. अन्सारी यांनी आरोप केला की, एकीकडे लोक गाईची पूजा करतात, तर दुसरीकडे भाजपचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यासारख्या नेत्यांनी भूतकाळात गाईच्या संदर्भाने काही विधाने केली आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर समाजात सलोखा आणि आदर टिकून राहण्यासाठी गाईला राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च कायदेशीर दर्जा मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.